यात्रेकरूंना अनुमती नाकारली; पाक नाराज

pakistan_13
इस्लामाबाद : पाकिस्तानातून भारतात येणार्‍या मुस्लीम यात्रेकरूंना यात्रेकरू प्रवेशपत्र देण्यास नकार दिल्याबद्दल पाकिस्तानने भारताकडे नाराजी व्यक्त केली आहे. भारताने गेल्या काही दिवसात ५०० पाक यात्रेकरूंना व्हिसा नाकारला आहे. ते यात्रेकरू राजस्थानातील अजमेर येथील दर्ग्याला भेट देण्यास येऊ इच्छित होते.

भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशामध्ये हिंदू आणि शिखांची धार्मिक स्थळे आहेत. दोन्ही देशातल्या लोकांना इच्छेप्रमाणे आपल्या धर्मस्थळाला भेटी देण्याची अनुमती देण्याबाबत दोन्ही देशांदरम्यान करार झालेला आहे. भारतातून शीख लोक पाकिस्तानात गेल्यास त्यांना पाकिस्तानने अनुमती द्यावी आणि पाकिस्तानी यात्रेकरू भारतात आल्यास भारताने त्यांना अनुमती द्यावी. असा करार झाला आहे. त्यानुसार त्या पाकिस्तानी यात्रेकरूंना भारताने व्हिसा द्यायला हवा होता, असा पाकिस्तानचे मत आहे.

पाकिस्तानातील भारताच्या वकिलातीतील उपउच्चायुक्त गोपाळ बगले यांना काल पाकिस्तानच्या परराष्ट्र कचेरीत पाचारण करण्यात आले आणि त्यांच्याकडे ही नाराजी व्यक्त करण्यात आली. गेल्या वर्षभरामध्ये पाकिस्तानी यात्रेकरूंना भारताचा व्हिसा नाकारण्याचा चौथा प्रकार असल्याचे पाकिस्तानने म्हटले आहे. अशा निर्णयाचा उभय देशातील संबंध सुधारण्याच्या प्रक्रियेवर गंभीर परिणाम होऊ शकतो असेही पाकिस्तानने बजावले आहे.