
कानपूर कसोटीत टीम इंडियाने बांगलादेशचा 7 गडी राखून पराभव करत मालिका 2-0 अशी खिशात घातली. असे असतानाही कर्णधार रोहित शर्मा आणि गौतम गंभीर यांचे टेंशन वाढले आहे. त्यामागचे कारण आहे मोहम्मद शमीची दुखापत. वास्तविक, घोट्याच्या दुखापतीनंतर शस्त्रक्रिया करून परतलेला शमी बंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये पुनर्वसन करत होता. यादरम्यान त्याच्या गुडघ्याला सूज आली आहे. न्यूझीलंडविरुद्धची कसोटी आणि ऑस्ट्रेलिया दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर शमीच्या नव्या दुखापतीने टीम इंडिया चिंतेत आहे.
कानपूरच्या विजयानंतर वाढले रोहित-गंभीरचे टेंशन, टीम इंडियाचा हा गोलंदाज पुन्हा झाला दुखापतग्रस्त
मोहम्मद शमी टीम इंडियाच्या मुख्य वेगवान आक्रमणाचा एक भाग आहे. दुखापतीमुळे तो जवळपास 10 महिन्यांपासून संघाबाहेर आहे. फेब्रुवारीमध्ये झालेल्या शस्त्रक्रियेनंतर त्याने आता पुनर्वसन सुरू केले होते. टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, तो एनसीएमध्ये वेगाने बरा होत होता, पण त्याच दरम्यान त्याच्या गुडघ्याला सूज आली. त्यामुळे मोहम्मद शमीचे पुनरागमन होण्यास विलंब होऊ शकतो. त्याला सुमारे 6 ते 8 आठवडे लागू शकतात. 11 ऑक्टोबरपासून बंगालसाठी रणजी ट्रॉफीमध्ये भाग घेऊन शमी क्रिकेटमध्ये पुनरागमन करणार होता.
ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाण्यापूर्वी कर्णधार रोहित शर्मा आणि मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर त्याला न्यूझीलंडविरुद्ध संधी देण्याचा विचार करत होते. मात्र, आता हे घडणे अवघड दिसत आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर-गावस्कर करंडक स्पर्धेला आता फक्त 2 महिने उरले आहेत. WTC फायनलपूर्वी 22 नोव्हेंबरपासून होणारी ही 5 सामन्यांची कसोटी मालिका खूप महत्त्वाची असेल.
मोहम्मद शमीसाठी या मालिकेपूर्वी तंदुरुस्त असणे खूप महत्त्वाचे होते. कारण, 2023 च्या एकदिवसीय विश्वचषक फायनलनंतर तो एकही सामना खेळलेला नाही. तर शमीने शेवटचा कसोटी सामना जून 2023 मध्ये ओव्हल येथे ऑस्ट्रेलियाविरुद्ध WTC फायनलमध्ये खेळला होता. अशा परिस्थितीत, त्याने तंदुरुस्त होणे आणि वेळेपूर्वी सराव करणे महत्वाचे आहे.
