जे करीना कपूर आणि दीपिका पदुकोण देखील करू शकल्या नाहीत, ते करणार तृप्ती डिमरी


तरुण पिढीतील अभिनेत्रींमध्ये आज कोणाचे नाव चर्चेत असेल, तर ती दुसरी तिसरी कोणी नसून तृप्ती डिमरी आहे. 2017 मध्ये रिलीज झालेल्या ‘पोस्टर बॉईज’ या चित्रपटातून तिने करिअरची सुरुवात केली असली, तरी त्यानंतर तिने ‘लैला मजनू’, ‘काला’ आणि ‘बुलबुल’ सारखे चित्रपट केले, पण ती लोकांच्या नजरेत वर्ष 2023मध्ये रिलीज झालेल्या रणबीर कपूरच्या ‘ॲनिमल’ चित्रपटातून आली. या चित्रपटात झोयाची भूमिका साकारून ती प्रसिद्ध झाली.

‘अॅनिमल’ रिलीज झाल्यानंतर ती इतकी प्रसिद्धीझोतात आली की आज तिच्याकडे कामाची कमतरता नाही. या वर्षी जुलैमध्ये तिचा विकी कौशल आणि एमी विर्कसोबतचा ‘बॅड न्यूज’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. यावर्षी ती आणखी तीन चित्रपटांमध्ये दिसणार आहे. दोन महिन्यांत तिचे तीन चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. बॉलिवूडमध्ये करीना कपूर, दीपिका पादुकोणसह अनेक बड्या अभिनेत्रींचा दबदबा असला, तरी करीना आणि दीपिका दोन महिन्यांत तीन चित्रपट घेऊन आलेल्या नाहीत. चला तुम्हाला तृप्तीच्या त्या चित्रपटांबद्दल सांगतो.

विकी विद्या का वो वाला व्हिडिओ- या यादीतील पहिला चित्रपट ‘विकी विद्या का वो वाला व्हिडिओ’ आहे, जो 11 ऑक्टोबर रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. हा एक कॉमेडी चित्रपट आहे, ज्याचे दिग्दर्शन राज शांडिल्य यांनी केले आहे. या चित्रपटात तृप्तीच्या सोबत राजकुमार राव दिसणार आहे. या चित्रपटाची बऱ्याच दिवसांपासून चर्चा होत आहे. या चित्रपटाचा ट्रेलर 12 सप्टेंबरला रिलीज झाला होता, जो लोकांना खूप आवडला होता.

भूल भुलैया 3- या यादीतील पुढचा चित्रपट ‘भूल भुलैया 3’ आहे, ज्यामध्ये ती कार्तिक आर्यनसोबत दिसणार आहे. या चित्रपटाचा दुसरा भाग 2022 मध्ये आला होता, ज्यामध्ये कार्तिकसोबत कियारा अडवाणी दिसली होती. मात्र, तिसऱ्या भागात कियाराच्या जागी तृप्तीला कास्ट करण्यात आले. रिलीजची तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही, परंतु निर्मात्यांनी हा चित्रपट दिवाळीला येणार असल्याचे निश्चित केले आहे. म्हणजेच हा चित्रपट ऑक्टोबरच्या अखेरीस किंवा नोव्हेंबरच्या सुरुवातीला प्रदर्शित होऊ शकतो. अजय देवगणचा ‘सिंघम अगेन’ही दिवाळीला रिलीज होणार आहे. म्हणजे दोन्ही चित्रपटांमध्ये टक्कर होणार आहे.

धडक 2- शेवटचा चित्रपट आहे ‘धडक 2’. हा चित्रपट 22 नोव्हेंबरला थिएटरमध्ये प्रदर्शित होत आहे. हा चित्रपट करण जोहरच्या धर्मा प्रोडक्शनच्या बॅनरखाली बनला आहे. तृप्ती या चित्रपटाची लीड आहे आणि सिद्धांत चतुर्वेदी या चित्रपटात तिच्या सोबत दिसणार आहे. हा चित्रपट 2018 मध्ये रिलीज झालेल्या ‘धडक’ या चित्रपटाचा सिक्वेल आहे, ज्यामध्ये जान्हवी कपूर आणि ईशान खट्टर दिसले होते. मात्र, यावेळी या दोघांची जागा तृप्ती आणि सिद्धांत यांनी घेतली.

मात्र, आता या तिन्ही चित्रपटांच्या माध्यमातून तृप्ती बॉक्स ऑफिसवर कोणती जादू चालवणार हे पाहावे लागेल. ‘ॲनिमल’ नंतर तिचे नाव ज्या प्रकारे प्रसिद्धीझोतात आले आहे, ते ती राखू शकेल की नाही? यावर्षी प्रदर्शित झालेल्या तिच्या ‘बॅड न्यूज’लाही लोकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. या चित्रपटाने जगभरात 113.75 कोटी रुपयांची कमाई केली होती.