भारताचा मुबारक कोण

इजिप्तच्या जनतेने आपला अध्यक्ष होस्नी मुबारक यांला जनांदोलन करून राजीनामा द्यायला भाग पाडले. त्याचा भारताशी तसा काही संबंध नाही पण आता आपल्या देशातल्या विविध निवडणुकांत  जनतेने ….. यांचाही मुबारक करावा असे म्हटले जाणार आहे .पश्चिम बंगालमधल्या जनतेने डाव्या पक्षाची राजवट उलथून टाकावी, असे आवाहन तृणमूल काँग्रेसच्या लढावू नेत्या ममता बॅनर्जी यांनी तिथल्या जनतेला उद्देशून केले आहे. बंगालच्या जनतेने येत्या विधानसभा निवडणुकीत डाव्या आघाडीला पराभूत करण्याचा निर्णयच घेतलेला आहे. निदान गेल्या दोन वर्षात झालेल्या निवडणुकांनी तरी तसे चित्र निर्माण झाले आहे. गेली ३५ वर्षे बंगालवर राज्य करणार्या् या आघाडीला या दोन वर्षात आता तृणमूल काँग्रेसच्या वाढत्या प्रभावामुळे मोठे धक्के बसले आहेत आणि ही राजवट आता संपुष्टात येणार असे आजवर डाव्या आघाडीला पाठींबा देणारे लोकही म्हणायला लागले आहेत. आजवर तिथे  डावी आघाडी हटवा, माक्र्सवाद्यांना संपवा, कम्युनिस्टांच्या दादागिरीला मुठमाती द्या आणि सत्ता परिवर्तन घडवा, अशा घोषणा दिल्या जात होत्या.


 दरम्यानच्या काळात इजिप्तमधील जनता एकवटली आणि तिने संघटित आंदोलन उभे करून होस्नी मुबारक यांची राजवट संपवून टाकली. या गोष्टीपासून प्रेरणा घेऊन ममता बॅनर्जी यांनी बंगालच्या जनतेला इजिप्तप्रमाणेच बंगालमध्ये परिवर्तन घडवावे, असे आवाहन करून बंगालमधल्या डाव्या राजवटीची तुलना इजिप्तमधल्या होस्नी मुबारक यांच्या राजवटीशी केली. गेल्या रविवारी डाव्या आघाडीचे नेते आणि मुख्य मंत्री बुद्धदेव भट्टाचार्य यांनी कलकत्त्याच्या ब्रिगेड परेड ग्राऊंड या मैदानावर डाव्या आघाडीच्या प्रचाराचा नारळ फोडला आणि त्यात ममता बॅनर्जी यांच्या या विधानाचा समाचार घेतला. इजिप्तमधल्या जनतेने होस्नी मुबारक यांच्या राजवटीला मुठमाती दिली तशाच पद्धतीने भारतातल्या मनमोहनसिग यांच्या सरकारला धक्का देण्याची गरज आहे, असे म्हणून त्यांनी मनमोहनसिग राजवटीची होस्नी मुबारक यांच्याशी तुलना केली.

 
एकंदरीत या निवडणूक प्रचारामध्ये इजिप्तमधल्या बंडाचा संदर्भ वारंवार येणार, असे स्पष्ट व्हायला लागले आहे. बंगालमधली लाल राजवट संपणारच असा आत्मविश्वास ममता बॅनर्जी यांना वाटत असला तरी केंद्र सरकारचा नाकर्तेपणा, महागाई आणि एकामागे एक प्रकट झालेल्या भ्रष्टाचाराच्या कथा यांचा परिणाम त्यांच्यावर होणारच नाही असे काही सांगता येत नाही. त्यामुळे ममता बॅनर्जी यांचा आत्मविश्वास हा फाजील आत्मविश्वास आहे असे काही वेळा वाटू लागते. असे असले तरी ममता बॅनर्जींचा या असंतोषावरचा विश्वास कितपत उपयोगी पडेल असा प्रश्न आता उपस्थित व्हायला लागला आहे. यामागे दोन कारणे आहेत. पहिले कारण म्हणजे ममता बॅनर्जी यांनी जमिनी संपादनाला केलेला विरोध हा औद्योगीकरणाला केलेला विरोधच समजला जायला लागला आहे आणि पश्चिम बंगालमधला एक वर्ग निश्चितपणे असा आहे की, जो या मुद्यांवरून ममता बॅनर्जी यांच्या विरोधात गेलेला आहे. त्याशिवाय केंद्र सरकारच्या कारभारामुळे सुद्धा बंगालमधला एक मतदार वर्ग ममता बॅनर्जी यांच्या विरोधात आहे.
   

गेल्या वर्षी झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत आणि त्या पाठोपाठ झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत डाव्या आघाडीच्या विरोधात जनमत जेवढे त्वेषाने व्यक्त झाले तेवढे ते आगामी विधानसभा निवडणुकीत व्यक्त होईलच, अशी खात्री राहिलेली नाही.     वर्षभरामध्ये केंद्र सरकारच्या भ्रष्टाचारामुळे आणि महागाईमुळे झालेल्या लोकांच्या मनातला हा बदल हेरून बुद्धदेव भट्टाचार्य यांनी या दोन गोष्टींवर अधिक भर देण्याचा निर्णय घेतला आहे. म्हणून त्यांनी आपल्या भाषणामध्ये होस्नी मुबारक यांच्याशी मनमोहनसिग यांची तुलना करून आपण नव्हे तर मनमोहनसिग हेच होस्नी मुबारक आहेत, असे प्रतिपादन केले आहे. ममता बॅनर्जी यांनी भट्टाचार्य यांचा मुबारक करा असे आवाहन केले असले तरीही बंगालातल्या जनतेने मनमोहनसिंग सरकारच्या विरोधातला असंतोष प्रकट केला तर कदाचित मनमोहनसिग यांचाच बंगालपुरता मुबारक होईल आणि कदाचित ती साथ देशभरात पसरली तर महागाईमुळे युपीए सरकारचा मुबारक झाला असे म्हणण्याची पाळी येईल.

Leave a Comment