
मुंबई पासून १२० किलो मीटर्स अंतरावर नागोठणे गावाच्या आसपास असलेल्या एका बोगद्याजवळ रेल्वे अपघात होऊन २० पेक्षाही अधिक लोक मारले गेले तर २०० प्रवासी जखमी झाले. हा अपघात तर दुर्दैवीच आहे पण त्यानंतर रेल्वेच्या सगळ्या व्यवस्थांची दुर्दशा बघायला मिळाली ती अधिक दु:खदायी आहे. कारण तिच्यात दिसून आलेला असंवेदशील पणाच अपघातास कारणीभूत ठरत असतो. जमीन खचल्याने हा अपघात झाला असे म्हटले जाते पण जमीन खचली आहे की नाही हे पाहणारीही एक यंत्रणा आहे. ती काय करीत होती ? असे अपघात पावसाळ्यात होतात मग या मार्गावर उन्हाळ्यात जमीन खचण्याचे कारण काय ? याचा कोणी विचार केलेला नाही कारण भारतात रेल्वे प्रवासातली सुरक्षितता हा विषय नेहमीच दुय्यम ठरवला जात असतो. रेल्वेचे अंदाजपत्रक मांडले जात असताना मंत्री त्यावर काही तरी बोलतात पण त्याची अंमलबजावणी काही होत नाही. प्रवाशांना जीव मुठीत घेऊनच प्रवास करावा लागतो. गेल्या वर्षभरातले रेल्वेचे अपघात पाहिले तर असे लक्षात येते की, ते मानवी चुकीने झाले असून त्यांना केवळ बेसावधपणाच कारणीभूत आहे. अपघात झाला की, लोक आरडा ओरडा करतात. अपघातास जबाबदार असणारांना कडक शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी करतात. पण काही दिवसांतच त्यांना सार्या गोष्टींचा सर्वांनाच विसर पडतो आणि सुरक्षेस जबाबदार असणारे पुन्हा झोपी जातात.
रेल्वे प्रवास सुरक्षित कधी होईल ?
दिवा ते सावंतवाडी या मार्गावरच्या या रेल्वेेचे इंजिन आणि लगतचे तीन डबे रुळावरून घसरले. गाडी एका बोगद्यातून बाहेर पडताच रुळावरून घसरली. हा अपघात सकाळी ९.३० वाजता झाला. जखमींना ताबडतोब रोहा येथील शासकीय रुग्णालयात नेणे गरजेचे होते पण दुपारी १२ वाजेर्पंत मदत पथके आली नाहीत. जगात संपर्काची एवढी साधने वाढली आहेत त्यामुळे ही मदत ताबडतोब मिळायला हवी होती पण बेगुमानी आडवी आली. रेल्वे मंत्र्यांना ही बातमी समजून त्यांची प्रतिक्रिया यायला सहा तास लागले. या अपघातामुळे कोकण रेल्वेच्या मार्गावरची वाहतूक पूर्णपणे बंद झाली आहे. अशा स्थितीत तरी मंत्र्यांना लवकर बातमी कळायला हवी होती पण तसे झाले नाही. त्यांनी नेहमीप्रमाणे मदतीची घोषणा केली. अपघातात मरण पावलेल्यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी दोन लाख रुपयांची मदत त्यांनी जाहीर केली. गंभीरपणे जखमी असलेल्यांना पन्नास हजार रुपये आणि किरकोळ जखमी असणारांना दहा हजार रुपये मदत दिली जाईल अशीही घोषणा रेल्वे मंत्री मल्लिकार्जुन खर्गे यांनी केली. या अपघातामागच्या कारणांचा शोध घेण्यासाठी चौकशी करण्याचे आदेेश देण्यात आले आहेत.
हा अपघात गाडी बोगद्यातून बाहेर पडल्या बरोबर झाला पण तो बोगद्यात झाला असता तर किती भीषण स्थिती उद्भवली असती याची कल्पनाही करवत नाही. आज हा अपघात झाला आणि कालच एक प्रकार घडला होता. तो पुणे जिल्ह्यात यवत आणि उरुळी कांचनच्या दरम्यान असलेल्या एका क्रॉसिंगवर झाला. गाडीने ट्रॅक्टरला धडक दिली त्यात पाच जण मारले गेले. आता आज ताजा अपघात झाला की आपण कालचे बळी विसरून गेलो. कारण भारतात माणसाच्या जीवाला काही किंमत नाही. आपल्या देशातल्या सगळ्या यंत्रणा एवढ्या निर्दय आणि बेगुमान झाल्या आहेत की आपल्या हातात हजारो लोकांचे प्राण असतात तेव्हा आपण नियमानुसार काम केले पाहिजे, सुरक्षिततेची काळजी घेतली पाहिजे असे त्यांना मनापासून वाटतच नाही. अमेरिकेसारख्या देशात कोणाच्या तरी चुकीने अगदी चार दोन लोक जीवाला मुकले असले तरीही सरकार आणि न्यायालये त्याची गंभीर दखल घेतात आणि त्या अपघाताच्या कारणांच्या मुळाशी जातात. पण भारतात अनेकांच्या मृत्यूस कारणीभूत ठरूनही कोणाचे काही वाकडे होत नाही. असे सतत दिसायला लागले की सुरक्षिततेशी संबंधित कर्मचारी, अधिकारी ढिले होतात. बेसावध राहतात.
आपल्या हातात अनेकांचे प्राण आहेत याची जाणीव त्यांच्या मनात रहात नाही आणि निष्पाप लोकांच्या मृत्यूचे दुष्टचक्र सतत सुरूच रहाते. दरमहा एखादा दुसरा तरी प्रकार असा घडतोच की ज्यामुळे काही लोक मरण पावतात आणि अनेक कुटुंबे उद्ध्वस्त होतात. चार दिवस चर्चा होते आणि पुढचे पाढे पंचावन्न. मुळात कोकण रेल्वे हीच जोखीम आहे कारण तिची उभारणी निसर्गाशी सामना करीत केलेली आहे. जगातले ते एक आश्चर्य मानले जाते. या मार्गावरची जमीन मुरमाड आहे. शिवाय कोकणात फार पाऊस पडतो आणि जमीन खचत असते. पाण्याचे प्रवाह सतत दिशा बदलत असतात. कोकण रेल्वेला नेहमीच असा अपघात होण्याची भीती असते. आता या अपघाताची चर्चा सुरू झाली की कोकण रेल्वेविषयीचे हे प्रवचन सुरू होईल पण या ठिकाणी एक गोष्ट नमूद करावीशी वाटते की, ही रेल्वे चालवणे ही एक मोठी जोखीम असेल तर तिच्याविषयी आपण अधिकच सावध रहायला हवे. तिची ही जोखीम ही काही अचानक उद्भवलेली नाही. ती तर निसर्गात आहे. अपेक्षित आहे. अशा वेळी आपण अन्य रेल्वेमार्गापेक्षा अधिक सावधपणे तिची सुरक्षितता राखली पाहिजे. पण अतिरिक्त सुरक्षितता तर लांबच पण साधी सुरक्षितताही आपण देत नाही. एकुणात आपण सुरक्षितता या विषयावर प्रचंड बेसावध आणि बेगुमान आहोत.
