Budget 2024 : सातव्यांदा अर्थसंकल्प सादर करणार अर्थमंत्री निर्मला सीतारामन, असा रचला नवा विक्रम


अर्थसंकल्पाच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. अर्थमंत्री निर्मला सीतारामन जुलैच्या शेवटच्या आठवड्यात 23 तारखेला लोकसभेत पूर्ण अर्थसंकल्प सादर करणार आहेत. सर्वसामान्य जनता, व्यापारी, पगारदार वर्ग आणि विद्यार्थ्यांना या अर्थसंकल्पाकडून मोठ्या अपेक्षा आहेत. जागतिक मंदीची चिन्हे असताना सादर होत असलेल्या या अर्थसंकल्पात देशांतर्गत अर्थव्यवस्था मजबूत करण्यावर आणि रोजगार निर्मितीवर भर दिला जाऊ शकतो. 23 जुलै रोजी अर्थमंत्री निर्मला सीतारामन सातव्यांदा अर्थसंकल्प सादर करून नवीन विक्रम करणार आहेत. याआधीही त्यांच्या नावावर अनेक विक्रम नोंदवले गेले आहेत.

अर्थमंत्री निर्मला सीतारामन सलग सातव्यांदा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. हा अर्थसंकल्प पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तिसऱ्या सरकारचा प्राधान्यक्रम आणि विकसित भारताची दिशा ठरवणार आहे. अर्थमंत्री सीतारामन यांनी 1 फेब्रुवारी 2024 रोजी लोकसभेत अंतरिम अर्थसंकल्प सादर केला. 23 जुलै रोजी अर्थमंत्री सीतारामन आपला सलग सातवा अर्थसंकल्प सादर करून एक नवा विक्रम करणार आहेत. यापूर्वी माजी पंतप्रधान मोरारजी देसाई यांनी अर्थमंत्री असताना सलग सहा वेळा अर्थसंकल्प सादर केला होता. आतापर्यंत एकाही अर्थमंत्र्यांनी सलग इतके अर्थसंकल्प सादर केलेले नाहीत. या बाबतीत त्या मोरारजी देसाईंच्या सहा बजेटच्या विक्रमाला मागे टाकणार आहे. यापूर्वी, सीतारामन यांनी 2019 आणि 2024 साठी दोन अंतरिम आणि चार पूर्ण अर्थसंकल्प सादर केले आहेत.

मोदी सरकारमध्ये सलग तिसऱ्यांदा मंत्री म्हणून सामील होणारी पहिली महिला होण्याचा विक्रमही सीतारामन यांच्या नावावर आहे. आपल्या राजकीय कारकिर्दीत त्यांनी अनेक मोठे यश संपादन केले. 2017 मध्ये पहिल्या महिला संरक्षण मंत्री बनल्या. याआधी त्या उद्योग आणि वाणिज्य मंत्री होत्या. अरुण जेटली (अर्थमंत्री 2014-19) आजारी पडल्यानंतर 2019 च्या सार्वत्रिक निवडणुकांनंतर नव्याने निवडून आलेल्या मोदी सरकारमध्ये सीतारामन यांनी वित्त विभागाचा कार्यभार स्वीकारला.

2020 मध्ये, निर्मला सीतारामन यांनी सर्वात लांब अर्थसंकल्पीय भाषण दिले, जे दोन तास आणि चाळीस मिनिटे चालले. त्या अर्थसंकल्पात LIC IPO आणि नवीन आयकर स्लॅब जाहीर करण्यात आला. 2019 मध्येही त्यांचे भाषण दोन तास सतरा मिनिटांचे होते.

राजकारणात प्रवेश करण्यापूर्वी, सीतारामन ब्रिटनमधील कॉर्पोरेट जगाचा भाग होत्या, जिथे त्या त्यांचे पती परकला प्रभाकर यांच्यासोबत राहत होत्या. जेएनयूमध्ये शिकत असताना दोघांची भेट झाली आणि 1986 मध्ये लग्न झाले. त्यांना परकला वांगमयी ही मुलगी आहे. हैदराबाद येथील सेंटर फॉर पब्लिक पॉलिसी स्टडीजच्या उपसंचालक म्हणून त्यांनी काम केले. शहरात शाळाही सुरू केली. 2003 ते 2005 या काळात त्या राष्ट्रीय महिला आयोगाच्या सदस्या होत्या.