रोहितने रात्री 2.30 वाजता केला अचानक मेसेज आणि त्यानंतर… अनुभवी गोलंदाजाने केला आश्चर्यचकित करणारा खुलासा


रोहित शर्मा हा केवळ यशस्वी फलंदाजच नाही, तर यशस्वी कर्णधारही आहे. अलीकडेच, त्याच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने टी-20 विश्वचषक 2024 चे विजेतेपद पटकावले. त्याचबरोबर रोहितने कर्णधार म्हणून 5 वेळा आयपीएलचे विजेतेपदही पटकावले आहे. माजी दिग्गज क्रिकेटपटूंपासून रोहितच्या सहकाऱ्यांपर्यंत सर्वजण त्याच्या कर्णधारपदाचे कौतुक करतात. दरम्यान, रोहितच्या मित्राने एक मोठे गुपित उघड केले आहे. त्याने सांगितले की रोहित मध्यरात्रीही सामन्यासाठी योजना करत असतो.

मुंबई इंडियन्सकडून रोहितसोबत खेळणारा भारताचा अनुभवी फिरकीपटू पियुष चावला याने मोठा खुलासा केला आहे. रात्री अडीच वाजता रोहितने त्याला त्याच्या खोलीत बोलावून डेव्हिड वॉर्नरला बाद करण्याची योजना आखली, तेव्हाच्या या घटनेबद्दल पियुष चावलाने सांगितले आहे. यादरम्यान पियुष चावलाने रोहितच्या कर्णधारपदाच्या गुणवत्तेबद्दलही चर्चा केली आणि त्याला एक चांगला लीडर म्हटले.

शुभंकर मिश्रासोबतच्या पॉडकास्टमध्ये रोहित शर्माबद्दल बोलत असताना पीयूष चावला म्हणाला, मी त्याच्यासोबत खूप क्रिकेट खेळलो आहे, त्यामुळे माझे त्याच्यासोबत चांगले बॉन्डिंग आहे. मैदानाबाहेरही आम्ही एकत्र आहोत. एकदा रात्री 2.30 वाजता त्याने मला मेसेज केला आणि विचारले, तू जागा आहेस का? यानंतर त्याने कागदावर फील्ड बनवले आणि वॉर्नरला आऊट करण्याबाबत त्याने माझ्याशी चर्चा केली. त्यावेळीही तो माझ्याकडून सर्वोत्तम कसा मिळवू शकतो याचा विचार करत होता.

रोहितच्या कर्णधारपदाच्या गुणवत्तेबद्दल बोलताना पीयूष म्हणाला, एक कर्णधार असो अथवा लीडर असो तो कर्णधार नाही, तो लीडर आहे. 2023चा एकदिवसीय विश्वचषक असो किंवा 2024चा टी-20 विश्वचषक असो, त्याने ज्या पद्धतीने फलंदाजी केली, त्याने पुढील फलंदाजांना सोपे वाटेल, असा टोन सेट केला. तो खरा लीडर आहे. तो तुम्हाला पूर्ण स्वातंत्र्य देतो.