कसा असेल फेरबदल

    आपले पंतप्रधान कणखर आहेत आणि ते आता आपल्या मंत्रिमंडळात फेरफार करणार आहेत. पंतप्रधानांनी काल देशातल्या गिन्याचुन्या संपादकांना एकत्रित करून त्यांच्याशी चर्चा केली आणि आपला कणखरपणा दाखवून दिला. आपण दुबळे नाही. दुबळे नव्हतो आणि कणखरपणानेच काम करणार आहोत असे ते म्हणाले. आपण, कणखर आहोत हे त्यांनी सांगावे असा काँग्रेस नेत्यांनी त्यांच्या मागे तगादा लावला होता. मग त्यांनी सोनिया गांधी यांची परवानगी घेऊन पत्रकारां समोर आपण कणखर आहोत असे जाहीर केले. एका घर मालकाने आपल्या घरात एक पाटी लावली होती. तिच्यावर, ‘मी या घराचा मालक आहे. तसे म्हणण्याची परवानगी मला माझ्या बायकोने दिली आहे.’ असे लिहिले होते. असे आपले पंतप्रधान, ‘मी पंतप्रधान म्हणून निर्णय घेण्यास स्वतंत्र आहे आणि तसे म्हणण्याची अनुमती मला सोनियाजींनी दिली आहे,’ असे म्हणत आहेत. ते आपल्या मंत्रिमंडळातून भ्रष्ट मंत्र्यांना काढून टाकण्यास मुखत्यार आहेत. तसे ते शब्दाने म्हणत आहेत पण ते मुखत्यारपद त्यांना सोनिया गांधी यांचा हिरवा बावटा मिळाल्याशिवाय राबवता येत नाही. असे हे आपले पंतप्रधान आता आपल्या मंत्रिमंडळात काही फेरबदल करणार आहेत. फेरबदल कसे असावेत याबाबत त्यांना अधिकार आहेच कारण ते पंतप्रधान आहेत. पण, आपण फेरबदल करणार आहोत हे जाहीर करण्यास मात्र त्यांना सोनिया गांधी यांची परवानगी घ्यावी लागली आहे.
    कसे का असेनात पण मंत्रिमंडळात फेरबदल होणार आहेत.अनेकदा जनतेचा आत्मविश्वास वाढविण्या साठी तसेच पक्ष कार्यकर्त्यांचे मनोधैर्य उंचावण्यासाठीही मंत्र्यांच्या खात्यात बदल करण्याचा आटापिटा केला जात असतो. अशा फेरबदलामुळे सरकारचा कारभार फार सुधारलेला आहे असे  कधी दिसलेले नाही. पण त्यावर   सरकार स्वतःवरच खुष असते. सध्या केंद्र सरकार कमालीचे अकार्यक्षम, पंतप्रधान उदासीन आणि मंत्रिमंडळ आपापसातील हेवेदाव्यात गुंतलेले आहे. त्यामुळे मंत्रिमंडळ फेरबदलासारखा एखादा उपाय योजण्याचा विचार पंतप्रधानांच्या मनात आला आहे. सहा महिन्यांपूर्वी असाच प्रयत्न झाला होता. पण तो निरर्थक ठरला. मंत्रिमंडळात सहभागी असलेल्या घटक मित्रपक्षांच्या मंत्र्यांमध्ये बदल करण्याचा अधिकार पंतप्रधानांना नसतो.
पंतप्रधानांनी केवळ काँग्रेसच्या मंत्र्यांच्या खात्यात बदल केले. तेही अगदी वरवरचे होते. त्यामुळे त्या बदलाने फार काही साध्य झालेच नाही.
     आता पंतप्रधानांनी मंत्रिमंडळ फेरबदलाचा नवा हप्ता सादर करण्याचे ठरवले आहे. यातही घटक पक्षांच्या मंत्र्यांत बदल होणार की नाही याचा काही खुलासा झालेला नाही. मात्र त्यातले तीन बदल हमखास समजले जात आहेत. शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे यांच समावेश, वस्त्रोद्योग मंत्री दयानिधी मारन यांची गच्छंती आणि तृणमूल काँग्रेसचे रेल्वे राज्यमंत्री मुकूल रॉय यांना बढती असे घटक पक्षाच्या बाबतीतले तीन बदल असतील.  बाकीचे मंत्रिमंडळातले फेरबदल काँग्रेसमध्येच करावे लागणार आहेत आणि या फेरबदलाला राजकीय महत्व आलेले आहे. या फेरबदलात काही ज्येष्ठ मंत्र्यांविषयी चर्चा सुरू आहे. त्यातल्या पी. चिदंबरम्, प्रणव मुखर्जी, एस.एम. कृष्णा, सुशीलकुमार शिदे, मुरली देवरा, पी.सी. जोशी या मंत्र्यांच्या खात्यात काही मोठे बदल होतील असा अंदाज आहे. पी. चिदंबरम् यांनी गृह खात्याला तसा चांगला न्याय दिलेला आहे. त्यांनी हे खाते सांभाळल्यापासून भारतातल्या दहशतवादी कारवाया बर्यााच कमीही झालेल्या आहेत. परंतु त्यांना नक्षलवादविरोधी मोहिमेत अपयश आले आहे आणि तेलंगण राज्य निर्मितीचा प्रश्न त्यांना हाताळता आलेला नाही. त्यामुळे पंतप्रधान त्यांचे खाते बदलण्याच्या विचारात आहेत.
    केंद्रीय मंत्रिमंडळात फार वादग्रस्त न ठरता आणि भ्रष्टाचारात लिप्त न होता काम करणारे मंत्री म्हणून ए.के. अँटनी यांच्याकडे पाहिले जाते. ते सोनिया गांधी यांच्या मर्जीतले मंत्री आहेत आणि त्यांना प्रमोशन देण्याचा विचार सुरू आहे. परिणामी त्यांना गृहमंत्री केले जाईल आणि पी. चिदंबरम् यांना नंबर दोनच्या समजल्या जाणार्याा गृह खात्यातून काढून नंबर चारच्या संरक्षण खात्यात टाकले जाईल. चिदंबरम् आणि प्रणव मुखर्जी यांच्यात संघर्ष आहे. तो मुख्यत्वे वर्चस्वावरून आहे आणि त्यांच्या वाढत्या वर्चस्वाचा धोका मनमोहनसिग यांनाच आहे. त्यामुळे चिदंबरम् यांच्या बरोबरच प्रणव मुखर्जी यांचेही अवमूल्यन करणे पंतप्रधानांना सोयिस्कर ठरणार आहे. त्यामुळेच प्रणव मुखर्जी यांची बदली परराष्ट* खात्यात होऊ शकते. तिथे असलेले एस.एम. कृष्णा एखाद्या राज्याचे राज्यपाल होऊन मंत्रिमंडळातून बाहेर जातील.
गेल्या काही दिवसांपासून देशाचे अर्थमंत्रीपद एखाद्या अर्थतज्ञाला देण्याविषयी चर्चा सुरू आहे. या फेरबदलात प्रणव मुखर्जी यांच्या जागी अहलुवालिया, रंगराजन असा एखादा अर्थतज्ञ अर्थमंत्रिपदाची सूत्रे हाती घेऊ शकेल. श्री. सुशीलकुमार शिदे यांना दिलेले वीज निर्मितीचे उद्दिष्ट पूर्ण करता आलेले नाही  त्यामुळे पंतप्रधान शिदे यांच्यावर नाराज असल्याचे वृत्त आहे. तेव्हा सुशीकुमार शिदे यांची ऊर्जा काढून घेतल्यास नवल वाटणार नाही. 

Leave a Comment