ओबामाचे कोळी नृत्य

मी हाय कोली, सोडिल्या डोली, मुंबईच्या किनारी… या पारंपारिक कोळीनृत्यावर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा आणि त्यांच्या पत्नी लेडी मिशेल यांनाही विद्यार्थ्यांना नाचायला लावले . डान्स फ्लोअरवर कोळी ‘ ओबामा ‘ पारू ‘ मिशेल ओबामा हे दाम्पत्य कोळीनृत्यावर नाचत असल्याचे हे नयनरम्य चित्र रंगले ते कुलाब्याच्या होली नेम हायस्कूलमध्ये.

मुंबई दौ-यावर असलेल्या ओबामा यांनी आज सकाळी सपत्नीक होली नेम शाळेला भेट देऊन शाळकरी विद्यार्थ्यांसोबत दिवाळी साजरी केली.

बाहेर रात्रीच्या काळोखाला निरोप देवून नुकतेच दिवसाचे आगमन झालेलं… सर्वत्रच दारासमोर दिसणारी रांगोळीची आरस, पणत्यांचा लखलखाट, फटाक्यांची आतषबाजी, पहाटपाडव्याच्या कार्यक्रमांची रंगलेली संगीत मैफल असे मंगलमय प्रसन्न वातावरण तर होली स्कुलमध्ये सुरू होती अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या स्वागताची तयारी. बराक ओबामा एका महासत्तेचे अध्यक्ष . हे जग बदलून अधिक सुंदर करण्याचे स्वप्न पाहणारे बराक ओबामा.

जागतिक महासत्तेचे अध्यक्ष असलेले ओबामा यांच्या आगमनाची सारेजण आतुरतेने वाट पहात होते. कसे असतील कसे बोलतील, त्यांना हे सारे आवडेल का असे नानाविध प्रश्न प्रत्येकाच्या मनात सुरू होते. क्षणाक्षणाला उत्सुकतेत वाढ होत होती. आधीच सुचना दिलेली असल्यामुळे आम्ही सारे जण अटेंन्शनमध्ये उभे होते. व्हाईट हाउसच्या मिडीयाच्या आगमनानंतर भारतीय मिडीयाने त्यांच्या सेंबत यावे अशा सूचना दिलेल्या होत्या. त्यामुळे या मिडीयासोबत धावतच आम्ही शाळेच्या पहिल्या मजल्यावर आयोजित पर्यावरण प्रदर्शनाच्या ठिकाणी पोहोचलो.

हसतमुख चेह-याचे बराक ओबामा आणि पत्नी मिशेल यांचे आगमन झाले. वातावरणातला सारा तणाव निवळला आणि ती जागा उत्साहाने घेतली. हाय, हॅलो आणि नमस्ते म्हणत त्यांनी या विद्यार्थ्यांना हस्तांदोलन केले. तसेच प्रत्येकाला भेटल्यानंतर so nice to see u असेही आर्वजून सांगितले. त्यामुळे सादरीकरण करणारी मुले ही जोशात माहिती देवू लागली. हे प्रोजेक्ट करण्यासाठी किती वेळ लागला तसेच ग्लोबल वॉर्मिंगला पर्याय सुचवा असेही त्यांनी या मुलांना सांगितले आणि त्यांना विज्ञानाच्या अभ्यासासाठी प्रोत्साहन दिले. त्यांनी मुलांना प्रदुषविरहित जगाचे स्वप्न दिले आणि या बरोबरच या स्वप्नाला प्रत्यक्षात उतरविण्यासाठीचा मुलमंत्रही दिला. यानंतर दिवाळी साजरी करण्यासाठी तळमजल्यावरील सभागृहात त्यांचे आगमन झाले

आल्या आल्या त्यांनी लहान विद्यार्थ्यांना दोन्ही हात जोडून भारतीय पद्धतीने नमस्कार केला. ओबामा यांनी दीपप्रज्वलन करून दिवाळी पार्टीला सुरूवात केली मुलांना शेकहँड केला, तर मुलांनी पाया पडून नमस्कार केला. यावेळी त्यांनी सर्वांशी हस्तांदोलन केले. स्वागतासाठी दिपनृत्य नृत्य सादर केले. या गीतास जोराने टाळ्या वाजवून दादही दिली. केंद्रीय मंत्री सलमान खुर्शीद यांनी त्यांना स्वागत गीताचा अर्थ समजावून सांगितला.

महाराष्ट्राची सांस्कृतिक परंपरा असलेले कोळीनृत्य सादर करत असल्याची घोषणा झाली. कोळीनृत्याच्या संगीताचा पहिला ठेका सुरू होताच, उपस्थित विद्यार्थ्यांसह ओबामा दाम्पत्यानेही टाळ्यांचा ताल धरला. या मुलांनी शेवटी एका थराची छोटी हंडी रचत मुंबई स्टाइलने सलामीही दिली.

लेडी मिशेल यांनी पुन्हा एकदा कोळीनृत्य लावण्याची फर्माईश केली. पुन्हा गाणे सुरू होताच चिमुरड्या विद्यार्थिनींसोबत त्या नाचायला लागल्या. मुली त्यांना कोळी नाच कसा करायचा, ते दाखवत होत्या आणि लेडी मिशेलही अगदी हुबेहूब तशाच स्टेप्स करत नाचू लागल्या…

थोड्या वेळाने काही मुलांनी बराक ओबामा यांचा हात धरून त्यांनाही डान्स फ्लोअरवर आणले. ओबामा वेस्टर्न स्टाइलने कोळीडान्स करत होते. डान्स झाल्यानंतर ओबामा दाम्पत्याने मुलांसोबत फोटो काढून घेतले. मुलांच्या गराड्यामध्ये ओबामा दाम्पत्य ऑटोग्राफ देण्यात दंग झाले.

ओबामांना भेटल्या नंतरचा आनंद या सर्व मुलांच्या चेह-यावर झळकत होता. हा आनंद या मुलांनी हिप हिप हुर्ये च्या ना-यात साजरा केला. पर्यावरणाचे प्रदर्शन साकारणारे जुएझ फर्निचरवाला, राखी, पर्ल, हर्षक, स्वॅन आणि अदनान यांचा आनंद गगनात मावत नव्हता. ओबांमांना भेटलो त्यांना माहिती दिली चर्चा केली हे सारे आश्चर्यजनक असल्याची भावना ही त्यांनी व्यक्त केली आणि यापुढे ग्लोबल वॉर्मिंगला पर्याय सुचवण्याचे आव्हान पेलण्याचा निश्चय केला.

एका मोठया देशाच्या अध्यक्षांपेक्षाही मानवतेचा पुजारी आणि एक महान माणूस भेटल्याचा आनंद सर्वाधिक होता. त्यामुळे ओबामां सोबतची ही दिवाळी माझ्या आयुष्यातला एक सुवर्णक्षण बनला अन घरी न जाताही दिवाळीचा जल्लोष अनुभवता आला.

  • मनीषा पिंगळे
  • 1 thought on “ओबामाचे कोळी नृत्य”

    Leave a Comment