नवी साखर नीती

शरद पवार यांना नेहमीच पुढे काय घडणार हे कळते की काय असे वाटायला लागते. त्यांनी दोन दिवसांपूर्वी पत्रकारांशी बोलताना, साखर उद्योग नियंत्रण मुक्त होण्याची शक्यता असल्याचे म्हटले. केन्द्र सरकारने तसा काही निर्णय घेण्याच्या दिशेने विचार सुरू केलाच असेल तर महाराष्ट्राच्या अर्थकारणात, समाजकारणात आणि राजकारणातही अनेक परिवर्तने होतील. पहिले होणारे परिवर्तन म्हणजे साखर उद्योगाचे सहकारीकरण संपून मोठ्या प्रमाणावर खाजगीकरण होईल आणि या माध्यमातून राज्याच्या राजकारणावर असलेली काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची  पकड ढिली होईल. पवारांना या बदलाचे संकेत मिळाले आहेत आणि या निर्णयाचा आपल्या राजकारणावर कसलाही परिणाम होऊ नये यासाठी त्यांनी काही पावलेही टाकायला सुरूवात केली आहे. त्यांनीच नव्हे तर राज्यातल्या सहकारी साखर कारखानदारीतल्या काही दिग्गज नेत्यांनीही आपले खाजगी कारखाने उघडून या बदलाला तोंड देण्याची तयारी सुरू केली आहे. सध्या महाराष्ट्रात  या शालिनीताई पाटील  आणि अजित पवार यांच्यात वाद सुरू आहे हे नाव महाराष्ट्रातील लोकांच्या विस्मरणात गेलेले होते.  तो वाद  काही वेगळा आहे पण त्यामागे साखर उद्योगाच्या खाजगीकरणाचे मूळ आहे.
        शालिनीताई पाटील यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीकेचा वर्षाव करायला सुरुवात केली आहे. अजितदादा पवार यांचे गुन्हेगारी विश्वातील काही गुंडशी आर्थिक संबंध असल्याचा ताईंचा आरोप आहे. त्यांनी हा आरोप करताच वृत्तपत्रांनी मोठ-मोठ्या बातम्या दिल्या. त्यातून ताई विरुद्ध दादा असा सवाल-जवाबाचा कार्यक्रम महाराष्ट्रात सुरू झाला. पवार यांच्यावर अनेकदा टीका केली जाते आणि जो टीका करतो तो आपो आपच प्रकाशात येतो. किबहुना काही लोक प्रसिद्धीच्या झोतात येण्यासाठी पवारांवर टीका करायला लागतात. अशा टीकेमुळे पवारही प्रकाशात राहतात. कोणीही यावे पवारांना टिकली मारून जावे असा प्रकार महाराष्ट्रात सतत सुरू असतो.  महाराष्ट्रात पवारांशी मैत्री असलेला, आर्थिक देवाण घेवाण असलेला आणि राजकीय लागाबांधा असलेला असा एकही नेता सापडायचा नाही की ज्याने शरद पवार (आणि आता अजित पवार) यांच्यावर कधी टीका केलेली नाही. ही टीका निव्वळ राजकीय किवा  वैचारिक असते असे नाही तर शक्यतो आर्थिक गैर व्यवहारा संबंधी असते. कधी कधी तर सरळ सरळ भ्रष्टाचाराची असते. गंमतीचा भाग असा की, टीका करणार्यारचा भूतकाळ तरी पवारवादी असतो किवा भविष्यकाळ तरी पवारमय होणार असतो.        
            अशा लोकांची यादी केली तर त्या यादीत महाराष्ट्राचा गेल्या ५० वर्षांतला राजकीय इतिहास दडलेला दिसेल. नवल असे की पवारांवर थेट पैसे खाल्ल्याचा आरोप केला तरी पवार अंगावरचे चिलट झटकावे तसे  तो आरोप झटकून टाकतात. पण त्यांनी आपली बदनामी केली म्हणून कोणावर कधी अब्रुनुकसानीचा खटला दाखल केल्याचे उदाहरण नाही. काका असे आरोप शांतपणे सहन करतात आणि कधी तरी त्याला अगदी मोजक्या शब्दात चोख उत्तर देतात. पण अजित दादा मात्र शब्दाने शब्द वाढवीत नेतात. जे काही करायचे (म्हणजे जे काही कमवायचे) ते न बोलता केले पाहिजे असे काकांना वाटते पण काय करणार दादांना बोलायची फार सवय आहे.  आता शालिनीताई पाटील यांच्याशी दादांचा ‘सुखसंवाद’ सुरू झाला आहे. शालिनीताई यांची केसही अशीच आहे. त्या खरे तर राज्यात पवार विरोधी म्हणून प्रसिद्ध होत्या. मात्र पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना करताच त्याही या पक्षातच आल्या. पुढे मात्र बिनसले. एकदा पवारांच्या बॅड बुकात गेले की काय होते याचा अनुभव त्यांनी घेतला. पवारांनी अनेक दिवाळखोर कारखाने वाचवले. ते वाचावेत म्हणून शिखर बँक दिवाळखोरीत काढली पण ताईंचा जरंडेश्वर  कारखाना मात्र अडचणीत येताच त्याचा लिलाव मांडला. तोही मांडायला काही हरकत नव्हती पण तो गुन्हेगारी विश्वात कार्यरत असलेल्या गुंडांच्या गुरू एंटरप्रायजेसच्या घशात घातला. 
    या कारखान्यांत नावालाच गुरू आहे. सारा कारभार अजित पवारांचीच माणसे पहात आहेत. निदान ताईंचे तसे निरीक्षण आहे. त्यामुळे त्यांनी ते वृत्तपत्रांतून मांडले. अजित पवार आणि गुरु एंटरप्राईजेस् हे एकच आहेत आणि गुरु एंटरप्राईजेस्च्या नावावर अजित पवारच हा कारखाना ताब्यात घेत आहेत असा आरोप ताईंनी केला आहे. त्यावर अजित पवार चवताळणे साहजिक आहे. त्यांनी गुरु एंटरप्राईजेस्वर काहीही न बोलता ताईंवरच तोफ डागली. या निमित्ताने महाराष्ट्राला ताई आणि दादा यांच्यातली जुगलबंदी ऐकायला मिळत आहे. ताईंनी दादांवर गुरु एंटरप्राईजेस्शी हातमिळवणी केल्याचा आरोप केला, त्यावर दादांनी त्याचा कसलाही खुलासा न करता ताईंची बुद्धी भ्रष्ट झाली आहे, असा प्रत्यारोप केला. ताईंची बुद्धी भ्रष्ट झाली आहे की नाही याच्याशी लोकांना काही कर्तव्य नाही. परंतु अजित पवार यांचा व्यवहार भ्रष्ट झाला आहे की नाही, याच्याशी मात्र लोकांना कर्तव्य आहे. म्हणून ताई दादांना गुरु एंटरप्राईजेस् विषयी खुलासा करण्याचे आव्हान देत आहेत आणि दादा नेमके तेच टाळत आहेत. महाराष्ट्राच्या साखर कारखानदारीवर वर्चस्व ठेवण्याच्या वेडापायी पवार काका-पुतणे हे कारखाने कोणाच्या घशात घालण्याचा प्रयत्न करत आहेत ही गोष्ट खरोखरच चिता वाटावी अशी आहे.

Leave a Comment