मुंबई : स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या जीवनावरील प्रदर्शनाचे उद्घाटन

मुंबई १५ मार्च – महाराष्ट्राचे शिल्पकार, राज्याचे पहिले मुख्यमंत्री स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या जीवनावरील दुर्मिळ कागदपत्रे व छायाचित्रांच्या प्रदर्शनाचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते सोमवारी उद्घाटन करण्यात आले. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, सांस्कृतिक कार्यमंत्री संजय देवतळे, सांस्कृतिक कार्य राज्यमंत्री फौजिया खान, पुराभिलेख संचालनालयाचे संचालक डॉ. भास्कर धाटावकर आदी मान्यवर उपस्थित होते.

महाराष्ट्र शासनाच्या पुराभिलेख संचालनालय आणि यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमान स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीचे औचित्य साधून या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे आयोजित केलेले हे प्रदर्शन १७ मार्चपर्यंत स. १० ते सायं. ७.३० या वेळेत सर्वांसाठी विनामूल्य खुले आहे. या प्रदर्शनात स्व. यशवंतराव चव्हाण यांचा जीवनपट दुर्मिळ कागदपत्रे आणि छायाचित्राच्या माध्यमातून साकारण्यात आला आहे. स्व. यशवंतराव चव्हाण यांचे बालपण, शैक्षणिक कारकीर्द, स्वातंत्र्य चळवळीतील त्यांचे योगदान यांची दुर्मिळ छायाचित्रे प्रदर्शनात आहेत. राज्यनिर्मिती राज्यपत्र, महाराष्ट्र राज्य स्थापना सोहळा, कोयना जलविद्युत प्रकल्प, देशाचे पहिले पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरु यांचे स्व. यशवंतराव चव्हाणांना पत्र, केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांचा स्व. चव्हाण यांच्याशी पत्रव्यवहार, साहित्यिक आणि कलावंतासमवेत त्यांचे क्षण, स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या विविध भावमुद्रा असलेली छायाचित्रे या प्रदर्शनात पहायला मिळणार आहेत.

Leave a Comment