जॉब इंटरव्ह्यूची तयारी

मुलाखतीच्या वेळी उचललेले एखादे चुकीचे पाऊल तुम्हाला नोकरी मिळवण्यापासुन दूर ठेवू शकते. या पायरीपर्यंत पोहोचण्यासाठी तुम्ही अर्ज पाठवणे, टेलीफोनवरील मुलाखत अशा अनेक परीक्षांमधुन पार झालेले असतात. आता मात्र निवडक उमेदवारांमधुन तुमची निवड होण्याची वेळ येऊन ठेपलेली असते. ती वेळ म्हणजे समोरासमोर बसुन घेतलेली मुलाखत. अशा वेळी काही गोष्टी मनाविरुद्ध गेल्या तरी तुम्ही स्वतःवरील नियंत्रण आणि आत्मविश्वास गमावता कामा नये. तुमच्या विचारांनी प्रभावीत होऊन ते तुमचीच निवड करणार आहेत अशा दृढ भावनेने मुलाखतीला सामोरे जा. यावेळी तुम्ही बायोडाटाच्या किंवा कव्हरिंग लेटरच्या आड लपुन राहु शकत नाही, कारण मुलाखत  घेणाऱ्यांसमोर तुम्हाला प्रत्यक्ष हजर रहायचे असते. छोट्या छोट्या चुका टाळणे हे यात यशस्वी होण्याचे खरे गमक आहे.

आता, अशा चुका कोणत्या आणि त्या टाळण्याचे उपाय काय, याचा परामर्श आपण घेऊया :

