
सध्या अर्शद वारसी त्याच्या ‘कल्की 2898’ या ब्लॉकबस्टर चित्रपटासाठी साऊथ सुपरस्टार प्रभासवर केलेल्या कमेंट्समुळे चर्चेत आहे. अर्शदने अलीकडेच एका पॉडकास्टमध्ये सांगितले की, ‘कल्की’मध्ये प्रभास जोकरसारखा दिसत होता. त्याच्या या कमेंटवरून बराच वाद सुरू झाला आहे. मात्र, अर्शद हा असा बॉलिवूड अभिनेता आहे, ज्याने आपल्या कारकिर्दीत अनेक उत्कृष्ट चित्रपट केले आणि आपल्या दमदार अभिनयाने करोडो लोकांच्या हृदयात स्थान निर्माण केले. दरम्यान, आम्ही तुम्हाला त्याच्या एका चित्रपटाविषयी सांगतो, ज्याने बॉक्स ऑफिसवर भरपूर कमाई केली आणि त्याच्या करिअरमधला पहिला सोलो हिट चित्रपट होता.
अर्शद वारसीच्या कारकिर्दीतील पहिला सोलो हिट चित्रपट, ज्याच्या रिमेकने दक्षिणेच्या लोकांनी छापल्या खूप नोटा
अर्शद प्रत्येक चित्रपटात आपले पात्र मोठ्या उत्साहाने साकारतो, मग ते ‘मुन्नाभाई एमबीबीएस’मधील सर्किटचे पात्र असो किंवा ‘गोलमाल’मधील माधव. अर्शदने प्रत्येक पात्रात स्वतःला सिद्ध केले आहे. कदाचित त्यामुळेच आज त्याची गणना हिंदी चित्रपटसृष्टीतील उत्कृष्ट अभिनेत्यांमध्ये केली जाते.
अर्शद वारसीने 1996 मध्ये रिलीज झालेल्या ‘तेरे मेरे सपने’ या चित्रपटातून आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. त्याचा पहिला चित्रपट बॉक्स ऑफिसवर सेमी-हिट ठरला, परंतु मुख्य नायक म्हणून त्याला यशाची चव चाखायला 17 वर्षे लागली. ‘जॉली एलएलबी’ हा त्याचा पहिला सोलो हिट चित्रपट होता.
हा चित्रपट 2013 मध्ये थिएटरमध्ये आला होता. अर्शद वारसीचा ‘जॉली एलएलबी’ हा कोर्टरूम ड्रामा चित्रपट होता, ज्यामध्ये कॉमेडीचा टचही पाहायला मिळाला होता. त्याच्यासोबत बोमन इराणी, अमृता राव आणि सौरभ शुक्ला या कलाकारांनीही या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका साकारल्या होत्या. चित्रपटाच्या कथेपासून ते संपूर्ण स्टारकास्टच्या अभिनयाला प्रेक्षकांनी भरभरून दाद दिली. अर्शद या चित्रपटाचा नायक होता आणि त्याने वकील जगदीश त्यागी ऊर्फ जॉलीची भूमिका साकारली होती.
आश्चर्याची गोष्ट म्हणजे हा चित्रपट अत्यंत कमी बजेटमध्ये बनवला गेला होता आणि अर्शदच्या कारकिर्दीतील हा पहिला सोलो हिट चित्रपट ठरला. ‘जॉली एलएलबी’ हा 2013 मधील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला. या चित्रपटाने कमाईच्या बाबतीतही अनेक विक्रम केले. हा चित्रपट इतका यशस्वी झाला की त्याचा सिक्वेल ‘जॉली एलएलबी 2’ अक्षय कुमारसोबत 2017 साली बनवण्यात आला.
चित्रपटाची कथा हिट अँड रन प्रकरणावर आधारित होती, ज्यामध्ये जॉली पीडितेच्या बाजूने खटला लढतो. या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन सुभाष कपूर यांनी केले होते. रिपोर्ट्सनुसार, ‘जॉली एलएलबी’ संजीव नंदा यांच्या हिट अँड रन केसपासून प्रेरित होता आणि प्रियदर्शनी मट्टू प्रकरणाचा संदर्भही होता.
रिपोर्ट्सवर विश्वास ठेवला तर अर्शद वारसीच्या ‘जॉली एलएलबी’चे बजेट फक्त 10 कोटी रुपये होते. रिलीजनंतर, चित्रपटाने त्याच्या खर्चापेक्षा जवळपास 5 पट अधिक कमाई केली. बॉलिवूड हंगामाच्या रिपोर्टनुसार, ‘जॉली एलएलबी’ने जगभरात 48.7 कोटी रुपये कमावले होते.
‘जॉली एलएलबी’ बॉक्स ऑफिसवर इतका यशस्वी झाला की 2016 मध्ये तामिळमध्ये ‘मनिथन’ आणि 2017 मध्ये तेलुगूमध्ये ‘सप्तगिरी एलएलबी’ म्हणून रिमेक करण्यात आला. जॉली एलएलबीचा रिमेक करून साऊथच्या निर्मात्यांनीही भरपूर कमाई केली. अक्षयसोबत बनलेला ‘जॉली एलएलबी 2’ही बॉक्स ऑफिसवर हिट ठरला.
सध्या अर्शद वारसी दोन मोठ्या चित्रपटांवर काम करत आहे. विशेष म्हणजे या दोन्ही चित्रपटात तो अक्षय कुमारसोबत दिसणार आहे. पहिला चित्रपट ‘वेलकम टू जंगल’ आहे, जो अक्षयच्या ‘वेलकम’ या कॉमेडी चित्रपटाचा तिसरा भाग आहे. यंदाच्या ख्रिसमसच्या मुहूर्तावर हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. दुसरा चित्रपट ‘जॉली एलएलबी 3’ आहे, जो ‘जॉली एलएलबी’ फ्रेंचायझीचा तिसरा भाग असेल. हा चित्रपट एप्रिल 2025 मध्ये प्रदर्शित होणार असल्याचे बोलले जात आहे. या चित्रपटात हुमा कुरेशी, सौरभ शुक्ला देखील दिसणार आहेत. अर्शद वारसी शेवटचा 2023 मध्ये प्रदर्शित झालेल्या जिओ सिनेमाच्या लोकप्रिय सिरीज ‘असुर 2’ मध्ये दिसला होता.
