खडकवासल्यातून वांजळे यांच्या पत्नीने निवडणूक लढविण्याचे चित्र

पुणे – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आमदार रमेश वांजळे यांच्या आकस्मिक निधनामुळे रिकाम्या झालेल्या खडकवासला मतदारसंघातील पोटनिवडणूक वांजळे यांची पत्नी हर्षदा यांनीच लढवावी यासाठी अनेक राजकीय पक्षाचे नेते हर्षदा यांची भेट घेत असल्याचे समजते. हर्षदा वांजळे या सध्या जिल्हा परिषदेत काँग्रेस सदस्य आहेत. त्यांनी कोणत्याही पक्षाकडून खडकवासल्याची जागा लढविली तरी त्या नक्की विजयी होतील असा विश्वास सर्वच राजकीय पक्षांना वाटतो आहे व त्यामुळे त्यांनी आपल्याच पक्षाकडून निवडणूक लढवावी यासाठी त्यांची मनधरणी विविध पक्षांचे नेते करत आहेत.
    याबाबत बोलताना हर्षदा वांजळे सांगतात की त्यांचे पती रमेश यांनाही हर्षदा यांना एक दिवस आमदार म्हणून पाहण्याची इच्छा होती. वांजळे यांची अनेक स्वप्ने अपुरी राहिली त्यातीलच हे एक. हर्षदा यांच्या म्हणण्यानुसार त्यांच्या क्षमतेवर रमेश यांचा पूर्ण विश्वास होता व म्हणूनच त्यांनी पत्नीला असे सांगितले होते की एक दिवस मी तुला आमदार बनवीनच. पतीचे निधन हा आपल्यासाठी फार मोठा भावनिक आणि मानसिक धक्का असल्याचे सांगून त्या म्हणाल्या की मला अनेक नेते निवडणूक लढवावी यासाठी भेटत आहेत हे खरे असले तरी अद्याप मी त्याबाबत कोणताही विचारच केलेला नाही. माझी मुले अजून लहान आहेत, आणि माझ्यावर इतरही अनेक जबाबदार्‍या आहेत त्यामुळे ही निवडणूक लढवायची का नाही याचा निर्णय आत्ताच घेणे मला अवघड वाटते आहे. मात्र या महिनाअखेर त्याबाबत निश्चित निर्णय घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
   रमेश यांच्या निधनानंतर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हर्षदा यांचे सांत्वन करण्यासाठी भेट घेतली होती व या आठवड्यात ते पुन्हा त्यांना भेटणार आहेत. वांजळे यांच्या निधनानंतर हर्षदा यांचे सांत्वन करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, भाजपच्या आमदार माधुरी मिसाळ, के्रंद्रीय मंत्री विलासराव देशमुख यांनीही त्यांची भेट घेतली होती.
  मनसेचे पुणे शहर महासचिव अनिल शिदोरे यांनी आपले वरीष्ठ नेते खडकवासल्यातील पोटनिवडणूकीसंदर्भात हर्षदा वांजळे यांच्या संपर्कात असल्याचे सांगितले आहे. पक्षाचे वरीष्ठ नेते राम कदम हेही हर्षदा यांच्या सतत संपर्कात आहेत.
  हर्षदा वांजळे सांगतात रमेश वांजळे यांनीत्यांना आमदार बनविण्याचे स्वप्न जसे पाहिले होते तसेच मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनाही महाराष्ट्रच्या मुख्यमंत्रीपदी पाहण्याचे स्वप्नही उराशी बाळगले होते. राजसाहेबांवर त्यांची दृढ निष्ठा होती आणि एक दिवस राज ठाकरे महाराष्ट्रचे नेतृत्त्व करणारच अशी त्यांची खात्रीही होती.

Leave a Comment