
T20 वर्ल्ड कप 2024 संपल्यानंतर टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांचा कार्यकाळही संपला आहे. याशिवाय कर्णधार रोहित शर्मानेही T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. त्यामुळे आता त्यांच्या जाण्यानंतर भारतीय संघाचा नवा प्रशिक्षक आणि टी-20 मधील नवा कर्णधार कोण असेल आणि या दोघांची घोषणा कधी होणार हे जाणून घ्यायचे आहे. दरम्यान, बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी एक मोठा खुलासा केला आहे. सध्या वादळामुळे टीम इंडियासह तेही बार्बाडोसमध्ये अडकले आहेत. तिथून त्यांनी पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की बीसीसीआयने आपला नवीन प्रशिक्षक निवडला आहे, त्याच्या घोषणेला विलंब होत आहे.
बीसीसीआयने निवडला टीम इंडियाचा नवा प्रशिक्षक, जय शाह यांनी सांगितले कधी होणार घोषणा
जय शाह यांनी खुलासा केला आहे की बीसीसीआयच्या क्रिकेट सल्लागार समितीने टीम इंडियाच्या नवीन प्रशिक्षकासाठी नुकतीच मुलाखत घेतली होती आणि त्यानंतर दोन उमेदवारांना शॉर्टलिस्ट केले आहे. त्यांनी नाव जाहीर केले नसले तरी भारताच्या श्रीलंका दौऱ्यात संघाला नवा प्रशिक्षक मिळेल, असे निश्चितपणे सांगितले. झिम्बाब्वे दौऱ्यावर व्हीव्हीएस लक्ष्मण संघाचे प्रशिक्षक असतील. भारतीय संघाच्या नव्या प्रशिक्षकासाठी गौतम गंभीर हा सर्वात मोठा दावेदार आहे. त्याच्या नावाची सर्वाधिक चर्चा आहे. मात्र, आता तो संघाचा प्रशिक्षक होणार की नाही, हे श्रीलंका दौऱ्यातच समोर येईल.
T20 वर्ल्ड कप ट्रॉफी जिंकल्यानंतर रोहित शर्माने T20 इंटरनॅशनलमधून निवृत्तीची घोषणा केली होती. त्याच्या जाण्याने टीम इंडियाच्या कर्णधाराचे पदही रिक्त झाले आहे. याबाबत जय शहा म्हणाले की, सध्या कोणाच्याही नावाला मंजुरी मिळालेली नाही. आता निवडकर्ते टी-20 संघाच्या नवीन कर्णधाराबाबत बैठक घेणार आहेत. त्यानंतरच निर्णय घेतला जाईल.
T20 विश्वचषकातील चमकदार कामगिरी आणि ट्रॉफी जिंकल्यानंतर, BCCI ने विजयाच्या एका दिवसानंतर टीम इंडिया आणि सपोर्ट स्टाफसाठी 125 कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. त्यानी मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड, कर्णधार रोहित शर्मा, हार्दिक पांड्या आणि विराट कोहली यांचे कौतुक केले. याशिवाय भविष्यात चॅम्पियन्स ट्रॉफी आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप जिंकण्याची इच्छाही त्यांनी व्यक्त केली.
