WCL मध्ये झाली 2007 च्या इतिहासाची पुनरावृत्ती, T20 विश्वचषकाप्रमाणे अंतिम फेरीत पोहोचले भारत-पाकिस्तान


लिजेंड्स लीगची वर्ल्ड चॅम्पियनशिप इंग्लंडमध्ये खेळवली जात आहे. या लीगमध्ये भारत, पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिज यांनी भाग घेतला होता, ज्यामध्ये माजी क्रिकेटपटू खेळत होते. या लीगमधील अव्वल चार संघ म्हणजे भारत, पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिज यांनी उपांत्य फेरी गाठली होती. उपांत्य फेरीचे दोन्ही सामने 12 जुलै रोजी झाले. एकात पाकिस्तानने वेस्ट इंडिजचा पराभव केला, तर दुसऱ्यामध्ये भारताने ऑस्ट्रेलियाचा पराभव केला. 2007 च्या T20 विश्वचषकाप्रमाणे आता भारत आणि पाकिस्तान यांच्यात 13 जुलैला अंतिम सामना खेळवला जाणार आहे.

भारत आणि पाकिस्तान अंतिम फेरीत पोहोचताच चाहत्यांना 2007 ची टी-20 विश्वचषक फायनलची आठवण झाली. चाहते आता अंतिम सामन्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. WCL ची उपांत्य फेरी देखील 2007 च्या T20 विश्वचषकासारखीच होती. 2007 प्रमाणे पुन्हा एकदा सेमीफायनलमध्ये ऑस्ट्रेलियाचा सामना टीम इंडियाशी झाला. याच सामन्याप्रमाणे भारताने प्रथम फलंदाजी करत हा सामना जिंकला. युवराज सिंगच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाचा 86 धावांनी पराभव केला.

या सामन्यात आणखी एक समानता पाहायला मिळाली. 2007 च्या उपांत्य फेरीप्रमाणेच युवराज WCL मध्येही सामनावीर ठरला. त्यावेळी त्याने 30 चेंडूत 70 धावांची तुफानी खेळी केली होती. या सामन्यात त्याने 28 चेंडूत 59 धावांची शानदार खेळी साकारली. युवराजशिवाय युसूफ पठाणने 23 चेंडूत 51 धावा, इरफान पठाणने 19 चेंडूत 50 धावा आणि रॉबिन उथप्पाने 35 चेंडूत 65 धावांची खेळी करत सामना जिंकण्यात महत्त्वाचे योगदान दिले. अशाप्रकारे भारताने एकूण 254 धावा केल्या, ज्याच्या प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियन संघ केवळ 168 धावाच करू शकला.

लिजेंड्सच्या वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या पहिल्या उपांत्य फेरीत युनूस खानच्या नेतृत्वाखालील पाकिस्तान संघाने वेस्ट इंडिजचा 20 धावांनी पराभव केला. वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकून पाकिस्तानला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. मात्र, प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने 10 धावांत 3 गडी गमावले. यानंतर कामरान अकमल आणि युनूस खान यांनी डावाची धुरा सांभाळली. कामरानने 31 चेंडूत 46 धावांची तर युनूसने 45 चेंडूत 65 धावांची शानदार खेळी खेळली. यानंतर, शेवटी आमिर यामीनने 18 चेंडूत 40 धावा केल्या. तर सोहेल तन्वीरने 17 चेंडूत 33 धावा केल्या. यासह पाकिस्तानला 198 धावा करण्यात यश आले. त्याचा पाठलाग करण्यासाठी आलेला वेस्ट इंडिजचा संघ 178 धावांवर सर्वबाद झाला.