विकिलिक्सचा दणका

केंद्र सरकारला काही चांगले दिवस नाहीत.सदोदित कोणी ना कोणी दणका देतच आहे.इतके दिवस विविध प्रकारचे दणके खाऊन गलितगात्र झालेल्या सरकारला काल विकिलिक्सचा दणका बसला.हा दणका म्हटले तर काहीच नाही आणि म्हटले तर गंभीर आहे.या म्हणण्यामागचे कारण समजून घेतले पाहिजे.या आधी विकिलिक्स काय आहे आणि त्याने आता भारताच्या संबंधात काय आणि कसली माहिती गोळा केली आहे हे लक्षात घेतले पाहिजे. विकिलिक्सला मिळणारी माहिती अमेरिकेतून मिळत आहे. सामान्यतः अमेरिकेतल्या काही स्रोतांकडून अमेरिकेच्या विविध देशांतल्या प्रतिनिधींनी आपल्या सरकारला म्हणजेच परराष्ट्र व्यवहार खात्याला पाठविलेले संदेश या विकिलिक्सच्या विल्यम्स असांजे याने मिळवले आहेत. या संदेशांना केबल्स म्हटले जाते.आता त्याने केलेला गौप्यस्फोट म्हणजे भारतात घडलेल्या घटनांची बखर नाही. भारतात जे काही घडत होते त्याचा भारतातल्या प्रतिनिधींनी अमेरिकेच्या सरकारला जो वृत्तांत पाठवला आहे आणि त्यावर आपली टिप्पणी केली आहे. तो वृत्तांत असांजे याने मिळवले आहेत आणि ते प्रसिद्ध केले आहेत.
   
असांजे याला अमेरिकेचे मतलबी परराष्ट्र धोरण प्रकाशात आणायचे आहे म्हणून तो प्रसिद्ध करीत असलेल्या माहितीत अमेरिकेच्या परराष्ट्र धोरणांची माहिती आहे. प्रत्येकाला अमेरिकेचा संदर्भ आहे. भारतात २००८ च्या जुलै महिन्यात मनमोहनसिंग सरकार अडचणीत आले होते. त्या सरकारने अमेरिकेशी अणुकरार केला होता. या करारात भारताचे नुकसान होते. या कराराच्या संदर्भात अनेक गोष्टींचा खुलासा होत नव्हता. आपल्याला या कराराने नुकसान सहन करावे लागणार असे दिसत होते पण मनमोहनसिंग त्याचे स्पष्टीकरण करीत नव्हते. त्या गोष्टी गोपनीय आहेत असे उत्तर देऊन ते वेळ मारून नेत होते. त्यामुळे डाव्या आघाडीने त्यांचा पाठींबा काढून घेतला होता आणि सरकारचे स्थैर्य संकटात आले होते. त्यावेळी सरकार पडले असते तर अमेरिकेचे नुकसान होणार होते कारण मनमोहनसिंग पंतप्रधान असेपर्यंतच अमेरिकेला आपली अणु ऊर्जाविषयक यंत्रे भारताला खपवता येत होती आणि भारत-अमेरिका करार अंमलात येत होता. म्हणून मनमोहनसिंग पडू नये अशी अमेरिकेची इच्छा होती. मनमोहनसिंग सरकार अमेरिकेला आपले सरकार पडणार नाही याबाबत आश्वस्त करीत होते. म्हणूनच खासदार विकत घेऊन आपण सरकार वाचवत आहोत हे काँग्रेसच्या नेत्यांनी अमेरिकेच्या वकिलाला दाखवून दिले होते आणि या कामासाठी वापरल्या जाणार्याी नोटा त्याला दाखवल्या होत्या.
   
हे प्रत्यक्षात असे घडले होते की नाही हे त्या अमेरिकेच्या वकिलाला आणि त्या काँग्रेसच्या नेत्यालाच माहीत पण अमेरिकेच्या भारतातल्या वकिलाने तसे आपल्या सरकारला तसे कळवले. त्याचा तो संदेश आता प्रसिद्ध झाला आहे आणि त्यावरून विरोधकांनी सरकारला धारेवर धरले आहे. विकिलिक्सचा गौप्यस्फोट हा असा आहे. त्याला पुराव्याचा दर्जा नाही. या गौप्यस्फोटाच्या आधारे कोणी सरकारच्या विरोधात न्यायालयात गेले तर त्याचा अर्ज पहिल्याच फटक्यात नामंजूर होईल. कारण एका व्यक्तीने दुसर्यार व्यक्तीला पैसे दिले आणि ते पैसे आपल्याला दाखवले होते असे तिसर्यान माणसाने चौथ्या माणसाला कळवले हा काही पैसे दिल्याचा पुरावा होत नाही. न्यायालये असा पुरावा मानत नाहीत. म्हणूनच असे म्हणावे लागते की या पुराव्याला म्हटले तर महत्त्व आहे आणि म्हटले तर नाही सुद्धा. आता महत्त्व आहे अशासाठी की आता आता खासदार खरेदी फार व्हायला लागली आहे आणि पी.व्ही.नरसिंहराव यांनी १९९१ साली असाच प्रकार केल्यापासून ही खरेदी उघडपणे व्हायला लागली आहे. मनमोहनसिंग यांनी आपले सरकार वाचवताना काही खासदार खरेदी केले असणारच यात काही शंका नाही. मनमोहनसिंग असा काही प्रकार करणार नाहीत. ते सभ्य गृहस्थ आहेत असे मानले जात होते पण आता त्यांच्या चेहर्यागवरचा हा बुरखा उचलला गेला असून त्यांचा खरा चेहरा समोर आला आहे.
   
मनमोहनसिंग हे असा प्रकार करू शकतात असे आता दिसत आहे. त्यांनी तो केल्याचे मागेच उघड झाले होते कारण २००८ सालच्या या ठरावाच्या मतदानाच्या आदल्या दिवशी भाजपाच्या काही खासदारांकडे मनमोहनसिंग यांची माणसे नोटांच्या थैल्या घेऊन गेले होते. त्यातल्या एका भाजपा खासदाराने तर त्या नोटाच संसदेत पेश केल्या होत्या. मनमोहनसिंग यांचे सत्यस्वरूप त्याच काळात उघड झाले असते पण त्याकाळचे लोकसभेचे सभापती सोमनाथ चटर्जी सरकारची तळी उचलण्यात एवढे धन्यता मानायला लागले होते की सरकारला हवे ते केल्याने हे सरकार आपल्याला राज्यपाल किवा राष्ट्रपती करणारच आहे असे त्यांना वाटायला लागले होते. भाजपाच्या खासदारांनी प्रत्यक्षात नोटा सभागृहात आणल्या असतानाही त्यांनी त्याची चौकशी करणे सोडून भाजपालाच खोटे पाडण्याचा प्रयत्न केला आणि सरकारला वाचवले. आता मात्र अमेरिकेच्या वकिलानेच गौप्यस्फोट केला आहे आणि या गौप्यस्फोटाला पुरावा म्हणून मान्यता नसली तरी सरकारला नैतिकदृष्ट्या दोष लागला आहे. सरकार आता अनेक बाजूंनी उघडे पडायला लागले आहे. हे सरकार फार दिवस सत्तेवर राहणे देशासाठी फार हानीकारक ठरणार आहे.   

Leave a Comment