
कॅरेबियन प्रीमियर लीगचा 12वा हंगाम सुरू आहे. तिसरा सामना 31 ऑगस्ट रोजी त्रिनबागो नाईट रायडर्स आणि सेंट किट्स आणि नेव्हिस पॅट्रिओट्स यांच्यात खेळला गेला. या सामन्यात त्रिनबागो संघाने सेंट किट्स आणि नेव्हिस संघाचा 44 धावांनी पराभव केला. सेंट किट्स आणि नेव्हिसचा कर्णधार आंद्रे फ्लेचरने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. त्याचा हा निर्णय अत्यंत घातक ठरला. त्रिनबागोसाठी सलामीला आलेल्या सुनील नरेनने येताच कहर केला. त्याने षटकार आणि चौकारांचा वर्षाव सुरू केला, जो तो बाद झाल्यानंतरही सुरूच होता. तो गेल्यानंतर निकोलस पुरन आणि केसी कार्टी यांनी कडवी झुंज दिली. प्रत्युत्तरात सेंट किट्स आणि नेव्हिसच्या फलंदाजांनीही 31 चौकार ठोकले, पण ते विजयासाठी पुरेसे नव्हते.
सीपीएलमध्ये निकोलस पूरन-सुनील नरेनची हाहाकारी फलंदाजी, 31 चौकार मारूनही विरोधी संघाला मिळवता आला नाही विजय
आयपीएलप्रमाणेच सीपीएलमध्येही सुनील नरेन सलामीला आला होता. त्याने डावाची झंझावाती सुरुवात केली आणि 200 च्या स्ट्राईक रेटने 19 चेंडूत 38 धावा केल्या. या खेळीत त्याने 3 चौकार आणि 4 षटकार मारले. चौथ्या षटकात तो बाद झाला, तेव्हा निकोलस पूरन क्रीजवर आला. पुरनने नरेनची उणीव जाणवू दिली नाही.
पुरननेही शानदार फलंदाजी करत 225 च्या स्ट्राईक रेटने 43 चेंडूत 97 धावा केल्या. यादरम्यान त्याने 7 चौकार आणि 9 षटकार मारले. अशा प्रकारे दोन्ही फलंदाजांनी मिळून एकूण 23 चौकार लगावले. पुरन आणि नरेन यांच्याशिवाय केसी कार्टीने स्फोटक फलंदाजी केली. त्याने 35 चेंडूत 208 च्या स्ट्राईक रेटने 73 धावा केल्या, ज्यात 9 चौकार आणि 3 षटकारांचा समावेश होता. अशाप्रकारे त्रिनबागो संघाने 20 षटकांत 250 धावा केल्या. सीपीएलच्या इतिहासातील ही तिसरी सर्वोच्च धावसंख्या आहे.
251 धावांच्या विशाल लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या सेंट किट्स अँड नेव्हिस संघानेही वेगवान सुरुवात करण्याचा प्रयत्न केला. मात्र, या प्रयत्नात त्यांनी दुसऱ्या षटकातच 2 विकेट गमावल्या. असे असतानाही त्यांच्या फलंदाजांनी हिंमत हारली नाही आणि आपले प्रयत्न सुरूच ठेवले. एविन लुईस, मायकेल लुईस आणि ट्रिस्टियन स्टब्स यांनी मिळून 14 चौकार आणि 7 षटकार ठोकले. उर्वरित फलंदाजांनी 4 षटकार आणि 6 चौकार लगावले. असे असतानाही संपूर्ण संघ 206 धावाच करू शकला. सुनील नरेनने गोलंदाजीतही कमाल केली आणि या उच्च धावसंख्येच्या सामन्यात त्याने 4 षटकात केवळ 24 धावा दिल्या. त्याने 2 महत्त्वाच्या विकेटही घेतल्या.
