IND vs NZ : विराट कोहलीने मोडला धोनीचा मोठा विक्रम, न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीत केली ही कामगिरी


विराट कोहलीने न्यूझीलंडविरुद्ध बंगळुरू कसोटीत एमएस धोनीचा मोठा विक्रम मोडला आहे. नाणेफेक जिंकून भारतीय कर्णधार रोहित शर्माने प्लेईंग इलेव्हनची घोषणा करताच विराट कोहलीच्या नावावर एक मोठी कामगिरी नोंदवली गेली. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की भारतीय प्लेइंग इलेव्हनच्या घोषणेचा विराट कोहलीने केलेल्या विक्रमाशी काय संबंध? खरंतर, त्याचा संबंध असा आहे की जर विराट कोहली न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीच्या प्लेइंग इलेव्हनचा भाग नसता, तर तो धोनीचा बंगळुरूमधील विक्रम मोडू शकला नसता. कोहलीने बंगळुरूमध्ये धोनीचा जो विक्रम मोडला आहे, तो भारतासाठी सर्वाधिक आंतरराष्ट्रीय सामने खेळलेल्या खेळाडूशी संबंधित आहे.

भारतासाठी सर्वाधिक आंतरराष्ट्रीय सामने खेळण्याचा विक्रम सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे, ज्याने आपल्या कारकिर्दीत 664 सामने खेळले. त्यानंतर एमएस धोनी 535 सामन्यांसह या यादीत दुसऱ्या स्थानावर आहे. पण, विराट कोहलीने न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीसाठी मैदानात उतरताच धोनीला तिसऱ्या क्रमांकावर ढकलले. न्यूझीलंडविरुद्ध बंगळुरू येथे खेळला जाणारा पहिला कसोटी सामना विराट कोहलीच्या कारकिर्दीतील 536 वा आंतरराष्ट्रीय सामना आहे.

सचिन, विराट आणि धोनी व्यतिरिक्त, राहुल द्रविड हा एकमेव भारतीय खेळाडू आहे ज्याने भारतासाठी 500 किंवा त्याहून अधिक आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. भारतासाठी 504 आंतरराष्ट्रीय सामने खेळून द्रविड चौथ्या स्थानावर आहे. टीम इंडियाचा सध्याचा कर्णधार रोहित शर्मासाठी, न्यूझीलंडविरुद्ध बंगळुरू कसोटी हा त्याच्या कारकिर्दीतील 486 वा आंतरराष्ट्रीय सामना आहे. सर्वाधिक आंतरराष्ट्रीय सामने खेळणाऱ्या भारतीय खेळाडूंमध्ये रोहित शर्मा पाचव्या स्थानावर आहे.

न्यूझीलंडविरुद्ध बेंगळुरू कसोटीत सर्वाधिक सामने खेळण्याच्या बाबतीत धोनीला मागे टाकणाऱ्या विराट कोहलीच्या कामगिरीबद्दल सांगायचे तर, 9 चेंडूंचा सामना केल्यानंतर त्याला खातेही उघडता आले नाही. प्रदीर्घ कालावधीनंतर तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या विराटची पुन्हा एकदा खराब कामगिरी झाली.