महागाईचा मारा असह्य

केन्द्रातल्या संपुआघाडी सरकारने आता महागाई ही आपली खास ओळख निर्माण केली आहे. कारण महागाई मारुतीच्या शेपटासारखी वाढत आहे आणि सरकार तिच्याकडे रावणासारखे निरुपायाने पहात बसले आहे. एवढयावरही सरकार महागाई कमी करण्याचे वायदे करण्याबाबत काही थकत नाही. पंतप्रधान मनमोहनसिग तिच्याबद्दल चिता व्यक्त करण्याचा क्रमही सोडत नाहीत.त्यांनी गेल्याच आठवड्यात महागाई वाढत असल्याबद्दल वर्षातली अकरावी चिता व्यक्त केली आणि आपण महागाई काबूत आणू असे आपले साधारण वीस बाविसावे आश्वासन दिले. चलनवाढ आटोक्यात आणण्याचा आपला प्रयत्न जारी आहे आणि त्याला आता लवकरच यश येईल अशा अपेक्षा तर ते नेहमीच व्यक्त करीत असतात आणि त्याही फोल ठरत आहेत. कृषि मंत्री शरदराव पवार हेही असे वायदे करीत असतात. मात्र ते करताना ते रबी आणि खरीप हंगामांचा भरवसा देत असतात. रबी हंगाम आला की ते म्हणतात, खरिपाचा माल बाजारात आला की किमती घसरतील आणि खरीप हंगाम आला की ते म्हणतात, आता रबीचा माल बाजारात आला की माल स्वस्त होईल. अनेक खरीप हंगाम आले आणि गेले पण धान्य काही स्वस्त होण्याची चिन्हे नाहीत. आता तर गेल्या २५ डिसेंबरला संपलेल्या महिन्यात खाद्यान्न, फळे आणि भाज्यांच्या दरात १८ टक्के वाढीची नोंद झाली असून सरकरही आता हादरून गेले आहे.
   
कांद्याने तर कमाल केली आहेच पण पाकिस्तानी कांद्याने वेगळाच वांदा केला आहे. कांद्याचे भाव वाढल्याने जनतेत नाराजी व्यक्त व्हायला लागली पण शरदराव पवार यांनी लोकांना शांत केले. लवकरच पाकिस्तानातला कांदा आयात करायला सुरूवात केली की भारतातले कद्याचे भाव वाढतील असे आश्वासन त्यांनी दिले पण पाकिस्तानातला कांदा आलाच नाही. कारण पाकिस्तान सरकार सावध झाले. आपण भारतात कांदा पाठवायला लागलो तर आपल्याला देशातल्या जनतेला कांद्यासाठी डोळ्यातून पाणी काढावे लागेल हे या सरकारला लक्षात आले आणि त्या सरकारने कांदा निर्यात करण्यास बंदी घातली. पाकिस्तानची आशा नष्ट झाली. मुळात पाकिस्तानचा कांदा आला असता तरीही तो स्वस्तच राहिला असता असे काही नाही. पाकिस्तानात तर चलनवाढीचा वेग १९ टक्क्यांपेक्षा जास्त आहे. तेव्हा तोही महागच राहिला असता. तो आला नाहीच पण स्वस्तात आला असता तरी तो भारतातल्या ग्राहकना आवडला नसता कारण तो भारतातल्या कांद्याएवढा तिखट आणि चवदार नाही. असो पण पाकिस्तानी कांद्याचे हे पुराण असे संपले आणि भारतीय कांदा १०० रुपये किलोच्या दरात जाण्याचे सारे मार्ग मोकळे झाले. त्याचा या १८ टक्के चलनवाढीत सिहाचा वाटा आहे हे काही सांगण्याची गरज नाही.
   
महागाईचे एक तंत्र आहे. तीन वर्षपूर्वी तुरीची दाळ ३० रुपये किलो होती. ती एकदमच १२० रुपयांवर गेली. त्यामुळे सरकार सावध झाले आणि सरकारने अगदी वरवरचे उपाय योजायला सुरूवात केली. व्यापार्यांकना इशारे दिले. अगदी अपवादात्मक रित्या काही व्यापार्यांावर खटले भरण्याचा देखावाही केला. नंतर बाजारात माल आला आणि  किमती घसरून ८० ते ८५ रुपयांवर स्थिर झाल्या. किमती १२० वरून ८० रुपयांपर्यंत घसरल्या की सरकारने किमती कमी होत असल्याचे जाहीर करायला सुरूवात केली. पण  ही जाहीरात खोटी होती कारण दाळींचे दर ८० रुपये झाले आणि त्यावर स्थिर झाले ते ३० रुपयवरून वाढत वाढत गेले होते. सरकारचे भाव घसरत असल्याचे दावे खोटे होते. अशीच स्थिती तेल, भाज्या, फळे यांच्याबाबतीतही  झालेली आहे. त्यांचे दर अतीच वाढले होते ते थोडे कमी होऊन महागाईत स्थिर झाले आहेत. तेल आता ७० ते ८०  रुपये, दाळीचे दर ८० ते ९० रुपयांवर स्थिर झाले आहेत. आता कांदा १०० रुपयांवर जाईल आणि घसरून अगदी ५० रुपयवर स्थिर होईल. सरकार हे दर घसरल्याबद्दल समाधान व्यक्त करील आणि कांदा आता ५० रुपयांच्या खाली कधीच घसरणार नाही.
   
गेल्या आठवड्यात दूधही असेच महाग झाले आहे. आता सगळीकडे ते ३० रुपये प्रतिलीटर असे, पुढच्या सहा महिन्यांनी ३५ रुपयांवर जाण्यासाठी तयार आहे. दुधाचे दर कधीच घसरत नाहीत. महागाईची चर्चा खूप झाली. सामान्य माणसाने आता आपल्या खाण्यातून काही गोष्टी बाद करायला सुरूवात केली आहे. भारतीय लोक सोशीक आहेत पण ते आता फार दिवस शांत बसणार नाहीत असे इशारे काही जाणकारांनी द्यायला सुरूवात केली आहे.म्हणजे महागाईतून सामाजिक शांततेला कधी चूड लागेल हे काही सांगता येत नाही या पातळीला ती आली आहे. महागाईचा एक परिणाम आजवर दिसला नव्हता; तो आता दिसायला लागला आहे. आजवर तिने शेअय बाजारावर कधी परिणाम केला नव्हता. काल मात्र केवळ महागाईमुळे शेअर बाजार ५०० अंशांनी घसरला. कारण आता महागाई आटोक्यात आणण्यासाठी रिझर्व्ह बँक व्याजदर कमी करील अशी शक्यता निर्माण झाली आहे. त्याशिवाय आता काही पर्याय राहिलेला नाही. व्याजदर वाढले की अर्थव्यवस्थेवर अन्य काही विपरीत परिणाम व्हायला सुरूवात होईल आणि तेव्हा लोकांना महागाईचे, बेकारी वगैरे अन्य अप्रत्यक्ष फटके बसायला लागतील. 

Leave a Comment