सोलापूर : माजी अपक्ष आ. रविकांत पाटील भाजपाच्या वाटेवर

सोलापूर २१ मार्च – इंडी मतदारसंघातून लागोपाठ तीन वेळा आमदार झालेले सोलापूर व इंडीत लोकप्रिय असलेले नेते,माजी अपक्ष आमदार रविकांत पाटील हे भाजपाच्या वाटेवर आहेत.त्यांनी मबईत भाजपा अध्यक्ष नितीन गडकरी यांची अलिकडेच भेट घेतल्याचे सूत्रांनी सांगितले.इंडीमध्ये लवकरच विधानसभेची पोटनिवडणूक होणार आहे.तेथून रविकांत पाटील भाजपाकडून लढण्यास इच्छुक आहेत.

तीन वर्षापूर्वी झालेल्या निवडणुकीत रवी पाटील यांचा भाजपाचे डॉ. सार्वभौम बगली यांनी पराभव केला होता. त्यावेळी रविकांत पाटील भाजपाकडून निवडणूक लढवण्यास तयार होते. पण उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी अपक्ष म्हणून लढत दिली. दरम्यान आ. बगली यांनी भाजपाशी दगाबाजी करुन कुमारस्वामी व देवेगौडा यांना साथ देण्याच्या प्रयत्न केला. त्यामुळ ते अपात्र ठरले. सर्वोच्च न्यायालयातील निकाल त्यांच्याविरोधात गेला. यामुळे कर्नाटकातील इंडीसह अन्य मतदारसंघात पोटनिवडणुका होणार आहेत. नितीन गडकरी मुंबईत असताना रविकांत पाटील यांनी मुंबई गाठून त्यांची भेट घेतल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. गतवेळच्या पराभवानंतरही पाटील यांनी पुणे विभाग पदवीधर मतदारसंघ प्रचाराप्रसंगी सोलापुरात गोपीनाथ मुंडे यांची भेट घेतली होती. त्यांच्या राजकीय संन्यासाच्या बातम्या त्याकाळात प्रसिध्द झाल्या होत्या. आता इंडी पोटनिवडणुकीनिमित्त पाटील पुन्हा भाजपात प्रवेश करुन भाजपातर्फे निवडणूक लढवण्यासाठी प्रयत्नशील आहेत.

पोटनिवडणुकीपाठोपाठ सोलापूर जिल्ह्यात नगरपालिका, मनपा, जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत. अक्कलकोट, मंगळवेढा, दक्षिण सोलापूर आणि सोलापूर मनपात त्यांचा प्रवेश भाजपाला फायदेशीर ठरणार आहे. स्थानिक नेत्यांशी चर्चा केल्यानंतर रविकांत पाटील यांच्या भाजपा प्रवेशाचा फैसला होणार आहे. रविकांत पाटील यांचा जनसंपर्क, कार्यकर्त्यांची मोठी फळी आणि चाहत्यांची संख्या पाहता त्यांच्या भाजपा प्रवेशामुळे भाजपाचे बळ मोठ्या प्रमाणात वाढणार आहे