सत्तेच्या शिखरावर बर्फ वितळतोय

पंतप्रधान  मनमोहन सिंग ही एकवेळ संपुआघाडी सरकारची सोनिया गांधी यांच्यापेक्षाही जास्त जमेची बाजू झाली होती.सोनिया गांधी यांच्याभोवती नेहरू घराण्याचे वलय आहे.त्यांची कर्तबगारी आणि ज्ञान हा संशोधनाचा विषय व्हावा इतका गूढ आहे पण भारतातल्या अज्ञ मतदारांना भुरळ पाडायला जे काही लागते ते सोनिया गांधी यांच्याकडे आहे. सरकार चालवण्याचा वकूब नाही. तो मनमोहनसिग यांच्याकडे असल्याने सोनिया गांधी यांनी  त्यांना पंतप्रधान केले. त्यांनीही आपल्याला जनाधार नसल्यामुळे सोनिया गांधी यांच्या आज्ञेत काम केले.  सोनिया गांधी यांची लोकप्रियता आणि मनमोहनसिंग यांचे प्रशासन यांचा मेळ चांगला जमला होता म्हणून त्यामुळे २००४ च्या पाठोपाठ २००९ सालीही संपुआघाडीला लोकसभा निवडणुकीत यश मिळाले आणि लागोपाठ दुसर्यां दा सत्ता प्राप्त झाली. पण आता या दोघांतली वैचारिक दरी वाढायला लागली आहे. सुरूवातीच्या काळात  सोनिया गांधी यांच्या शब्दाबाहेर न जाता काम करणारे आणि त्यामुळे अंगावर टीका ओढवून घेणारे मनमोहनसिग आता मात्र त्यांना न विचारता काम करायला लागले आहेत आणि काही वेळा त्यांच्या विरोधात जात आहेत.

सरकार कसे चालवावे यावरून पक्ष आणि सरकार यांच्या  चितनात फरक पडत चालला आहे. त्यामुळे पक्षाची आणि सरकारची अवस्था दुभंगल्यागत झाली आहे. मनमोहनसिग आणि सोनिया गांधी यांच्यात अंतर वाढले असले तरी या दोघांनी परस्परांच्या विरोधात कारवाया सुरू केल्या आहेत असे काही नाही पण काँग्रेसमध्ये नेहमीच परस्परांच्या विरोधात कारवाया  सुरू असतात तशा त्या आताही सुरू आहेत आणि त्यांना सोनिया विरुद्ध मनमोहनसिग असे स्वरूप यायला लागले आहे. या दोघांतले मतभेद तर आहेतच पण  त्यात या कारवायांची भर पडून काँग्रेसमध्ये विस्कळीत पणा येत आहे आणि सरकारचे देशाच्या कारभारावरचे नियंत्रण सुटत आहे.  पंतप्रधानांनी घेतलेल्या त्या गाजलेल्या पत्रकार परिषदेत, आपल्याला आघाडीच्या सरकारमुळे भ्रष्टाचाराशी तडजोड करावी लागली असे म्हटले होते. त्यांची ही टिप्पणी आपल्या पक्षाला उद्देशून असल्याचे मानले जात आहे आणि पक्षातल्या सोनिया विरोधी नेत्यांनी पंतप्रधानांना लक्ष्य करायला सुरूवात केली आहे. पक्षाचे ज्येष्ठ नेते एकमताने चालत नाहीत. हे तर अनेकदा उघडपणे दिसून आले आहेच पण या संघर्षाला आता पंतप्रधानपदासाठीच्या स्पर्धेचा रंग येत आहे.

सोनिया गांधी या मनमोहनसिंग यांना कधीही बदलू शकतात आणि अजून राहूल गांधी हे पंतप्रधान होण्यास राजी नाहीत त्यामुळे नेतृत्वबदल झालाच तर आपला नंबर लागावा असे काही नेत्यांना वाटत आह. पंतप्रधानांनीही आपण राजीनामा देणार नाही असे गेल्या महिनाभरात दोनदा जाहीर केले आहे. त्यांची ही घोषणा आपल्याच पक्षातल्या पंतप्रधान होण्यास इच्छुक असलेल्या काही ज्येष्ठ नेत्यांना उद्देशून आहे असा तर्क आहे. सरकारमधील काही भ्रष्टाचाराच्या प्रकरणांचा स्फोट होत आहे. पक्षात ज्येष्ठ नेत्यचे बिनसले की असे होत असते असा आजवरचा अनुभव आहे. या सार्याश गोंधळाच्या पार्श्व भूमीवर मंत्रिमंडळात बदल करण्याचा घाट घालण्यात आला होता. हे बदल केवळ काँग्रेसच्याच मंत्र्यांत करणे  अपेक्षित होते. या कामात घटक पक्षांचा काही अडथळा येणार नव्हता पण तरीही ते बदल मोठ्या प्रमाणावर होऊ शकले नाहीत कारण मनमोहनसिग यांना जो आणि जसा बदल हवा होता तसा तो करण्यास सोनिया गांधी यांची परवानगी मिळत नव्हती. मनमोहन सिंग यांना प्रणव मुखर्जी अर्थमंत्री म्हणून नको आहेत. तिथे अहलुवालिया यांना आणायचे आहे. ते मुखर्जी  यांना  गृहमंत्री करून चिदंबरम यांना तिथून काढून व्यापार खात्यात पाठवू इच्छित आहेत. हे सोनिया गांधी यांना मान्य नाही.

देशातल्या ७५ टक्के जनतेला स्वस्त धान्य देण्याची सोनिया गांधी यांची इच्छा आहे. २००९ च्या निवडणुकीत रोजगार हमी योजनेमुळे सत्ता मिळाली तशी या धान्य योजनेमुळे २०१४ साली मिळेल असा त्यांचा कयास आहे. राहूल गांधी यांची गरिबांचा कैवारी अशी प्रतिमा तयार करण्यास ही योजना उपयोगी पडेल असे त्यांना वाटते पण ही योजना सरकारी तिजोरीला परवडणारी नाही असे पंतप्रधानांचे मत आहे. हा मतभेद आहेच पण तो पक्षात व्यक्त करण्याऐवजी वृत्तपत्रांत जाहीर झाला. तो मनमोहनसिग यांनीच केला असल्याचा संशय आहे. बोफोर्स प्रकरणातून क्वात्रोचीचे नाव काढून टाकण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. तशा हालचालीही सुरू झाल्या पण, नेमके याच वेळी क्वात्रोचीला या तोफांच्या व्यवहारात दलाली मिळाली असल्याचे आयकर विभागाला दिसले असल्याची बातमी फोडण्यात आली. क्वात्रोचीचे नाव काढण्यात सरकारला अडचण यावी आणि सोनिया गांधी अडचणीत याव्यात यासाठी आतल्याच कोणी तरी हे केले असावे असा संशय येत आहे आणि परस्परांविषयीचा अविश्वास वाढत आहे. दिग्विजयसिग यांनी तर हे सारे कोणीतरी आतलाच माणूस करीत असल्याचा संशय व्यक्त केला आहे.

Leave a Comment