मुंबई : माफियांचे सरकार हटविल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही – भाजपाचा विराट मोर्चात निर्धार

मुंबई १५ मार्च – महाराष्ट्रातील अलिबाबा आणि चाळीस चोरांचे सरकार लवकरच हटविल्याशिवाय भारतीय जनता पार्टी स्वस्थ बसणार नाही, असा निर्धार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांनी सोमवारी केला.भाजपाच्या वतीने माफिया सरकार हटाव – महाराष्ट्र बचाव आंदोलन हाती घेण्यात आले होते.या आंदोलनाची सांगता प्रचंड मोर्चाने झाली. राज्यभरातील लाखो लोक या मोर्चात सामील झाले होते. नितीन गडकरी आणि पक्षाचे लोकसभेतील उपनेते गोपीनाथ मुंडे यांचे प्रमुख मार्गदर्शन झाले. मोर्चा आणि सभेसाठी आलेल्या आंदोलकांनी आझाद मैदान गच्च भरले होते.

महाराष्ट्रातील काँग्रेस आघाडीचे सरकार हे लुटारुंचे सरकार असल्याचा घणाघाती आरोप करुन गडकरी म्हणाले की, या लुटारुंना सत्तेतून हटविण्यासाठीच व्यापक आंदोलन हाती घेण्यात आले आहे. भाजपाने हाती घेतलेल्या आंदोलनाला जनतेचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. आघाडी सरकारच्या काळात आमदारांकडून महिलांवर बलात्कार होत आहेत. त्यामुळे महिलांसाठी सर्वाधिक सुरक्षित समजल्या जाणार्याह महाराष्ट्रात महिला सुरक्षित राहिलेल्या नाहीत. अतिरिक्त जिल्हाधिकार्या्ला जाळण्याचे कारस्थान महाराष्ट्रात होते, यासारखी दुःखाची आणि संतापाची गोष्ट कुठली असेल. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यावरही गडकरी यांनी जोरदार टीका केली. केंद्रीय दक्षता आयोगाच्या प्रमुखपदी पी. जे. थॉमस यांना नेमण्यास पृथ्वीराज चव्हाणच जबाबदार होते. आता ते आपली जबाबदारी केरळ सरकारवर ढकलत असले, तरी या प्रकरणाची केरळ सरकारची कागदपत्रे माझ्याकडे आहेत. त्यामुळे सदर प्रकरणाची नैतिक जबाबदारी स्वीकारुन त्यांनी तात्काळ मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यायला पाहिजे. राष्ट्रवादीचे काही नेते टगेगिरी करीत आहेत, तथापि या टग्यांची मस्ती आम्ही उतरवू.

भाजपचे लोकसभेतील उपनेते गोपीनाथ मुंडे म्हणाले की, भारतीय जनता भोळी आहे. शंकरही भोळा होता. मात्र, त्यालाही आपला तिसरा डोळा उघडावा लागला. आता भोळ्या जनतेने तिसरा डोळा उघडून हे माफिया सरकारला उध्वस्त करुन टाकावे. हे सरकार हसन अली, भांडवलदार, बांधकाम व्यावसायिकांचे आहे. अतिरिक्त जिल्हाधिकारी यशवंत सोनवणे यांचा कोळसा झाला, त्याला हे सरकार जबाबदार आहे. त्यामुळे या महाराष्ट्र सरकारचा कोळसा केल्याशिवाय भाजप गप्प बसणार नाही. पक्षाचे वरिष्ठ नेते व्यंकय्या नायडू, विधान सभेतील विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे, सुधीर मुनगंटीवार यांचीदेखील यावेळी भाषणे झाली. सर्वच नेत्यांनी आपल्या भाषणात काँग्रेस आघाडी सरकारवर जोरदार हल्ला चढविला.

Leave a Comment