
वॉशिंग्टन- अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांचा मलिया व साशा या मुलींच्या गाडीचा पाठलाग करणार्या एका कारचालकाला व्हाईट हाऊस चेक पॉईंटजवळ सिक्रेट सर्वीस अधिकार्यानी पकडले असून त्याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आल्याचे समजते. यावेळी ओबामा व्हाईट हाऊसमध्येच होते व विदेश मंत्रयांच्यासोबत पूर्वनियोजित कार्यक्रमाप्रमाणे चर्चा करत होते.
ओबामा कन्यांचा पाठलाग करणार्याला पकडले
सिक्रेट सर्व्हिसचे प्रवक्ते जॉर्ज ओगिल्वी या संदर्भात माहिती देताना म्हणाले की मलिया आणि साशा यांच्या गाडीचा सायंकाळी साडेचारच्या सुमारास ग्रे रंगाची होंडा सेदान पाठलाग करत असल्याचे लक्षात आले.ही गाडी प्रतिबंधित क्षेत्र असलेल्या व्हाईट हाऊस जवळच्या भागातही आली त्यामुळे ती थांबविली गेली आणि चालकाला ताब्यात घेण्यात आले. हा चालक ५५ वर्षांचा असून त्याचे नाव मॅथ्यू ई गोल्डस्टेन असल्याचे निष्पन्न झाले आहे आणि तो ट्रेझरी विभागात नोकरीला आहे.
हा ट्रेझरी विभाग व्हाईट हाऊसच्या जवळ आहे आणि त्याच्याकडे तेथे जाण्यासाठीचा पासही होता असेही समजते. मात्र तरीही सुरक्षेच्या कारणावरून त्याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्या गाडीत कांहीही संशयास्पद आढळले नाही. गोल्डस्टेनला पोलिसांच्या हवाली करण्यात आले आहे.
