
छत्तीसगडच्या दुर्ग पोलिसांनी स्टँडअप कॉमेडियन यश राठीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. आयआयटी भिलाई येथे आयोजित मिराज 5.0 कार्यक्रमात अपशब्द वापरल्याचा आरोप त्याच्यावर आहे. त्याच्या कार्यक्रमाचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आयआयटी व्यवस्थापन आणि काही संघटनांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 15 नोव्हेंबर रोजी संस्थेत यश राठी याच्या शोचे आयोजन करण्यात आले होते. ज्यामध्ये विद्यार्थी, त्यांचे पालक, प्राध्यापक, कर्मचारी उपस्थित होते.
आयआयटीच्या कार्यक्रमात कॉमेडी करून यश राठी अडचणीत, असे काय म्हणाला ज्यामुळे दाखल झाला एफआयआर?
स्टँडअप कॉमेडियन यश राठी विरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) च्या कलम 296 अंतर्गत जिल्ह्यातील जेवरा सिरसा पोलिस चौकीत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. कार्यक्रमात यश राठी याने वापरलेल्या अपशब्दांमुळे संतप्त झालेल्या भारतीय जनता युवा मोर्चा, नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडिया आणि करणी सेनेसह काही संघटनांनी यावर संताप व्यक्त केला. त्यांनी यश राठी याच्याविरोधात आयआयटी व्यवस्थापन आणि पोलिसांकडे तक्रार केली. याप्रकरणी आयआयटी व्यवस्थापनाने पोलिसांत गुन्हाही दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आयआयटी भिलाई येथे मिरज या वार्षिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. स्टँडअप कॉमेडियन यश राठी याचा कार्यक्रम 15 नोव्हेंबर रोजी संस्थेत आयोजित करण्यात आला होता. शो सुरू झाल्यानंतर यश राठी याने कॉमेडीदरम्यान अपशब्द वापरण्यास सुरुवात केली. आयआयटी भिलाईचे संचालक प्रोफेसर राजीव प्रकाश यांनी सांगितले की, यश राठी याने अपशब्द वापरले, तेव्हा व्यवस्थापनाने त्यांना थांबवले आणि कार्यक्रमाच्या मध्यभागी त्याना स्टेजवरून उतरण्यास सांगितले. संस्थेच्या वार्षिक महोत्सवाच्या कार्यक्रमात याआधीही स्टँडअप कॉमेडीचे आयोजन करण्यात आले होते, मात्र अशी असभ्य भाषा कधीच वापरली गेली नसल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाच्या अनेक व्हिडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत, ज्यामध्ये अपशब्द वापरले गेले आहेत.
जेव्हा स्टँडअप कॉमेडियन यश राठीने शोदरम्यान अपशब्द वापरण्यास सुरुवात केली, तेव्हा अनेकांना लाज वाटली. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओ क्लिपमध्ये अनेकजण कानात बोटे घालताना दिसत आहेत. यामध्ये कॉलेजच्या प्राध्यापकांचाही समावेश आहे. काही लोक कार्यक्रमातून उठून निघून गेले. दरम्यान, आयोजन समितीच्या सदस्याने यश राठीला मंचावर बोलावून कार्यक्रम रद्द करण्यास सांगितले. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर वाद आणखी वाढला. एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, दुर्ग जिल्ह्यातील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT) येथील संस्थेच्या वार्षिक महोत्सवात एका कार्यक्रमात आक्षेपार्ह शब्द वापरल्याच्या तक्रारीवरून स्टँडअप कॉमेडियन यश राठी याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
