मोनिका लोविन्स्कीने मौन सोडले

monica
वॉशिग्टन- अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन यांच्याबरोबरच्या अफेअरमुळे जगभरात चर्चा आणि हेटाळणीचा विषय झालेली मोनिका लोविन्स्कीने आपले या प्रकरणाबाबत गेली २० वर्षे बाळगलेले मौन व्हॅनिटी फेअर मासिकात लिखाण करून संपुष्टात आणले आहे. वयाच्या चाळीशीत असलेल्या मोनिकाने या सर्व प्रकरणात तिच्यावर कसा अन्याय केला गेला या संबंधी लिहायचे ठरविले आहे. १९९० मध्ये हे प्रकरण सुरू झाले १९९८ मध्ये ते चर्चेत आले. त्यात मोनिकालाच दोषी धरण्यात आले. त्यानंतर आत्महत्त्या करावी अशा विचारापर्यंत पोहोचलेल्या मोनिकाला तिच्या आईने खंबीर आधार दिला असे मोनिकाचे म्हणणे आहे.

हे प्रकरण झाले तेव्हा विशीत असलेल्या मोनिकाची जगभर निर्भत्सना करण्यात आली आणि इंटरनेटवरूनही तिची खूपच बदनामी केली गेली. तेव्हापासून मोनिकाने आत्तापर्यंत कांहीही खुलासा केलेला नव्हता.त्यावरूनही क्लिंटन कुटुंबाकडून तिने गप्प राहण्यासाठी प्रचंड पैसे घेतल्याच्या बातम्या येतच होत्या. गेली अनेक वर्षे जगभरातून अवहेलना सोसल्यानंतर मोनिकाने या कथेचा शेवट वेगळा करण्याचा निश्चय केला आहे.

मोनिका लिहिते जे घडले ते निसंशय दोघांच्याही संमतीने घडले मात्र दोष माझ्या एकटीवर आला. जे घडले त्याचा मला नक्कीच पश्चाताप आहे पण आता मात्र मी मान ताठ करून जगणार आहे. भूतकाळात जे घडले ते पुन्हा सांगणार आहे. अध्यक्षांनी माझा फायदा घेतला असा माझा आरोप आहे मात्र तरीही माझी त्याला संमती होती हे मी नाकारणार नाही. मला या प्रकरणात बळीचा बकरा बनविले गेले कारण राष्ट्राध्यक्षांची पोझिशन त्यांना कायम राखायची होती. या काळात मी अनेकदा आत्महत्येचा विचार केला मात्र माझ्या आईने मला यातून बाहेर काढले आणि नवे जीवन सुरू करण्यास प्रेरणा दिली. माझ्यासारखीच परिस्थिती कोणावर आली तर माझ्या अनुभवांचा फायदा त्यांना होईल या आशेने मी हे सर्व लिहिण्याचे ठरविले आहे असेही ती सांगते.