स्वच्छता आणि पर्यावरण संरक्षणाला गती देणार – ढोबळे

पुणेः पालखी सोहळयाचे औचित्य साधून राज्यशासनाच्या स्वच्छता विभागाची ’स्वच्छता दिडी’ स्वच्छतेचा संदेश गावागावात पोहोचविणार असल्याची माहिती राज्याचे स्वच्छता आणि पाणीपुरवठा मंत्री प्रा. लक्ष्मणराव ढोबळे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली.
     आळंदी आणि देहूपासून पंढरपूर येथे निघालेल्या वारीमधे स्वच्छता विभागाच्या १६ स्वच्छता दिडया आणि १६ स्वच्छता रथ सहाभागी झाले असून कीर्तन प्रवचन भारूड पथनाटय याद्वारे स्वच्छतेबाबत जनजागृती करण्यात येत असल्याचे ढोबळे यांनी सांगितले. विशेषतः मुक्कामाच्या ठिकाणी वारकरी आणि स्थानिक ग्रामस्थ यांच्यात जनजागृती करण्याबरोबरंच स्वच्छतेच्या प्रयत्नांचा आढावाही घेतला जात आहे. तसेच मुक्कामाच्या १४ ठिकाणी स्वच्छताविषयक जाणीव जागृती करणाया व्याख्यानांचेही आयोजन करण्यात येत आहे. स्वच्छता दिडीचा समारोप एकादशीच्या दिवशी पंढरपुरात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत केला जाणार आहे.
     स्वच्छता प्राधिकरण समितीच्या वतीने २कोटी २५ लाख रूपये खर्च करून यावर्षी वारीत प्रायोगिक तत्वावर २० फिरती शौचालये उपलब्ध करून देण्यात आली आहेत. वारीनंतर ही शौचालये आळंदी आणि देहू येथे ठेवण्यात येणार असून आवश्यकतेनुसार पश्चिम महाराष्ट्रात विविध ठिकाणी ती उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. हा प्रयोग यशस्वी ठरल्यास पुढील वर्षापासून अशी शंभर फिरती शौचालये उपलब्ध करून दिली जातील असे ढोबळे यांनी नमूद केले. मुक्कामाच्या गावी स्वच्छतेसाठी प्रत्येक गावांना २ लाख रूपयांचे अनुदान देण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. एकादशी ते वसुबारस या कालावधीत पंढरपुरात केवळ १० रूपयात झुणका भाकरी आणि औषधे देणारी केंद्र उभारणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले.
  सन २०१५ पर्यंत संपूर्ण राज्य निर्मल करण्याचा राज्य शासनाचा संकल्प असून त्यासाठी स्वच्छता आणि पर्यावरण संरक्षणाच्या उपक्रमांना गती देणार असल्याचे ढोबळे यांनी सांगितले. ग्रामविकास मंत्री जयंत पाटील यांनी नुकत्याच शंभर गावात सभा घेऊन स्वच्छता घरपट्टी पाणीपट्टीची पूर्तता पर्यावरण संरक्षण वृक्षारोपण निर्मल ग्राम याबाबत जनजागृती केली आहे. लवकरंच पाटील यांच्यासह आपण राज्यातील सर्व जिल्हयातील गावात ३३ दिवसाचा दौरा करून पर्यावरण आणि स्वच्छतेचा आढावा घेणार असल्याचे ढोबळे यांनी सांगितले. त्याचप्रमाणे राज्यातील ९हजार ८२ निर्मल गावांचे सरपंच आणि सर्व नगरपरिषदांच्या मुख्याधिकायांची बैठक येथील ’यशदा’ येथे आयोजित केली जाणार असून त्यांना स्वच्छता आणि पर्यावरण संरक्षणाच्या उपक्रमांना गती देण्याचे निर्देश दिले जाणार आहेत.
     घरात शौचालय नसल्याबद्दल सोलापूर जिल्हयातील १हजार २२२ ग्रामपंचायत सदस्यांचे सदस्यत्व रद्द करण्याची कारवाई कडक असली तरीही ती कायद्यानुसार आवश्यकंच असून इतरांनी त्यापासून बोध घ्यावा असा इशारा देऊन प्रा. ढोबळे म्हणाले की शौचालय नसलेल्या शासकीय कर्मचारी अधिकायांची वेतनवाढ रोखणे शिस्तभंगाची कारवाई करणे याबाबत सन २००५मधेच शासन निर्णय झालेला आहे. या निर्णयाची यापुढे कडक अंमलबजावणी केली जाणार आहे.
     राज्यातील १८९० मोठया ग्रामपंचायतींना घनकचरा व्यवस्थापनाचा प्रश्न भेडसावित आहे. याबाबत उपाययोजना करण्यासाठी या ग्रामपंचायतींना प्रतिवर्षी १५ लाख रूपयांचा निधी तीन वर्षापर्यंत देण्याची योजना प्रस्तावित असून त्यात ६० टक्के केंद्राचा २० टक्के राज्य शासनाचा आणि २० टक्के गावाचा सहभाग असावा अशी अपेक्षा असून त्याबाबतचा प्रस्ताव केंद्राकडे सादर केला आहे असेही प्रा. ढोबळे यांनी सांगितले.    
 
 

2 thoughts on “स्वच्छता आणि पर्यावरण संरक्षणाला गती देणार – ढोबळे”

Leave a Comment