गोवा : राजीनामा दिलेल्या दोन मंत्र्यांबाबत राष्ट्रवादी कोणता पवित्रा घेते याबाबत उत्सुकता

पणजी १५ मार्च – गोव्यातील दिगंबर कामत आघाडी सरकारमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री जुझे फिलीप डिसोझा व निळकंठ हळर्णकर यांनी आपल्या मंत्रीपदाचे राजीनामे सोमवारी पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्याकडे सादर केले होते. यासंदर्भात पवार आता कोणता निर्णय घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पक्षात गेल्या बर्यािच काळापासून सुरू असलेल्या गटबाजीची ही परिणती असून पक्षाने यापूर्वीच त्या दोघांकडे मंत्रीपदाचे राजीनामे मागितले होते.

पक्षाचे तिसरे आमदार तथा माजी मंत्री मिकी पाशेको व उभय मंत्र्यांमध्ये गेल्या काही महिन्यांपासून संघर्ष निर्माण झाला होता. किबहुना पक्षात सरळसरळ दोन गट पडले होते. मिकी गटाने हे दोन्ही नेते पक्षाशी प्रामाणिक नसल्याने व विशेष करून काँग्रेस पक्षाशी त्यांची जवळीक असल्याने त्यांची मंत्रीपदे काढून घ्यावीत अशी मागणी केली होती. यासंदर्भात मिकी व त्यांच्या समर्थकांनी दिल्लीत पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची यापूर्वी अनेकदा भेटही घेतली होती. मात्र पक्षाचा आदेश आल्यानंतर राजीनामा देण्याबाबत दोन्ही मंत्री ठाम राहिल्याने तिढा निर्माण झाला होता. अलिकडे पक्षाच्या प्रभारी भारती चव्हाण यांनी या दोन्ही नेत्यांशी संफ साधून तोडगा काढण्याचा प्रयत्न केला होता. परंतू जुझे फिलीप यांनी त्यांच्या प्रस्तावाला दाद दिली नव्हती. आज ना उद्या दोघांना मंत्रीपदाचा राजीनामा द्यावाच लागेल, असा दावा मिकी पाशेको वारंवार करीत होते.

यापूर्वी मिकी पाशेको हे दिगंबर कामत सरकारात मंत्री होते. पर्यटन मंत्री या नात्याने त्यांची कारकीर्द सुरू असताना एका मैत्रिणीच्या आत्महत्येप्रकरणी मिकींना अटक झाली आणि त्यांना मंत्रीपदाचा राजीनामा देणे भाग पडले. मात्र आपले मंत्रीपद काढून घेण्याच्या उद्देशाने काँग्रेस व राष्ट्रवादीतील काही स्थानिक नेत्यांनी मुद्दाम आपणाला त्या प्रकरणात गोवल्याचा आरोप मिकी यांनी केला होता. राज्याचे गृहमंत्री रवी नाईक, राजकीय प्रतिस्पर्धी चर्चिल आलेमाव यांचे नाव मिकीनी घेतले होते. राष्ट्रवादीचे जुझे फिलीप डिसोझा हेदेखील आपल्या वाईटावर असल्याचा आरोप त्यांनी केला होता.

जुझे व नंतर मिकींच्या जागी मंत्री झालेले राष्ट्रवादीचे आमदार निळकंठ हळर्णकर यांची काँग्रेसशी असलेली सलगी राष्ट्रवादीला कशी महागात पडू शकते व येणार्याा विधानसभा निवडणुकीत हे दोघे काँग्रेसच्या तिकीटावर कशी निवडणूक लढवू शकतात हे ही मिकींनी साक्षीपुराव्यांसहीत पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना पटवून सांगितले होते. त्या पार्श्वभूमीवर दोघांना मंत्रीपदाचे राजीनामे देण्याचा आदेश पक्षाने दिला होता, मात्र त्यांनी पक्षादेश धुडकावला असे मिकी जाहीरपणे सांगत होते. अखेर जुझे व निळकंट यांनी दिल्लीत जाऊन आपले राजीनामे सादर केले आहेत.

Leave a Comment