Kalki 2898 AD मोडणार सर्व रेकॉर्ड, प्रभासचा चित्रपट पहिल्याच दिवशी करणार 200 कोटींचा व्यवसाय?


प्रभास, दीपिका पादुकोण, अमिताभ बच्चन आणि कमल हासन यांचा कल्की 2898 एडी हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर इतिहास रचण्यासाठी सज्ज झाला आहे. देशभरात या चित्रपटाची जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे. 27 जूनला हा चित्रपट प्रदर्शित होत आहे, मात्र याआधीच या चित्रपटाची लाखो तिकिटे विकली गेली आहेत. ज्या वेगाने ॲडव्हान्स बुकिंग होत आहे, त्यावरून पहिल्याच दिवशी हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर भुकंप आणणार असल्याचे स्पष्ट होते.

Sacknilk ने चित्रपटाच्या पहिल्या दिवसाची आगाऊ बुकिंग नोंदवली आहे. त्यानुसार मंगळवारी दुपारी 3 वाजेपर्यंतच्या आकडेवारीनुसार कल्कीच्या सुमारे 20 कोटी रुपयांच्या आगाऊ तिकिटांची विक्री झाली आहे. या चित्रपटाची क्रेझ किती प्रबळ आहे याचा अंदाज यावरून या चित्रपटाची आतापर्यंत 6 लाख 66 हजार 924 तिकिटांची आगाऊ विक्री झाली आहे. रिलीज होण्यासाठी अजून दोन दिवस बाकी आहेत. अशा स्थितीत हा आकडा आणखी वर जाईल, असे मानले जात आहे. विशेष म्हणजे हे फक्त पहिल्या दिवसाचे बुकिंग आकडे आहेत.

नाग अश्विन दिग्दर्शित कल्की 2898 एडी या चित्रपटाची चाहत्यांनी खूप दिवसांपासून वाट पाहिली आहे. निर्मात्यांनी रिलीजपूर्वी चित्रपटाचे दोन ट्रेलर रिलीज केले आहेत, ज्यांना अप्रतिम प्रतिसाद मिळाला आहे. कल्की हा देशातील तिसरा असा चित्रपट बनू शकतो, जो पहिल्याच दिवशी 200 कोटींचा व्यवसाय करेल. राजामौलीच्या बाहुबली 2 आणि आरआरआरने हा पराक्रम यापूर्वीच केला आहे. आता कल्की तिसरा चित्रपट बनू शकतो, जो 200 कोटींचा जादुई आकडा गाठेल.

देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट सर्व भाषांमध्ये 120-140 कोटी रुपयांचा व्यवसाय करू शकतो, अशी माहिती Sacknilk ने दिली आहे. फक्त तेलगू राज्यांमध्ये म्हणजे आंध्र प्रदेश आणि तेलंगणामध्ये चित्रपटाला 90 ते 100 कोटी रुपयांची ओपनिंग मिळू शकते. याशिवाय हिंदी पट्ट्यात हा चित्रपट जवळपास 20 कोटींची कमाई करू शकतो. कर्नाटक, तामिळनाडू आणि केरळमध्ये हा चित्रपट 15 कोटींहून अधिकचा व्यवसाय करण्यात यशस्वी होईल, अशी अपेक्षा आहे.

परदेशात चित्रपटाचे ॲडव्हान्स बुकिंग बऱ्याच दिवसांपासून सुरू आहे. परदेशात तिकिटांच्या आगाऊ बुकिंगच्या बाबतीत, कल्की प्रभासच्या सालारपेक्षा खूप पुढे असल्याचे दिसते. अशा परिस्थितीत हा चित्रपट परदेशी बाजारातून 60-70 कोटींची कमाई करू शकतो, अशी अपेक्षा आहे. या चित्रपटाला 180 कोटी ते 210 कोटींची ओपनिंग मिळू शकते असे मानले जात आहे.