उथळपणा आवरा

combo
महाराष्ट्रातले चिक्कीतल्या कथित भ्रष्टाचाराचे प्रकरण आता अपेक्षेप्रमाणे थंड पडले आहे. ते बाहेर काढणारे बहाद्दर लोक आता नव्या प्रकरणाच्या मागे लागतील. त्यातही काही तथ्य नसले तरीही चिक्की प्रमाणेच त्याही प्रकरणात ते आरडाओरडा करून भाजपा सरकार भ्रष्ट असल्याचा भास निर्माण करण्याचा प्रयत्न करीत राहतील. अर्थात हाही एक प्रचाराचाच प्रकार असतो आणि विरोधी पक्ष म्हणून अशा प्रकरणावर लक्ष ठेवणे गरजेचे आहे. मात्र असे करताना आपली विश्‍वासार्हताही टिकली पाहिजे यावर त्यांनी लक्ष ठेवले पाहिजे. तसे न केल्यास त्यांच्या आरोपांवर कोणीच विश्‍वास ठेवणार नाही. ते आरोप करतात आणि गप्प बसतात अशी प्रतिमा निर्माण होईल. मग त्यांनी कधी काळी भ्रष्टाचाराचे खरे प्रकरण काढले तरीही लोक त्यांच्यावर लांडगा आला रे आला अशी आवई देणार्‍या गुराख्यासारखे होईल. चिक्की प्रकरणात कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या आरोपाला काही माध्यमांनी पाठींबा दिला. पंकजा मुंडे यांच्यावर झालेले हे भ्रष्टाचाराचे आरोप आता थंड पडायला लागले आहेत.

या आरोपांमागे त्यांचे काही हितशत्रू असले तरीही त्यांनी हे आरोप करण्यापूर्वी आवश्यक तो गृहपाठ केलेला नव्हता. तसा तो केला असता तर त्यांना आरोप करता आले नसते. सरकारच्या विरोधात आरडा ओरडा करायला काही तरी सापडले आहे असे दिसताच उत्तेजित होऊन काही लोकांनी हे आरोप केले. पंकजा मुंडे यांच्या विरोधात लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडे तक्रारही केली. तसेच त्यांच्या राजीनाम्याचीही मागणी केली. राजीनामा मागायला कसलाही ठोस पुरावा सादर करावा लागत नाही आणि त्या मागच्या कारणाचा अभ्यास करावा लागत नाही. एसीबीकडे तक्रार करायलाही ठोस पुरावे लागतातच असे नाही. मुंडे यांच्यावर आरोप करणारांनी आपण अभ्यास करूनच हे प्रकरण उपस्थित केले असल्याचा दावा केला होता तरीही त्यांच्या अभ्यासात अनेक त्रुटी असल्याचे आता लोकांच्याही लक्षात आले आहे. म्हणूनच मुळात ज्यांनी या कथित गैरप्रकाराचा बभ्रा करायला सुरूवात केली तेच आता शांत बसले आहेत. त्यांचा अभ्यास पक्का असता तर त्यांनी न्यायालयात जनहित याचिका दाखल केली असती पण तशी ती दाखल केली नाही कारण अशी याचिका दाखल करताना ठोस पुरावे दाखल करावे लागतात. तसे ते त्यांच्याकडे नाहीत. मुळात चिक्की खरेदी करण्याचा व्यवहार केन्द्र सरकारने आखून दिलेल्या नियमांनुसारच झाला आहे.

बाजारातल्या दरापेक्षा या चिक्कीचे दर जास्त आहेत असा काही पत्रकारांचा आरोप आहे. पण त्यांना हे दर ठरवण्याची पद्धतच माहीत नाही. तशी ती माहीत करून घ्यावी असाही कोणी प्रयत्न केला नाही. मोठी शोध पत्रकारिता करण्याचा आव आणून त्यांनी ताटल्यांच्या कारखान्याला भेट दिली आणि नेमका त्याच दिवशी तो कारखाना बंद होता याचा अर्थ यात काही तरी काळेबेरे आहे असा हास्यास्पद शोध लावला. आता ते शेवटी पंकजा मुंडे यांचा राजीनामा कशाच्या आधारावर मागणार आहेत ? एका गावात पोचलेल्या चिकीत अळी सापडली म्हणून की कारखाना बंद होता म्हणून की एकाच दिवशी २४ आदेशावर स्वाक्षरी केली म्हणून ? माध्यमांनी काहींशा उथळपणाने यावर चर्चा केली. त्यात सहभागी असलेले काही कथित राजकीय निरीक्षक तर भाजपाच्या बदनामीचे कंकणच हाती बांधून बसले आहेत. त्यांनी बराच आरडा ओरडा केला. काही पत्रकारांनीही आरोप करताना या सार्‍या प्रकाराचा कसलाही अभ्यास केलेला नाही असे प्रत्येकवेळी जाणवले. चिकी कोणत्या दराने खरेदी करावी याचे कोष्टक केन्द्र सरकारने केलेले असते. त्यानुसार खरेदी केली की पंकजा मुंडेंचे काम संपले.

ही चिकी कोणाकडून घ्यावी याची यादीही केन्द्राने तयार केलेली असते. तेव्हा या दरावरून पंकजा मुंडे यांचा राजीनामा मागणे हास्यास्पद आहे. भाजपाच्या काहीतरी भानगडी बाहेर काढल्या पाहिजेत यासाठी आतुर झालेल्या या लोकांनी एवढीही चौकशी केली नाही की, या भरात आपल्या हातून आपला कॉंग्रेस पक्ष तर बदनाम होणार नाही ना ? प्रत्यक्षात तसे आढळले. चिक्की पुरवठा करणारी संस्था कॉंग्रेसच्या कार्यकर्तीची आहे आणि ताटांचा पुरवठा करणारी कंपनी संघ परिवाराशी संंबंधित व्यक्तीची असली तरीही तिचे नाव या यादीत समाविष्ट करण्याचे काम कॉंग्रेसच्याच सरकारने केले आहे. माध्यमांनी कितीही उथळपणा केला तरीही निदान या प्रकरणात पंकजा मुंडे यांचे म्हणणे काय आहे हे लोकांना दाखवावे एवढा तरी सभ्यपणा त्यांना सुचला. तसा तो सुचला आणि पंकजा मुंडे यांनी ज्या आक्रमकतेने आणि आत्मविश्‍वासाने आपल्या विरोधातल्या आरोपांचा प्रतिवाद केला त्यामुळे या आरोपांतली हवाच गेली. माध्यमांनी या पासून धडा घेतला पाहिजे आणि आपली विश्‍वासार्हता टिकवून ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. विश्‍वासार्हता हा माध्यमांचा दागिना असतो. अर्थात ज्यांना हे माहीत नाही आणि कोणाच्या तरी विरोधात गहजब केल्याचे समाधान ज्यांना अगत्याचे वाटते त्यांची गोष्टच वेगळी आहे.

Leave a Comment