
बॉलिवूडचा प्रसिद्ध कोरिओग्राफर रेमो डिसूझाला अलाहाबाद उच्च न्यायालयाकडून मोठा दणका बसला आहे. 8 वर्षे जुना खटला रद्द करण्याची मागणी करणारी त्याची याचिका न्यायालयाने फेटाळली आहे. सुनावणीदरम्यान न्यायालयाने सांगितले की, आरोपपत्राला याचिकेत आव्हान दिलेले नाही, त्यामुळे कोरिओग्राफरला दिलासा देता येणार नाही.
कोरिओग्राफर रेमो डिसूझाला झटका, अलाहाबाद हायकोर्टाने रद्द केली नाही 8 वर्षे जुनी केस
कोरिओग्राफरवर गाझियाबादचे व्यापारी सत्येंद्र त्यागी यांना एका वर्षात 10 कोटी रुपये परत करण्याचे आमिष दाखविल्याचा आरोप आहे. त्या बदल्यात त्याने उद्योगपतीला चित्रपटात 5 कोटी रुपये गुंतवायला लावले. रेमोच्या म्हणण्यावर विश्वास ठेवून व्यावसायिकाने 2 कोटी रुपये रोख आणि 3 कोटी रुपये चेकद्वारे दिले. जेव्हा त्याने पैसे मागितले, तेव्हा रेमोने त्याला अंडरवर्ल्ड डॉन प्रसाद पुजारीला फोन केला आणि पैसे न मागण्याची धमकी दिली. ज्यानंतर सत्येंद्र त्यागी यांनी 8 वर्षांपूर्वी गाझियाबादच्या सिहानी गेट पोलिस ठाण्यात रेमोविरोधात गुन्हा दाखल केला होता. यानंतर रेमोने हायकोर्टात जाऊन केस रद्द करण्यासाठी याचिका दाखल केली होती.
या व्यावसायिकाने 16 डिसेंबर 2016 रोजी रेमोविरोधात गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला आणि प्रसाद पुजारी यांनी व्यापारी सत्येंद्र त्यागी यांना दिलेल्या धमकीची चौकशी केली. पोलिसांनी रेमो डिसूझा आणि अंडरवर्ल्ड डॉन प्रसाद पुजारी यांच्याविरुद्ध गाझियाबाद ट्रायल कोर्टात आयपीसीच्या कलम 420, 406 आणि 386 अंतर्गत आरोपपत्र दाखल केले होते. त्यानंतर कोर्टाने रेमोला हजर राहण्यासाठी समन्स बजावले.
रेमोच्या वकिलाने दाखल केलेल्या याचिकेत त्याने म्हटले होते की, त्याला चुकीच्या पद्धतीने गोवले जात आहे, त्याने असे काहीही केले नाही. मात्र, व्यापारी सत्येंद्रचे वकील पंकज त्यागी आणि डॉ. आकाश त्यागी यांनी रेमोच्या वकिलाच्या युक्तिवादाला विरोध केला होता. त्यानंतर दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकून अलाहाबाद उच्च न्यायालयाने रेमोची याचिका फेटाळली. न्यायमूर्ती राजीव मिश्रा यांच्या एकल खंडपीठाने हा निर्णय दिला आहे.
