अफगणिस्तानात दरडी कोसळून हजारो लोक ठार

pakistan
काबूल : अफगणिस्तानच्या उत्तर भागात दरडी कोसळण्यामुळे अनेक ठिकाणी मोठा विनाश झाला असून शेकडो घरे कोसळली आहेत. शनिवारी सकाळपर्यंत ३५० लोकांचे मृतदेह हाती लागले असून पडलेल्या घरांच्या अवशेषाखाली हजारो लोक दबले जाऊन मेले असावेत अशी भीती व्यक्त केली जात आहे. अफगणिस्तानच्या बादखशान या परगण्यामध्ये हा प्रकार घडला. या भागातली अनेक खेडी या संकटाने ग्रस्त झाली आहेत.

या भागातील आब बरिक या गावामध्ये केवळ एका तासाच्या अंतरात दरडी कोसळण्याचे दोन मोठे प्रकार घडले. त्यातल्या एका प्रकारात एक पूर्ण टेकडी गावावर कोसळली आहे. पहिली दरड कोसळल्यानंतर काही घरे दबली गेली. म्हणून आसपासचे लोक या प्रकारातल्या जखमी लोकांना मदत करण्यासाठी म्हणून त्या ठिकाणी मोठ्या संख्येने जमा झाले पण केवळ तासाभरात दुसरा असाच प्रकार घडून पूर्ण टेकडी या लोकांच्या अंगावर कोसळली. त्यात ते सगळे दाबले गेले. या एकाच प्रकारात मरण पावलेल्यांची संख्या २५०० असावी अंदाज आहे.

मरण पावलेल्यात लहान मुले आणि महिलांची संख्या मोठी आहे आणि हा भाग अफगणिस्तानच्या एका कोपर्‍यात आहे. ताजिकिस्तान, चीन आणि पाकिस्तान या तीन देशांच्या सीमारेषेवर हा भाग येतो. हा भाग तुलेनेने शांत समजला जातो. मात्र त्याला आता नैसर्गिक संकटाला तोंड द्यावे लागत आहे.