गोवा : राष्ट्रवादीत सुंदोपसुंदी, केंद्रीय नेते गोव्यात येण्याची शक्यता

पणजी दि.२५ – गोव्यात सत्तेवर असलेल्या काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस युती आघाडीत सध्या जोरदार सुंदोपसुंदी सुरू आहे.राष्ट्रवादीच्या दोन मंत्र्यांना काढून त्याजागी पक्षाचे दुसरे आमदार तथा माजी मंत्री मिकी पाशेको यांचा मंत्रीमंडळात समावेश करण्यात यावा,अशी जोरदार मागणी राष्ट्रवादीच्या एका गटाकडून केली जात आहे.मिकींना मंत्री न केल्यास सरकारचा पाठींबा काढून घेतला जाईल, असा इशाराही राष्ट्रवादीच्या या प्रबळ गटाने मुख्यमंत्री दिगंबर कामत यांना दिला आहे. महत्वाचे म्हणजे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार तथा दिल्लीतील अन्य वरिष्ठ नेत्यांचा आपणास पाठींबा असल्याचा दावा या गटाने केला आहे.

मिकी व त्यांच्या समर्थकांनी नुकतीच दिल्लीत शरद पवार, पी. ए. संगमा, प्रफुल्ल पटेल आदींची भेट घेतली होती. पक्ष नेतृत्वाने यापूर्वीच आपल्या मंत्रीमंडळ समावेशाबाबत मुख्यमंत्री कामत यांच्याशी चर्चा केल्याचा दावा पाशेको यांनी केला आहे. गोव्यात ४० सदस्यीय विधानसभेत राष्ट्रवादीचे एकूण ३ आमदार असून काँग्रेसचे १७ आमदार आहेत. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात व विशेष करून पक्षाच्या संघटनात्मक पातळीवर अलिकडच्या काळात जोरदार संघर्ष छेडला गेल्याने त्याची परिणती पक्षाच्या विधिमंडळ गटात फूट पडण्यापर्यंत झाली आहे. पक्षाचे माजी मंत्री मिकी पाशेको यांना मैत्रिणीच्या आत्महत्याप्रकरणात पोलिसांनी अटक केल्यानंतर हा संघर्ष अधिक तीव्र झाला. अर्थातच अटकेमुळे मिकींना मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता.

काँग्रेसमधील काही नेते व खुद्द राष्ट्रवादीमधील एक गट आपणाविरूध्द सक्रीय असल्यानेच आपणाविरूध्द हे कुभांड रचले गेल्याचा उघड आरोप मिकींनी विधानसभेत व विधानसभेबाहेर केला होता. यातील महत्वाची गोष्ट अशी की, सुरूवातीला राष्ट्रवादीचे दिल्लीतील नेते मिकी यांना दोषी मानत असावेत, परंतू नंतरच्या काळात घडलेल्या काही घटनांमुळे त्यांनी मिकींच्या पाठीशी राहण्याचा निर्णय घेतला आहे. मिकी हे कामत मंत्रीमंडळातून बाजूला होताच राष्ट्रवादीची मंत्रीमंडळातील ताकद कमजोर झाल्याचे तसेच मिकींच्या नसण्याचा काँग्रेसकडून फायदा उठवला जात असल्याचे शरद पवार व इतरांच्या लक्षात आले असावे. त्यातच वास्कोचे आमदार तथा राष्ट्रवादीचे मंत्री जुझे फिलीप डिसोझा यांची काँग्रेसशी वाढणारी जवळीक राष्ट्रवादीसाठी चिंतेची बाब ठरली.

मध्यंतरी जुझे फिलीप डिसोझा यांच्या कार्यकर्त्यांनी मिकींना वास्कोत भररस्त्यात बदडले. या मारहाणीचा विषयही पक्षाने गांभीर्याने घेतला. काँग्रेसशी जवळीक करणाऱ्या जुझे फिलीप डिसोझा व दुसरे मंत्री निळकंठ हळर्णकर यांना मंत्रीमंडळातून काढून त्यांच्याजागी मिकींची वर्णी लावा, अशी सूचना राष्ट्रवादीच्या दिल्लीतील नेत्यांनी मुख्यमंत्री कामत यांना केल्याची चर्चा होती. खुद्द मिकी यांनी ही गोष्ट जाहीररीत्या सांगितली आहे. परंतू मुख्यमंत्र्यांनी अद्याप तरी तसे केलेले नाही. परिणामी मिकी व त्यांचे समर्थक पुन्हा दिल्लीत जाऊन पवार व अन्य नेत्यांची भेट घेऊन आले. दिल्लीकडे निघण्यापूर्वी त्यांनी सरकारचा पाठींबा काढून घेण्याचीही धमकी दिली होती. प्राप्त माहितीनुसार पुढील आठवड्यात राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते गोव्यात दाखल होणार असून राष्ट्रवादीतील संघर्ष निकाली काढून मिकींच्या मंत्रीमंडळातील समावेशाबद्दल ठोस निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीत निर्माण झालेला तणाव, पक्षांतर्गत संघर्ष, काही आमदारांनी आपल्याच सरकार व मुख्यमंत्र्यांविरूध्द घेतलेल्या उघड भुमिकेमुळे त्रस्त बनलेले मुख्यमंत्री कामतही सध्या दिल्ली दौऱ्यावर असून विद्यमान तणाव दूर करण्यासाठी त्यांचीही जोरदार धडपड सुरू आहे.

Leave a Comment