आता तरी सावध व्हा

जैतापूर हा महाराष्ट्रातला मोठा ट्रबल स्पॉट झाला आहे कारण तिथे उभारला जात असलेला अणुवीज प्रकल्प धोकादायक आहे.तो भूकंप प्रवण क्षेत्रात आहे आणि आजवर तिथे भूकंपाचे ९२ धक्के बसले आहेत.अणुवीज प्रकल्प, समुद्र आणि भूकंपाचा धक्का यांचा असा काही संयोग झाला आहे की त्यामुळे अशा केन्द्रांबाबत सावधानता बाळगावी लागत आहे.जपानमधील फुकीशिमा येथील अपघाताने सार्यां जगालाच सावध केले आहे.सगळे जग सावध झाले. जर्मनीने आपले प्रस्तावित अणुवीज केन्द्रांचे काम तीन महिने पुढे ढकलले पण भारतात याबाबत काहीही सावधानता बाळगली जात नसल्याचे दिसत आहे. आता भारतातही असेच होणार का? अशी चर्चा सुरू झाली आहे. जपानमध्ये हे होऊ शकत असेल तर भारतात नक्कीच होईल. जपान हा प्रगत औद्योगिक देश आहे. तिथे औद्योगिक सुरक्षेची बंधने कसोशीने पाळली जातात. याबाबत तिथले लोक फार दक्ष आहेत. असे असूनही तिथे हा प्रकार होतो तर मग भारतात जिथे सुरक्षिततेच्या उपयांबाबत कमालीची बेफिकिरी असते तिथे तर हा प्रकार कधीही संभवतो. म्हणून जपानच्या या प्रकारानंतर भारतामध्ये धोक्याचा लाल कंदिल दाखवला गेला.
   
गेल्या सात-आठ वर्षांपासून भारताचे पंतप्रधान मनमोहनसिंग हे भारतात अणु वीज प्रकल्प मोठ्या संख्येने उभारावेत यासाठी प्रयत्नशील आहेत. अणु ऊर्जा ही पर्यावरणाची नासाडी न करणारी सर्वात स्वच्छ ऊर्जा आहे, असा त्यांचा दावा आहे आणि त्यामुळेच त्यांचा अणु ऊर्जेवर जोर आहे. असे असले तरी महाराष्ट्रात जैतापूर येथे होऊ घातलेल्या अणु वीज प्रकल्पांच्या बाबतीत अनेक शंका-कुशंका उपस्थित झालेल्या आहेत आणि अशा स्थितीत हा प्रकल्प उभारावा की नाही, असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. अणु ऊर्जा आयोगाचे अध्यक्ष अनिल काकोडकर यांनी या संबंधातल्या सर्व शंकांचे निरसन करण्याचा प्रयत्न केला आहे. पण तरीही भारतामध्ये अणु वीज प्रकल्पांच्या सुरक्षिततेच्या दाव्यांना आक्षेप घेणारा एक वर्ग आहेच. अणु वीज प्रकल्पातून किरणोत्सर्जन झाले तरच त्याला धोका म्हणावे असे काही नाही. अणु वीज प्रकल्पातून छोटे-मोठे अन्यही दोष दिसून येत असतात आणि त्याचे काही परिणाम आपल्याला भोगावे लागत असतात. भारतामध्ये १९८७ पासून आजपर्यंत असे अनेक अपघात झाले आहेत आणि अणु प्रकल्पाच्या समर्थकांचे सुरक्षिततेतेचे दावे तपासून पाहण्याची वेळ आली आहे असे मत आता काही तज्ञ मांडायला लागले आहेत.
   
गतवर्षी एका आरोग्यविषयक संस्थेने केलेल्या पाहणीमध्ये अणु ऊर्जा प्रकल्पात नोकर्या  करणारे लोक कमी वयात काही गूड रोगांना बळी पडल्याचे आढळले होते. हा अहवाल अणु ऊर्जा आयोगासमोर ठेवण्यात आला. परंतु आयोगाने हा केवळ योगायोग आहे असे म्हणून या अहवालाची छाननी करण्याची टाळाटाळ केली. असे असले तरी काही अणु ऊर्जा प्रकल्पात झालेले छोटे-मोठे अपघात दुलर्क्षित करता कामा नयेत असे वाटते. १९८७ साली तामिळनाडूतील कल्पकम् येथील अणु ऊर्जा केंद्रात एक छोटा अपघात होऊन फास्ट ब्रिडर टेस्ट रिअॅक्टर नादुरुस्त झाला होता आणि त्यानंतर दोन वर्षे या संयंत्राचे काम बंद ठेवण्यात आले होते. तारापूरमध्ये तर १९८९, १९९२ आणि १९९९ असे तीन वेळा छोटे अपघात झाले आहेत. १९८९ च्या अपघातात किरणोत्सर्जनाचा धोका निर्माण झाला होता आणि तो कमी करण्यासाठी एक वर्षे हे संयंत्र बंद ठेवण्यात आले होते. १९९२ साली या संयंत्रात पुन्हा एकदा किरणोत्सर्जन झालेही होते आणि १९९९ साली जड पाणी प्रकल्पातून चार टन जड पाणी लिक झाले होते. राजस्थानातील कोटा येथे चार पंपांमध्ये आग लागल्यामुळे कुलींग सिस्टीम म्हणजे शीतकरण यंत्रणा उद्ध्वस्त होण्याचा धोका निर्माण झाला होता.
   
अणु ऊर्जा प्रकल्पातील ही यंत्रणा फार महत्वाची असते आणि तीच बिघडल्यामुळे जपानमध्ये फुकुशिमा येथे स्फोट झालेले आहेत हे विसरता येत नाही. उत्तर प्रदेशात बुलंद शहर येथे असलेल्या नरोडा अणु वीज प्रकल्पात वाफेच्या टर्बाईनमध्ये आग लागल्यामुळेही जड पाणी विभाग उद्ध्वस्त झाला होता. कर्नाटकात कैगा येथे अणु वीज प्रकल्प आहे. तिथे २००९ साली पिण्याच्या पाण्यामध्ये ट्रीटियमचे प्रदूषण झाले होते. ट्रीटियम हा हैड्रोजनचा किरणोत्सारी आयसोटोप आहे. त्याचे प्रदूषण झाल्यामुळे प्रदुषित झालेले पाणी पिऊन ५० कर्मचारी आजारी पडले होते. राजस्थानातल्या कोटा येथील अणु वीज प्रकल्पातही दोन वेळा छोटे-मोठे अपघात झालेले आहेत. तेव्हा जपानमधली स्थिती फार वेगळी होती, भारतात असे काही होणार नाही असे आत्मसंतुष्ट होऊन आपण बेसावध राहिलो तर मोठी कठीण परिस्थिती उद्भवू शकते. मुळातच आपण भारतीय लोक सुरक्षिततेच्या उपायांच्या बाबतीत निष्काळजी आहोत. त्यातच या वीज प्रकल्पांमध्ये छोट्या-मोठ्या अपघातांचे परिणाम गंभीर स्वरुपाचे होत असतील तर आपल्याला या ऊर्जा प्रकल्पांमध्ये फारच सावध रहावे लागेल.

Leave a Comment