50 वर्षांनंतर होणार हा ऐतिहासिक कसोटी सामना, ICC सुरू करणार आहे आणखी एक नवीन स्पर्धा


पुढील काही वर्षे क्रिकेट चाहत्यांसाठी आणखी रोमांचक असणार आहेत, कारण आयसीसी एक नवीन स्पर्धा सुरू करण्याच्या तयारीत आहे. यासोबतच जवळपास 50 वर्षांच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर एक विशेष कसोटी सामना खेळवला जाणार आहे. हे सर्व महिला क्रिकेटच्या पुढील 4 वर्षांच्या वेळापत्रकाचा भाग आहेत, हे उघड झाले आहे. सोमवार 4 नोव्हेंबर रोजी, 2025 ते 2029 या कालावधीतील महिलांचा भविष्य दौरा कार्यक्रम जाहीर करण्यात आला, ज्यामध्ये महिला क्रिकेटमधील कसोटी सामन्यांची संख्या वाढवण्यासोबतच इतर काही विशेष मालिकाही जाहीर करण्यात आल्या आहेत.

या FTP मध्ये भारतीय महिला क्रिकेट संघाचे अनेक महत्त्वाचे सामने देखील समोर आले आहेत, ज्या दरम्यान टीम इंडिया दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडविरुद्ध कसोटी सामने खेळणार आहे. भारतीय संघ या FTP मध्ये एकूण 4 कसोटी सामने खेळणार आहे, त्यापैकी 2 सामने 2026 मध्ये दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर खेळले जातील. भारतीय संघ ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडविरुद्ध मायदेशात 2 कसोटी सामने खेळणार आहे. या FTP मध्ये सर्वात खास एंट्री आहे, ती वेस्ट इंडिजच्या महिला क्रिकेट संघाची, जी 20 वर्षांच्या दीर्घ कालावधीनंतर लाल चेंडू क्रिकेटमध्ये पुनरागमन करत आहे.

होय, 2003-04 मध्ये (पाकिस्तानविरुद्ध) शेवटचा कसोटी सामना खेळलेला वेस्ट इंडिजचा महिला संघ पुन्हा कसोटी सामना खेळणार आहे. त्याची सुरुवात 50 वर्षांनंतर होणाऱ्या ऐतिहासिक कसोटीने होणार आहे. हा कसोटी सामना वेस्ट इंडिज आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात फक्त वेस्ट इंडिजमध्ये खेळवला जाईल. याआधी 1976 मध्ये दोन्ही संघांमध्ये दोन कसोटी सामने खेळले गेले होते. विंडीज महिला संघाच्या 12 कसोटी सामन्यांच्या इतिहासातील हे पहिले 2 सामने होते. एकंदरीत, वेस्ट इंडिज संघ 2026 ते 2028 दरम्यान 3 कसोटी सामने खेळणार आहे.

या सगळ्याशिवाय आयसीसी आता महिलांसाठी आणखी एक नवीन स्पर्धा सुरू करणार आहे. ही चॅम्पियन्स ट्रॉफी आहे, पण पुरुष क्रिकेटप्रमाणे ती एकदिवसीय नाही, तर टी-२० फॉरमॅटमध्ये खेळली जाईल. या स्पर्धेची पहिली आवृत्ती 2027 मध्ये खेळवली जाईल आणि ही स्पर्धा श्रीलंकेत आयोजित केली जाईल. पुरुषांच्या चॅम्पियन्स ट्रॉफीप्रमाणेच यात काही कमी संघ सहभागी होतील. एकूण 6 संघांमध्ये 16 सामने खेळवले जाणार आहेत. ही स्पर्धा सुरू करण्यामागे आयसीसीची जुनी योजना आहे, ज्या अंतर्गत दरवर्षी एक स्पर्धा आयोजित करण्याचे उद्दिष्ट आहे.

या व्यतिरिक्त, ICC ने 2026 ते 2029 या कालावधीत 3 मोठ्या T20 लीगसाठी विंडो देखील निश्चित केली आहे, ज्याचा सर्वात मोठा परिणाम BCCI च्या लीग WPL वर होईल. आत्तापर्यंत मार्चमध्ये होणारी ही लीग 2026 पासून जानेवारी-फेब्रुवारी दरम्यान खेळवली जाईल. यामुळे ऑस्ट्रेलियन महिला संघाचा घरगुती हंगाम जानेवारी-फेब्रुवारीऐवजी फेब्रुवारी-मार्चमध्ये सुरू होणार आहे. तर नोव्हेंबरमध्ये WBBL आणि ऑगस्टमध्ये द हंड्रेडसाठी विंडो निश्चित करण्यात आली आहे.