58 शतके झळकावणाऱ्या दिग्गज फलंदाजाचे निधन, 4 दिवसांपूर्वीच झाला होता वाढदिवस, सचिन-सेहवागसोबत खेळले क्रिकेट


इंग्लंडचा माजी फलंदाज आणि सरेचा महान क्रिकेटपटू ग्रॅहम थॉर्प हे आता या जगात राहिले नाहीत. ग्रॅहम थॉर्प यांचे वयाच्या 55 ​​व्या वर्षी निधन झाले. ग्रॅहम थॉर्प हे 4 दिवसांपूर्वी म्हणजेच 1 ऑगस्ट रोजी 55 वर्षांचे झाले होते आणि आता ते या जगात नाहीत. ग्रॅहम थॉर्प हे दीर्घकाळ आजारी होते. त्याच्या आजाराचा खुलासा झालेला नाही. इंग्लंड क्रिकेट बोर्डाने सोमवारी सरेचा महान फलंदाज ग्रॅहम थॉर्प यांचे निधन झाल्याची माहिती दिली.

ग्रॅहम थॉर्पने इंग्लंडकडून 100 कसोटी खेळल्या ज्यात त्याने 6744 धावा केल्या. या डावखुऱ्या फलंदाजाने 16 शतके आणि 39 अर्धशतके केली आहेत. याशिवाय थॉर्पने इंग्लंडसाठी 82 एकदिवसीय सामन्यांमध्ये 21 अर्धशतकांसह 2380 धावा केल्या आहेत. थॉर्प हे इंग्लिश कौंटी संघाचे अनुभवी खेळाडू होते. त्यांनी 341 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये 49 शतकांच्या मदतीने 21937 धावा केल्या. तसेच, त्यांनी लिस्ट ए मध्ये 10871 धावा केल्या, ज्यात त्यांनी आपल्या बॅटने 9 शतके झळकावली. थॉर्प यांनी आपल्या व्यावसायिक कारकिर्दीत एकूण 58 शतके झळकावली होती.


ग्रॅहम थॉर्प सचिन-सेहवागसारख्या दिग्गजांसह क्रिकेटही खेळले होते. त्यांनी टीम इंडियाविरुद्ध 5 कसोटीत 35 पेक्षा जास्त सरासरीने 283 धावा केल्या. टीम इंडियाविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात या खेळाडूने 36 पेक्षा जास्त सरासरीने 328 धावा केल्या. टीम इंडिया विरुद्ध या खेळाडूची सरासरी नक्कीच चांगली होती, पण त्यांना कधीच शतक झळकावता आले नाही.

ग्रॅहम थॉर्प हे केवळ खेळाडूच नव्हे, तर प्रशिक्षक म्हणूनही खूप लोकप्रिय होते. या खेळाडूने 2005 मध्ये न्यू साउथ वेल्सचे प्रशिक्षकपद भूषवले आणि त्यानंतर त्यांना इंग्लंड लायन्सचे प्रशिक्षक बनवण्यात आले. तरुण खेळाडूंना तयार करणे, हे त्यांचे काम होते. 2013 च्या सुरुवातीस, थॉर्प इंग्लंडच्या एकदिवसीय आणि T20 संघांचे फलंदाजी प्रशिक्षक बनले. 2020 मध्ये पाकिस्तान विरुद्धच्या T20 मालिकेदरम्यान ते संघाचे अंतरिम प्रशिक्षक बनले. 2022 मध्ये हा खेळाडू अफगाणिस्तानचा मुख्य प्रशिक्षक बनला, पण हे पद स्वीकारण्यापूर्वीच ते एका गंभीर आजाराला बळी पडले.