राहुल द्रविडच्या मुलाची टीम इंडियात तर झाली निवड, पण तो खेळू शकणार नाही अंडर-19 विश्वचषक ? हे आहे कारण


21 सप्टेंबरपासून भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या अंडर-19 संघांमध्ये एकदिवसीय आणि चार दिवसांची मालिका खेळवली जाणार आहे. या घरच्या मालिकेसाठी बीसीसीआयने टीम इंडियाचा संघ जाहीर केला आहे. या मालिकेसाठी राहुल द्रविडचा मुलगा समित याचीही निवड झाली आहे. समितच्या निवडीनंतर बराच वाद झाला, कारण त्याची कामगिरी चांगली नसतानाही त्याला संघात संधी देण्यात आली. सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक चाहत्यांनी बीसीसीआयवर घराणेशाहीचा आरोप केला. खराब कामगिरी असूनही ‘ज्युनियर द्रविड’ टीम इंडियामध्ये सामील झाला असेल, परंतु आता तो 2026 अंडर-19 विश्वचषक खेळू शकणार नाही. यामागे मोठे कारण आहे.

राहुल द्रविड हा भारताच्या सर्वात यशस्वी फलंदाजांपैकी एक आहे. समितने कूचबिहार ट्रॉफी ज्युनियर स्पर्धेत आपले फलंदाजी आणि गोलंदाजीचे कौशल्य दाखवले. त्यामुळे सर्वांच्या नजरा त्याच्यावर खिळल्या होत्या. त्याची अलीकडची कामगिरी खूपच निराशाजनक आहे. कर्नाटकच्या T20 स्पर्धेत, महाराजा T20 ट्रॉफीमध्ये त्याला 7 सामन्यात केवळ 82 धावा करता आल्या. त्याचा स्ट्राइक रेटही 114 राहिला. असे असतानाही त्याची टीम इंडियात निवड झाल्यावर गदारोळ झाला. मात्र, 2026 मध्ये अंडर-19 विश्वचषक खेळू न शकण्याचे कारण त्याची कामगिरी नसून त्याचे वय आहे. समित सध्या 18 वर्ष 296 दिवसांचा आहे. येत्या दोन वर्षांत तो 21 वर्षांचा होईल. त्यामुळे पुढील अंडर-19 विश्वचषकापर्यंत तो वयोमर्यादा ओलांडणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. यामुळे तो स्पर्धेत सहभागी होण्यास अपात्र ठरेल.

निवडीवर काय म्हणाला समित?
टीम इंडियात निवड झाल्यानंतर समितने आपली प्रतिक्रिया दिली आहे. निवडीबद्दल त्याने आनंद व्यक्त केला आणि त्याच्यासाठी प्रार्थना करणाऱ्यांचे आभार मानले. ज्युनियर द्रविड पुढे म्हणाला की, या क्षणासाठी त्याने खूप मेहनत घेतली आहे.


महाराजा ट्रॉफीमध्ये फ्लॉप होऊनही ऑस्ट्रेलियाविरुद्ध संधी दिल्याने चाहत्यांनी निवड समितीवर प्रश्न उपस्थित केले आहेत. समितची निवड का झाली असा त्यांचा प्रश्न आहे. मात्र, यामागचे कारण आहे कूचबिहार ट्रॉफीमधील त्याची कामगिरी. ही 19 वर्षांखालील स्पर्धा यावर्षी जानेवारीत खेळवली गेली. समितने या स्पर्धेत कर्नाटकसाठी चमकदार कामगिरी केली होती. त्याने स्पर्धेतील 8 सामन्यात 362 धावा केल्या आणि 16 बळीही घेतले. या कामगिरीच्या जोरावर त्याचा संघ चॅम्पियन बनला.