
टी-20 मालिकेदरम्यान वेस्ट इंडिज संघात दोन मोठे बदल करण्यात आले आहेत. एक तर आंद्रे रसेलला बाहेर करण्यात आले आहे आणि दुसरे म्हणजे निलंबित खेळाडूला संघात परत बोलावण्यात आले आहे. वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डाच्या या निर्णयानंतर इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या टी-20 सामन्याची उत्सुकता वाढली आहे. यजमान वेस्ट इंडिज सध्या 5 टी-20 सामन्यांच्या मालिकेत 0-2 ने पिछाडीवर आहे.
निलंबित खेळाडू आत, आंद्रे रसेल बाहेर, 2 सामने गमावल्यानंतर वेस्ट इंडिजने T20 मालिकेच्या मध्यभागी बदलला संघ
आता प्रश्न असा आहे की, वेस्ट इंडिजने मालिकेच्या मध्यावर संघात केलेला बदल हा पहिल्या दोन टी-20 सामन्यातील पराभवाचा परिणाम आहे की आणखी काही? आंद्रे रसेलबाबत असे बोलले जात आहे की तो दुखापतीमुळे बाहेर आहे. अल्झारी जोसेफ याच्यावर लावण्यात आलेले निलंबन आता संपुष्टात आल्याने त्याला परत बोलावण्यात आले आहे.
अल्झारी जोसेफवर 2 सामन्यांची बंदी घालण्यात आली होती. त्यामुळेच तो मालिकेतील सुरुवातीच्या सामन्यांतून बाहेर राहिला. आता त्याला शेमार जोसेफच्या जागी संघात स्थान मिळाले आहे. आंद्रे रसेलच्या डाव्या घोट्याला दुखापत झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळेच तो इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतील उर्वरित 3 सामने खेळणार नाही. त्याच्या जागी अष्टपैलू शमर स्प्रिंगरचा संघात समावेश करण्यात आला आहे. शमर स्प्रिंगर अलीकडेच श्रीलंकेविरुद्धच्या 2 सामन्यांच्या टी-20 मालिकेत खेळताना दिसला होता.
इंग्लंडने वेस्ट इंडिजविरुद्धचा पहिला T20 8 विकेट्सने जिंकला होता, तर दुसऱ्या T20 मध्ये 7 गडी राखून विजय मिळवला होता. आता तिसऱ्या टी-20मध्येही त्यांनी विजय मिळवला, तर मालिकाही त्यांचीच होईल, जी वेस्ट इंडिजला अजिबात करु द्याचे नाही. कॅरेबियन संघाची आता टी-20 मालिकेत पूर्ण पुनरागमन करण्याकडे लक्ष असेल. मालिकेतील शेवटचे 3 सामने डॅरेन सॅमी क्रिकेट मैदानावर खेळवले जातील. हे तीन सामने जिंकूनच वेस्ट इंडिजला मालिका जिंकता येईल.
