ज्याची पाकिस्तानने केली नाही कदर, त्याने मोडला शाहीन शाह आफ्रिदीचा विश्वविक्रम


शाहीन शाह आफ्रिदीने केलेला विश्वविक्रम मोडला गेला आहे. तो ही पाकिस्तानात जन्मलेल्या एका खेळाडूनेही मोडला आहे. तो पेशावरकडून क्रिकेट खेळला आहे. पण, आता आंतरराष्ट्रीय क्रिकेट ओमानमधून खेळत आहे. आम्ही बोलत आहोत बिलाल खानबद्दल, जो आता वनडेमध्ये सर्वात वेगवान 100 विकेट घेणारा गोलंदाज बनला आहे. हा विश्वविक्रम यापूर्वी शाहीन आफ्रिदीच्या नावावर होता. विशेष बाब म्हणजे शाहीनप्रमाणेच बिलालही डावखुरा वेगवान गोलंदाज आहे.

37 वर्षीय बिलाल खानने 24 जुलै रोजी नामिबियाविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद 100 विकेट्स घेण्याचा पराक्रम केला. आयसीसी पुरुष क्रिकेट विश्वचषकाच्या लीग 2 सामन्यात बिलालने 10 षटकात 50 धावा देऊन 3 बळी घेतले. या 3 विकेट्स दरम्यान त्याने शाहीनचा विश्वविक्रम उद्ध्वस्त केला.

शाहीन शाह आफ्रिदीने आपल्या 51व्या वनडेत 100 फलंदाजांचा विकेट पूर्ण केल्या. तर बिलाल खानने त्याच्या आधी 2 सामने म्हणजे त्याच्या 49व्या एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यात असेच केले. बिलाल खानच्या नावावर सध्या 101 बळी आहेत. शाहीन आफ्रिदीने जेव्हा विश्वविक्रम केला, तेव्हा त्याने मिचेल स्टार्कचा विक्रम मोडला, ज्याने आपल्या 52 व्या एकदिवसीय सामन्यात हा पराक्रम केला होता. 50 पेक्षा कमी सामन्यात 100 बळी घेणारा बिलाल हा पहिला वेगवान गोलंदाज आहे.

एकूण गोलंदाजांमध्ये, बिलाल खान हा 100 एकदिवसीय विकेट्स पूर्ण करणारा तिसरा वेगवान गोलंदाज आहे. अफगाणिस्तानचा फिरकी गोलंदाज राशिद खान याने एकदिवसीय क्रिकेटमध्ये 42 सामन्यात सर्वात जलद 100 बळी घेण्याचा पराक्रम केला आहे. या यादीत दुसऱ्या क्रमांकावर नेपाळचा फिरकी गोलंदाज संदीप लामिछाने आहे, ज्याने 44 सामन्यांत एकदिवसीय क्रिकेटमध्ये 100 बळी घेतले आहेत.

एकदिवसीय क्रिकेटमध्ये 100 पेक्षा जास्त विकेट घेणाऱ्या बिलालने टी-20 इंटरनॅशनलमध्ये 110 विकेट्स घेतल्या आहेत, ज्या त्याने 79 सामन्यांमध्ये मिळवल्या आहेत. बिलाल खान हा ओमानचा गोलंदाज आहे, पण त्याचा जन्म 1987 मध्ये पेशावर, पाकिस्तानमध्ये झाला. 2007 ते 2009 दरम्यान तो पेशावरसाठी प्रथम श्रेणी क्रिकेटही खेळला. पण, संधी न मिळाल्याने तो ओमानला गेला. तेथे 4 वर्षे राहिल्यानंतर त्याला नागरिकत्व मिळाले आणि त्यानंतर तो ओमानकडून खेळू लागला.