Big Bull : यांना असेच म्हटले जात नाही शेअर बाजाराचे ‘बिग बुल्स’, चढ-उतारातही ते कमावतात करोडो रुपये


शेअर बाजारातील काही गुंतवणूकदारांना बिग बुल्स म्हणतात. हे असे गुंतवणूकदार आहेत, ज्यांनी आपल्या शहाणपणाने, संयमाने आणि योग्य वेळी योग्य निर्णय घेतल्याने शेअर बाजारातील चढ-उतारानंतरही गेल्या तीन महिन्यांत कोट्यवधी रुपये कमावले आहेत.

आज आम्ही तुमच्यासाठी शेअर बाजारातील तीन बिग बुल्सची माहिती घेऊन आलो आहोत, ज्यांनी गेल्या तीन महिन्यांत त्यांची नेटवर्थ 10 ते 36 टक्क्यांनी वाढवली आहे. चला या तीन बिग बुल्सबद्दल सविस्तर जाणून घेऊया.

आरके दमाणी अँड असोसिएट्स
राधाकिशन दमाणी हे डी मार्टचे संस्थापक आणि अध्यक्ष आहेत. ते अब्जाधीश गुंतवणूकदार आणि उद्योगपती आहेत. त्यांच्या शिस्तबद्ध गुंतवणूक दृष्टिकोनासाठी आणि व्यावसायिक कौशल्यासाठी ओळखले जाणारे, राधाकिशन दमानी हे भारताचे “रिटेल किंग” म्हणून ओळखले जातात.

राधाकिशन दमाणी यांनी 13 कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली असून, गेल्या तीन महिन्यांत त्यांची एकूण संपत्ती 36.20 टक्क्यांनी वाढली आहे. सध्या त्यांची एकूण संपत्ती 2,28,422 कोटी रुपये आहे आणि बीएफ युटिलिटीज लिमिटेडने त्यांना गेल्या तीन महिन्यांत सर्वाधिक 28.68 टक्के परतावा दिला आहे.

राकेश झुनझुनवाला अँड असोसिएट्स
राकेश झुनझुनवाला अँड असोसिएट्स रेखा झुनझुनवाला चालवतात, त्या एकूण 30 कंपन्यांमध्ये गुंतवणूक करतात आणि त्यांची एकूण संपत्ती 46,676.9 कोटी रुपये आहे. गेल्या तीन महिन्यांत त्यांच्या संपत्तीत 9.39 टक्के वाढ झाली आहे. इनोव्हासिंथ इन्व्हेस्टमेंट्स लिमिटेड कंपनीने गेल्या तीन महिन्यांत राकेश झुनझुनवाला अँड असोसिएट्सला सर्वाधिक परतावा दिला आहे, जो 64.91 टक्के आहे.

रेखा झुनझुनवाला यांनी विमान वाहतूक क्षेत्रातही गुंतवणूक केली आहे, त्यांच्याकडे अकासा एअरचे 46 टक्के शेअर्स आहेत. Akasa Air ही भारतातील अत्यंत कमी किमतीची विमान कंपनी आहे. याची स्थापना अब्जाधीश आणि स्टॉक ट्रेडर राकेश झुनझुनवाला आणि जेट एअरवेजचे माजी सीईओ विनय दुबे यांनी केली होती. Akasa Air ने 22 जुलै 2022 रोजी त्यांच्या वेबसाइटवर फ्लाइट बुकिंग सुरू केले.

अमल पारिख अँड असोसिएट्स
हे होल्डिंग हाऊस 68 कंपन्यांमध्ये गुंतवणूक करतात आणि त्यांची एकूण संपत्ती 34,818.2 कोटी रुपये आहे. गेल्या तीन महिन्यांत अमल पारिख अँड असोसिएट्सच्या निव्वळ संपत्तीमध्ये एकूण 24.20 टक्के वाढ झाली आहे. नर्मदा मॅकप्लास्ट कंपनीने या होल्डिंग हाऊसला गेल्या तीन महिन्यांत 249.96 टक्के परतावा दिला आहे.