पुणे आयुक्तांची मुकुंद भवन ट्रस्टला क्लीन चीट

पुणे दि.११-पुण्यातील येरवडा भागातील ३२६ एकर सरकारी जागेचे वादगस्त हस्तांतरण प्रकरणात कांहीही बेकायदेशीर नसल्याचा अहवाल पुणे विभागीय आयुक्त दिलीप बंड यांनी दिला आहे.

    याविषयीची सविस्तर हकीकत अशी की विरोधी पक्ष नेते एकनाथ खडसे यांनी कांही महिन्यापूर्वी येरवडा येथील सरकारी मालकीची ३२६ एकर जमीन बेकायदेशीररित्या हस्तांतरीत करण्यात आल्याचा आरोप करून त्यासंबंधीची कांही कागदपत्रेही सादर केली होती. ही जमीन अस्तित्वात नसलेल्या मुकुंद भवन ट्रस्टला देण्यात आली असून यात कृषीमंत्री शरद पवार आणि टूजी स्पेक्ट्रम घोटाळाप्रकरणात सध्या तिहार तुरूंगात असलेला शाहीद बलवा यांचा संबंध असल्याचा आरोपही खडसे यांनी केला होता. बलवाच्या डी.बी. रिअॅलिटीला देण्यात आलेल्या या जमिनीत सध्या पंचशील रिअॅलिटीचे पंचशील टेक पार्क आणि पंचतारांकित हॉटेल असून यात खासदार सुप्रिया सुळे आणि त्यांचे पती सदानंद यांचेही समभाग आहेत.  पुण्याचे तत्कालिन जिल्हाधिकारी श्रीनिवास पाटील यांनी १९९० साली न्यायालयाबाहेर तडजोड करून ही जागा मुकुंद भवन  ट्रस्टला दिली होती. श्रीनिवास पाटील सध्या राष्ट्रवादीचे कराड येथील खासदार आहेत. हा सर्वच व्यवहार बेकायदेशीर असल्याचा आरोप एकनाथ खडसे यांनी विधानसभेत केल्यानंतर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी या संबंधी चौकशीचे आदेश देऊन हे चौकशीचे काम पुणे विभागीय आयुक्त दिलीप बंड यांच्याकडे सोपविले होते.

  दिलीप बंड यांनी या सर्व व्यवहाराची पूर्ण चौकशी केली असून त्यात बेकायदेशीर कांहीही आढळले नसल्याचे सांगितले आहे मात्र तपशील सांगण्यास त्यांनी नकार दिला आहे. गुप्ततेचे कारण त्यासाठी त्यांनी पुढे केले असून चौकशीचा अहवाल सरकारला सादर केला जाणार असल्याचे व नंतर तो अहवाल विधानसभेत मांडला जाणार असल्याचे सांगितले.

Leave a Comment