सोलापूर : कॉपीप्रकरणी ३६ विद्यार्थ्यांवर कारवाई

भूमिती परिक्षेदरम्यान भरारी पथकांची कॉपी विरोधी मोहिम – सोलापूर १६ मार्च – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येत असलेल्या दहावी भूमिती परिक्षेच्या दिवशी जिल्ह्यातील भिन्न-भिन्न परीक्षा केंद्रावर कॉपीविरोधी पथकाने केलेल्या कारवाईत ३६ विद्यार्थ्यांवर कारवाई केल्याची माहिती सोलापूर जिल्हा परीक्षा सहनियंत्रक तथा उपशिक्षणाधिकारी मदारगनी मुजावर यांनी दिली.भूमिती परिक्षेच्या दिवशी जिल्ह्यातील उपद्रवी परीक्षा केंद्रावर परिक्षार्थींना कॉपी पुरविल्यासाठी पालकांनी व इतरांनी गर्दी केली होती.

कॉपीविरोधी भरारी पथकाने कारवाई करण्यात आलेल्या शाळांची परीक्षा केंद्राची नावे पुढीलप्रमाणे – लोकसेवा प्रशाला (मंद्रुप) १, जीवन ज्योत प्रशाला (कंदलगाव) ११, जि. प. प्रशाला माढा ३, नागनाथ  विद्यालय (मोहोळ) २, नेताजी प्रशाला मोहोळ ५, गोपाळराव देव प्रशाला माळशिरस ५, आश्रम शाळा येड्राव माळशिरस ६, सिल्व्हर ज्युबिली हायस्कूल बार्शी ३, अशा एकूण ३६ विद्यार्थ्यांवर कॉपीविरोधी पथकाने कारवाई केली. भरारी पथकाचे नेतृत्व उपशिक्षणाधिकारी मदारगणी मुजावर यांनी केले तर त्यांना भरारी पथक सदस्य संतोष जाधव, सातलिग शटगार, लता कटारे, शहाजी शेळके, बोर्ड सदस्य प्रा. सतीश दरेकर, सुनेत्रा पवार, प्रा. सचिन गायकवाड, पल्लवी नाझरे, ‘निरंतर’ चे उपशिक्षणाधिकारी सिद्धेश्वर सगरे, प्रा. चिलवंत, प्रा. सचिन जव्हेकर, महादेव आंबेडकर, शरद उंबरे, प्रीती चिगलवार, समीर गायकवाड, प्रा. वाय. इंटीकर यांनी सहकार्य केले.

भरारी पथकाचे कंदलगाव, मंद्रुपकडे विशेष लक्ष होते. बीजगणित परिक्षेच्या दिवशी ४० विद्यार्थी कॉपीविरोधी भरारी पथकाच्या ताब्यात आले. जिल्हाधिकारी डॉ. जगदीश पाटील यांच्या सक्त सूचनेनुसार कंदलगाव जीवनज्योत प्रशाला व लोकसेवा प्रशाला, मंद्रुपकडे बैठ्या भरारी पथकाने विशेष लक्ष पुरविले. त्यांच्या या धाडीत कंदलगावच्या जीवनज्योत प्रशालेचे तब्बल ११ व मंद्रुपच्या लोकसेवा प्रशालेचा १ विद्यार्थी पथकाच्या जाळ्यात अडकला. लोकसेवा प्रशालेत बैठ्या भरारी पथकाने ठाण मांडल्याने तिथे कॉपी करण्यास परिक्षार्थीना वाव मिळाला नाही. जिल्हाधिकार्यां च्या कडक आदेशामुळे भूमिती परिक्षेच्या दिवशी उपद्रवी परीक्षा केंद्रावर ही परीक्षा सुरळीत होताना दिसली. यामुळे अभ्यासू विद्यार्थी व समंजस पालकांमध्ये समाधानाचे वातावरण पसरले आहे. उर्वरित परीक्षा काळात अशीच धडक मोहिम राबवून ‘कॉपी’ रोखू असा आत्मविश्वास कॉपी विरोधी पथकाने यावेळी दिला.

Leave a Comment