शुभमन गिलवर जळायचा शिखर धवन, स्वतःच केला खुलासा, कारण ऐकून तुम्हाला वाटेल आश्चर्य


भारतीय संघाचा अनुभवी सलामीवीर शिखर धवनने 2010 मध्ये टीम इंडियात प्रवेश केला होता. 12 वर्षे संघाच्या सलामीची फलंदाजी सांभाळल्यानंतर त्याने 24 ऑगस्ट रोजी आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. निवृत्तीनंतर धवननेच एक धक्कादायक खुलासा केला आहे. या अनुभवी सलामीवीराने एका मुलाखतीत सांगितले की, त्याला भारताचा सध्याचा उपकर्णधार शुभमन गिलचा खूप हेवा वाटायचा. त्याच्या या खुलाशामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. धवननेही यामागे मोठे कारण सांगितले.

भारतीय संघात शिखर धवनचा दबदबा होता. रोहित शर्मासोबत त्याने संघाला अनेक महत्त्वाचे सामने जिंकून दिले. विशेषतः आयसीसी स्पर्धांमध्ये त्याची कामगिरी चांगली होती. मात्र 2019 मध्ये शुभमन गिल आल्यानंतर त्याचे महत्त्व हळूहळू कमी होऊ लागले. गिलने प्रथम एकदिवसीय संघात प्रवेश केला, त्यानंतर 2020 मध्ये कसोटी संघाचा नियमित सदस्य झाला. या काळात त्याने अनेक शतके झळकावली होती. गिलला विराटचा उत्तराधिकारी मानले जात होते.

दुसरीकडे धवन हळूहळू संघाबाहेर राहू लागला. त्याला शतकही झळकावता आले नव्हते. निवृत्तीनंतर, त्याने स्वतः कबूल केले की त्याला गिलचा हेवा वाटायचा, कारण त्याने आधीच 2 फॉरमॅटमध्ये जागा बनवली होती आणि भरपूर शतके झळकावली होती. तर तो एकाच फॉरमॅटमध्ये खेळत होता आणि अर्धशतकातच अडकला होता. मात्र, नंतर टीम इंडियाच्या ‘गब्बर’ने गिलची कामगिरी स्वीकारली आणि स्वत: त्याला संधी देण्याची वकिली केली होती. धवनचे हे प्रामाणिक उत्तर ऐकून चाहतेही भावूक झाले.

शिखर धवनने निवृत्ती घेतली असेल, पण त्याच्या चाहत्यांनी निराश होण्याची गरज नाही. तो अजूनही क्रिकेट खेळताना दिसणार आहे. 20 सप्टेंबरपासून लिजेंड्स लीग क्रिकेटचा तिसरा हंगाम आयोजित केला जाणार आहे, ज्यामध्ये 6 संघ सहभागी होणार आहेत. निवृत्त क्रिकेटपटूंच्या या लीगमध्ये धवन गुजरात संघात सामील झाला आहे. या लीगमध्ये तो ख्रिस गेलसोबत ओपनिंग करताना दिसणार आहे.