
श्रीलंकेने गॉल कसोटीत न्यूझीलंडचा 63 धावांनी पराभव केला. यासह त्यांनी 2 कसोटी मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. श्रीलंकेच्या विजयात जयसूर्याची जादू कामी आली. होय, नक्कीच ही जादू प्रशिक्षक सनथ जयसूर्याची आहे, पण जी जादू मैदानावर पाहायला मिळाली, ती प्रभात जयसूर्याची होती. श्रीलंकेच्या क्रिकेटमध्ये चमकणाऱ्या प्रभात जयसूर्याची कहाणी खूप रंजक आहे. हा तोच खेळाडू आहे, जो एकेकाळी फिटनेसमुळे संघातून बाहेर होता. पण, न्यूझीलंडविरुद्धच्या विजयात त्याने 9 विकेट घेत सर्वात महत्त्वाची भूमिका बजावली.
SL vs NZ : ज्याला फिटनेसमुळे श्रीलंकेने वगळले होते संघातून, त्यानेच जिंकवून दिला सामना, गॉल कसोटीत न्यूझीलंडचा पराभव
गॉल कसोटीत श्रीलंकेने न्यूझीलंडसमोर विजयासाठी 275 धावांचे लक्ष्य ठेवले होते. न्यूझीलंडला हा सामना जिंकण्याची चांगली संधी होती आणि ती वेळही योग्य होती. परंतु, सर्व काही अनुकूल असूनही त्याला गॉलचा किल्ला काबीज करता आला नाही. न्यूझीलंडच्या या इच्छेमध्ये श्रीलंकेचा डावखुरा फिरकी गोलंदाज मोठा अडथळा ठरला.
275 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना न्यूझीलंडने चौथ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत 8 गड्यांच्या मोबदल्यात 207 धावा केल्या होत्या. न्यूझीलंडसाठी चांगली गोष्ट म्हणजे रचिन रवींद्र 91 धावांवर नाबाद राहिला. श्रीलंकेला पाचव्या दिवशी विजयासाठी आणखी दोन विकेट्स घ्यायच्या होत्या, तर न्यूझीलंडला उर्वरित 68 धावा करायच्या होत्या. या धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी न्यूझीलंडचा संघ आला, तेव्हा तो जास्त काळ विकेटवर टिकू शकला नाही. अर्ध्या तासात त्याच्या दोन्ही विकेट पडल्या. पाचव्या दिवशी प्रभात जयसूर्याने न्यूझीलंडच्या उर्वरित दोन विकेट्स घेतल्या आणि यासह श्रीलंकेने सामना जिंकला.
गाले कसोटीत श्रीलंकेच्या विजयात प्रभात जयसूर्या हिरो ठरला, त्याने दोन्ही डावात एकूण 9 बळी घेतले. त्याने पहिल्या डावात 4 तर दुसऱ्या डावात 5 बळी घेतले. प्रभात जयसूर्याने 2018 साली श्रीलंकेकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. पण, त्यानंतर फिटनेसचे कारण देत त्याला संघातून वगळण्यात आले होते. त्याने 2022 साली ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी पदार्पण केले. या मालिकेसाठी अनफिट घोषित करण्यात आलेल्या जयसूर्याला बोलावणे भाग पडले, कारण तेथील 4 खेळाडूंना कोरोनाची लागण झाली होती. श्रीलंकेच्या संघात पुन्हा ती संधी मिळाल्यानंतर प्रभात जयसूर्याने मागे वळून पाहिले नाही.
गॉल येथे न्यूझीलंडचा पराभव करून, श्रीलंकेने 2000 पासून कोणत्याही एका ठिकाणी सर्वाधिक 25 कसोटी सामने जिंकण्याचा विक्रम केला आहे. श्रीलंकेने येथे खेळल्या गेलेल्या 43 कसोटी सामन्यांमध्ये गॉल येथे आपल्या 25व्या विजयाची स्क्रिप्ट लिहिली. या कालावधीत इंग्लंडने लॉर्ड्सवर 25 विजयांची नोंद केली आहे, परंतु 48 कसोटी सामने खेळले आहेत.