    * उशीरा पोहोचणे : कार्यालयाचा पत्ता, मुलाखतीची वेळ यांची खात्री करून, जास्तीचा वेळ हाताशी धरून त्यानुसार घरातुन बाहेर पडा. तरीही काही अपरिहार्य गोष्टी घडल्यास फोनवरून तशी माहिती देऊन नंतरची वेळ ठरवुन घ्या.    
    * पोषाखाची निवड : प्रत्यक्ष भेटीच्या पहिल्या १५ ते २० सेकंदातच समोरच्या व्यक्तीवर तुमची सगळ्यात मोठी छाप पडते. योग्य पोषाखाला यात फार महत्वाचे स्थान आहे. पारंपारिक पोषाख, हलकी रंगसंगती, नाजुकसे दागीने, यांचा वापर करावा. केशरचना नीटनेटकी असावी. मंद सुवासाचाही वापर तुम्ही करू शकता. मुलाखतीसाठी केबीनमध्ये पोहोचण्यापूर्वी प्रत्येक गोष्ट व्यवस्थित असल्याची पुन्हापुन्हा खात्री करून घ्या.          
    * घबराटीवर मात करा : केबीनमध्ये प्रवेश करण्यापूर्वी छातीचे ठोके वाढले असले तरी चेहेऱ्यावर मात्र मंद स्मितच असुद्या. समोरील व्यक्तीच्या नजरेला नजर भिडवुन, प्रश्नांवर लक्ष केंद्रित करून उत्तरे द्यायला सुरुवात करा. या प्रश्नोत्तरांमधुन तुमच्या उत्साहाचीही चाचपणी होत असते.
    * धुम्रपान, मद्यप्राशन, च्युईंगगम चघळण्याचे टाळा : यातुन तुम्हाला आराम मिळत असला तरीही मुलाखतीसाठी हे हानीकारक असल्याने त्याचा प्रयोग करण्याचे टाळा. इतकेच नाही तर समोरून ड्रिंकची ऑफर आली तरीही नम्रपणे नकार द्या.
    * ज्ञान अद्ययावत ठेवा : इंटरनेटच्या माध्यमातुन तसेच संबंधीत व्यक्तींशी संपर्क साधुन कंपनीची उत्पादने, सेवा, वार्षिक विक्री, एकंदरीत संरचना यांची माहिती मिळवा. हि माहिती सहज बोलण्यातुन दर्शवुन  तुम्ही कंपनीत काम करण्यासाठी उत्सुक असल्याचे दर्शवा. 
    * तुमच्या बलस्थानांचे आणि दुर्बलतांचे प्रदर्शन करू नका, पण सगळ्यात सामर्थ्यशाली बलस्थाने आणि हानीकारक दुर्बलता योग्य प्रकारे जाणुन घ्या. बलस्थाने इतरांच्या नजरेत येतील हे पहा आणि त्याच वेळेस दुर्बलतांना सकारात्मक वळण देण्याचा प्रयत्न करा.
    * मुलाखतीचा सराव करा : संभाव्य प्रश्नांची यादी तयार करून, एखाद्या मित्राला बरोबर घेऊन, मुलाखतीचा चाचणीसराव करून पहा. टेपरेकॉर्डवर त्याची रेकॉर्डींग करून पुन्हा एकदा ते संभाषण ऐकल्यास त्यातुन तुमच्या चुका कळुन येतील. मुलाखतीवेळी बरेचदा सादरीकरण आणि प्रात्यक्षिक दाखवण्याचीही वेळ येते. त्यासाठी सुरुवातीला स्वतःची थोडक्यात ओळख करून देणे, प्रत्यक्ष सादरीकरण आणि शेवटी थोडक्यात निरोप अशा सगळ्याचाही वेळोवेळी सराव करा. यातुन वाढलेल्या आत्मविश्वासाच्या सहाय्याने मुलाखतीला तुम्ही धैर्याने सामोरे जाल.
    * अतिबोलणे टाळा : अनाहुत बडबड करून प्रश्नकर्त्याला अडथळा आणणे, सोप्या प्रश्नांना लांबलचक उत्तरे देणे, हे टाळण्यासाठी तुम्हाला नक्की काय बोलायचे आहे हे मनाशी निश्चित करा. प्रश्नांची उत्तरे नेहेमी समर्पक शब्दात, थोडक्यात असावीत.
    * आलेल्या ऑफरशी आत्मीयतेचे संबंध निर्माण करा : कंपनीच्या जाहिरातीतुन कामाचे वर्णन दिलेले असते. तुमचा अनुभव, बुद्धिमत्ता आणि ताकद यांना या वर्णनाशी जुळवुन घ्या. कंपनीच्या आवश्यकता तुम्ही कशा पुर्ण करू शकता आणि तुमची निवड या कामासाठी का करावी हे तुम्ही यातुन सिद्ध करू शकता.
    * योग्य प्रश्न विचारा : तुम्ही मिळवलेल्या माहितीच्या आधारे प्रश्नावली तयार करा. हे प्रश्न स्तःलाच विचारा. त्यातुन संबंधीत कंपनी आणि जॉब तुमच्यासाठी योग्य आहे का हे अजमावता येईल. पण तुमच्याकडील माहितीच्या आधारे समोरील व्यक्तीवर मात करण्याचा प्रयत्न करू नका. याचा फार काळ उपयोग होणार नाही.
    * निंदा करू नका : सध्याची नोकरी, पूर्वीची नोकरी किंवा तुमचे स्पर्धक यांची निंदा किंवा तक्रारी करू नका.
    * मोबदल्याची विचारणा लगेचच करू नका : तुमच्या पात्रता, कंपनीच्या अपेक्षा, गरजा यांची चर्चा आधी होऊ दे. समोरील व्यक्तीलाच मोबदल्याच्या मुद्द्याला हात घालु द्या.
    * पुढील विचारणा करा : मुलाखत संपल्यानंतर, कामातील तुमची रुची, आवड स्पष्ट करून हे काम स्विकारण्यास तयार असल्याचे स्पष्ट करा. पुढील पावले कोणती उचलली जावीत हे ही निःसंदिग्ध शब्दात विचारून घ्या.

 

 

1 thought on “जॉब इंटरव्ह्यूची तयारी”

Leave a Comment