
टीम इंडियाचा यष्टिरक्षक फलंदाज ऋषभ पंतसाठी आजचा दिवस खूप खास आहे. त्याचा जन्म आजच्या दिवशी म्हणजेच 4 ऑक्टोबर 1997 रोजी उत्तराखंडमधील रुरकी येथे झाला. पंत आज 27 वा वाढदिवस साजरा करत आहे. वाढदिवसानिमित्त त्याने यशाचा मंत्र सांगत आपल्या मनातील भावना चाहत्यांशी शेअर केल्या आहेत. शार्लोट फ्रीमनच्या काही प्रेरणादायी ओळी शेअर करताना पंतने चाहत्यांना पुन्हा पुन्हा स्वतःच्या शोधात हरवून जाण्यास सांगितले. स्वतःवर आणि आपल्या प्रवासावर विश्वास ठेवा आणि इतर लोक काय विचार करतात हे विसरून जाण्याचा सल्लाही दिला. एका रात्रीत यशाची अपेक्षा करू नका, असे त्याने चाहत्यांना सांगितले.
Rishabh Pant Birthday : हरवून जा, इतके हरवून जा की… ऋषभ पंतच्या वाढदिवसानिमित्त चाहत्यांशी शेअर केल्या त्याच्या मनातील भावना
ऋषभ पंत 2022 मध्ये एका भीषण कार अपघाताचा बळी ठरला. त्याचे पुनरागमन इतरांसाठी खूप प्रेरणादायी आहे. अशा परिस्थितीत पंतने आपल्या 27 व्या वाढदिवसानिमित्त आपल्या जीवन प्रवासातून शिकत चाहत्यांना प्रेरित करण्याचा प्रयत्न केला आहे. त्याने चाहत्यांना सांगितले की, जेव्हा तुम्हाला हरवल्यासारखे वाटत असेल, गोंधळलेले असेल किंवा तुम्हाला जे मिळवायचे आहे, ते साध्य केले नाही असे वाटत असेल, तेव्हा स्वतःबाबत जास्त कठोर होऊ नका. जर तुम्ही हे सर्व आधी मिळवले असते आणि शिकण्यासारखे काहीच राहिले नसते, तर तुमचे आयुष्य कंटाळवाणे झाले असते. म्हणून धीर धरा, तुमच्यासोबत जे काही होत आहे, ते तुम्हाला समजेल. तुमचा प्रत्येक अनुभव तुम्हाला जिथे असायला हवे, तिथे घेऊन जाईल. गमावण्याची किंवा चुका करण्याची भीती बाळगू नका. स्वत:च्या शोधात हरवून जा आणि पुन्हा पुन्हा स्वत:ला शोधा. स्वतःवर विश्वास ठेवा आणि इतरांना काय वाटते ते विसरून जा.

ऋषभ पंत वयाच्या 12व्या वर्षी आईसोबत रुरकीहून दिल्लीला आला आणि क्रिकेट खेळू लागला. पंत क्रिकेटची एबीसीडी शिकण्यासाठी दिल्लीला आला आणि त्याने प्रथम सोनेट क्रिकेट अकादमीमध्ये प्रवेश घेतला. कठोर परिश्रमानंतर त्याला 2015 मध्ये वयाच्या 18 व्या वर्षी प्रथम श्रेणीत पदार्पण करण्याची संधी मिळाली. रणजी ट्रॉफीमध्ये त्याने पहिला सामना बंगालविरुद्ध खेळला त्यानंतर त्याने यावर्षी लिस्ट ए मध्ये झारखंडविरुद्ध पदार्पण केले.
पंतने 2016-17 च्या रणजी हंगामात 308 धावांची खेळी खेळली होती. प्रथम श्रेणीत अशी कामगिरी करणारा तो तिसरा सर्वात तरुण फलंदाज ठरला. या खेळीमुळेच तो प्रसिद्धीच्या झोतात आला. यानंतर पंतने मागे वळून पाहिले नाही, तो 2016 मध्ये अंडर-19 विश्वचषक खेळला. त्यानंतर यावर्षी आयपीएलमध्ये पदार्पण केले. लवकरच तो भारताच्या T20 संघाचा भाग बनला. 2017 मध्ये इंग्लंडविरुद्ध टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केल्यानंतर त्याला 2018 मध्ये कसोटी आणि एकदिवसीय सामन्यांमध्ये संधी मिळाली.
