भारत इतिहास संशोधक मंडळाच्या वतीने मोडी हस्ताक्षर स्पर्धा : शंभराहून अधिक जणांचा सहभाग

पुणे १५ मार्च पुण्यातील भारत इतिहास संशोधक मंडळाकडील पाच लाखापेक्षा अधिक अशा इतिहासाचा आधार असलेल्या मोडी कागदाचे वाचन झालेले नाही कारण मोडी लिपी वाचणारांची संख्या फारच थोडी आहे म्हणून मोडी लिपी वाचण्याची आवड निर्माण व्हावी म्हणून भारत इतिहास संशोधक मंडळाने मोडी हस्ताक्षर स्पर्धा घेतली. त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला. तेरा वयाच्या मुलांपासून ते ८८ वयाच्या आजोबापर्यंत शंभराहून अधिक मंडळींनी त्यात सहभाग घेतला. आबेदा इनामदार मुस्लीम महाविद्यालयाच्या सहा मुलींनीही त्यात उत्साहाने भाग घेतला होता. मोडी हस्ताक्षर काढण्यास सध्या सर्वांच्या वापरात असलेले बॉलपेन पुरेसे नव्हते. त्याला बोरू, मोठे नीफ असलेला टाक, त्या पद्धतीचे पेन आणि शाईची दौत यांचा वापर करणे आवश्यक होते. या स्पर्धेसाठी सोळा ओळीचा देवनागरीतील मजकूर देण्यात आला होता.  त्यात सहभागी होणारात विशेष उत्साह होता त्यातील प्रत्येकाची कारणे भिन्न होती. ८८ वयाच्या दशरथराव पारखे याचे म्हणणे असे होते की, सत्तर वर्षापूवी र् आम्ही मोडीतच शिक्षण घेत असू. पण नंतर काळ बदलला आणि लेखनासाठी देवनागरीचा वापर वाढला. त्या काळी मोडी हीच सामान्य व्यक्तीच्या व्यवहाराची लिपी होती. त्यातील अनेक गंमती या मोडीतच कळणे शक्य आहे. लहानपणी जिवापाड प्रेम करून जपलेली ही लिपी परत लिहायला मिळत आहे याचा मला येवढा आनंद मिळत आहे की मी जणू त्या सत्तर वर्षांपूर्वीच्या वातावरणातच रमत आहे. महिन्यापूर्वी जाहीर झालेल्या स्पर्धेनंतर लोकांनी अंकलिपी उपलब्ध करुन सराव केला व त्याच्या आधारे ही तयारी केली. आजच्या स्पर्धेत सोळा ओळीचा एक परिच्छेद देण्यात आला होता. आठवडयांनतर या स्पर्धेचा निकाल जाहीर होईल व प्रथम येणाराला बाळाजी आवजी चिटणीस पुरस्कार देण्यात येणार आहे.

भारत इतिहास संशोधक मंडळाच्या या उपक्रमाबद्दल मंडळाचे मंदार लवाटे म्हणाले की, शिवचरित्र सारख्या विषयावर लिहीताना जेवढे लागेल तेवढेच वाचण्याची पद्धती पडली आहे. कारण कागदांची संख्या फारच प्रचंड आहे. भा ई सं मंडळात मोडी वाचणारांची संख्या गेल्या पिढीत मोठी होती. त्या वेळी गरजेप्रमाणे ऐतिहासिक कागद वाचले गेले पण असे अनेक कागद असतात की, त्यांचा शिवचरित्र किवा अन्य मुख्य विषय यांच्याशी प्रत्यक्ष संबंध नसतो. पण पंधरा वीस कागदाच्या वाचनातून एखाद्या ऐतिहासिक प्रसंगातील बारकाव्यावर प्रकाश पडतो. सध्या मंडळाकडे मोडीत असे पंधरा लाख कागद आहेत. त्यातील मजकूर पुढे आला तर इतिहासावर नवा प्रकाश पडणार आहे. शिवाय पाच कोटीपेक्षा अधिक कागद की जे एकापेक्षा अधिक लिपीत आहेत अशा बर्यााच कागदांना अजून हातही लागलेला नाही. त्या कागदात पेशवे दप्तरातील चार कोटी कागद आणि स्वतंत्रपणे तंजावर दप्तराचे कागद आहेत. अनेक वर्षे आम्ही मोडी वाचणारे तरुण पुढे आले पाहिजेत असे म्हणत होतो. जो थोडा प्रयत्न केला त्याला प्रतिसाद चांगला मिळाला. तरीही अशी मोठी स्पर्धा घेण्याची कल्पना आम्हालाही सुचली नाही. आजच्या प्रतिसादाने आम्ही मंडळाचे लोक भारावून गेलो आहोत. आज घेतली तशी स्पर्धा वारंवार घेण्याची कल्पना पुढे आली आहे. जो प्रतिसाद आज मिळाला अशा प्रतिसाद वाढत गेला तर अनेक विषयाच्या अभ्यासांना चालना मिळण्याची शक्यता आहे.

2 thoughts on “भारत इतिहास संशोधक मंडळाच्या वतीने मोडी हस्ताक्षर स्पर्धा : शंभराहून अधिक जणांचा सहभाग”

  1. असे उपक्रम व्यापक स्तरावर  जाहिर का केले जात नाहीत ? काय फक्त पुण्यातूनच संशोधक निर्माण करायचे आहेत का ? 

Leave a Comment