स्विस बँकेत पाकिस्तान्यांचे १२०० अब्ज रूपये

swissbank
इस्लामाबाद – भारतातील करचुकव्यांनी स्वीस बँकातून दडविलेला काळा पैसा परत आणण्याच्या घोषणा वारंवार केल्या जात असताना शेजारी राष्ट्र पाकिस्तानने त्यांच्या करचुकव्यांनी स्वीस बँकेत दडविलेला काळा पैसा परत आणण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. पाकिस्तानातून या बँकेत १२०० अब्ज रूपये ठेवले गेले असल्याचे सांगितले जात आहे.

पाकिस्तानच्या अर्थविषयक बाबींचे संसदीय सचिव राणा मुहम्मद अफझलखान यांनी पाक संसदेत दिलेल्या माहितीनुसार पाक आणि स्वीर्त्झलंड यांच्यातील सध्याच्या करारावर पुन्हा चर्चा करण्याच्या पाक सरकारच्या प्रस्तावास स्वित्झर्लंडकडून अनुकुल प्रतिसाद मिळाला आहे. यामुळे तेथील बँकात पैसे ठेवलेल्यांची नांवे सरकारला कळू शकणार आहेत. पूर्व राष्ट्रपती असीफ अली जरदारी यांनी १९९० मध्येच प्रचंड मोठ्या प्रमाणावर स्वीस बँकेत पैसे ठेवले असल्याचे आरोप केले जात आहेत. तसेच पाकच्या फेडरल बोर्ड ऑफ रेव्हेन्यूने कर न भरणार्‍यांची ओळख पटविण्याचे काम हाती घेतले असून त्यातून ९२ हजार करचुकव्यांना नोटिसा जारी केल्या गेल्या आहेत.