महायुतीच गोपीनाथ मुंडे यांचा प्रस्ताव

नांदेड, २१ फेब्रुवारी – मनसेसोबत भाजप – सेनेने युती करावी, या प्रस्तावावर शिवसेना आणि मनसे या दोन्ही पक्षांकडून कडाडून टीका झाली असली तरी सर्वसामान्य जनतेच्या मनात तोच विषय असल्यामुळे भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे यांनी त्याच प्रस्तावाचा पुनरूच्चार नांदेड येथील विभागीय मेळाव्यात केल्याने या विषयाची चर्चा पुन्हा जोरात सुरू झाली आहे. लोकांच्या मनात काय आहे, याचा अंदाज घेवून शिवसेना आणि मनसे यांनी आगामी राजकीय वाटचालीचा विचार करावा आणि अहंकार सोडून विधायक भूमिका घेवून एकत्र यावे असे मत अनेक सूज्ञ राजकीय विश्लेषक व्यक्त करीत आहेत.


जनता काँग्रेसच्या भ्रष्ट राजवटीला कंटाळली असून बहुतांश जनतेला काँग्रेस नकोशी झाली आहे. देशात आणि राज्यात १९७५ वर्षासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. काँग्रेसची भ्रष्ट आणि घोटाळ्याची सत्ता उलथून टाकण्यासाठी समविचारी पक्षांनी एकत्र आलेच पाहिजे’, असा पुनरूच्चार लोकसभेतील भारतीय जनता पक्षाचे उपनेते गोपीनाथ मुंडे यांनी येथे केला होता. भाजपचा विभागीय मेळावा नांदेड येथे पार पडला. यावेळी प्रदेश अध्यक्ष सुधीर मुनगंटीवार, खा. रावसाहेब दानवे, गोविदराव केंद्रे, संभाजी पवार, संभाजीराव पाटील यांच्यासह भाजप आमदार व पदाधिकार्यां ची उपस्थिती होती. त्यानंतर जाहीर सभेत मुंडे यांनी महायुती होण्याची गरज प्रतिपादित केली होती. लोकनायक जयप्रकाश नारायण यांनी १९७५ मध्ये केलेल्या प्रयोगाचा दाखला देत आज तशीच परिस्थिती निर्माण झाल्याचे मुंडे यांचे म्हणणे आहे.


देशात, अनेक राज्यांमध्ये एका पक्षाची सत्ता येऊ शकत नाही, असे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात  काँग्रेस-राष्ट्रवादी  काँग्रेसला सत्तेतून हटवायचे असेल तर समविचारी शक्तींनी एकत्र आले पाहिजे, अशी लोकभावना आहे. मी ती व्यक्त केली. एकत्र येणे म्हणजे एका पक्षाचे दुसऱ्या  पक्षात विलिनीकरण नव्हे, असेही मुंडे यांनी सांगितले. खा. संजय राऊत यांनी मात्र मुंडे यांच्या वक्त्यावर प्रतिक्रिया देणे टाळले रेल्वे अंदाजपत्रकात मराठवाड्याच्या रेल्वेविषयक वेगवेगळ्या मागण्यांना न्याय मिळाला पाहिजे, अशी अपेक्षा मुंडे यांनी व्यक्त केली. मनमाड ते सिकंदराबाद हा संपूर्ण रेल्वे मार्ग दुहेरी झाला पाहिजे. परळी-नगर रेल्वे मार्गासाठी जादा तरतूद मिळाली पाहिजे. नांदेड-वर्धा या प्रस्तावित रेल्वे मार्गाचे काम मार्गी लागले पाहिजे, इत्यादी मागण्या त्यांनी केल्या.
मराठवाड्यात अनेक विकासाची योजनांची आवश्यकता असून भाजप त्यासाठी रस्त्यावर उतरणार असल्याची सुतोवाच मुंडे यांनी केले. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची १०० दिवसांची कारकीर्द नुकतीच पूर्ण झाली. त्यांनी काही बरेही केले नाही आणि काही वाईटही केले नाही, अशी टिप्पणी मुंडे यांनी केली.

Leave a Comment