येथे आयोजित करण्यात आला ‘भूतां’चा अनोखा विवाह, प्रकरण जाणून घेतल्यानंतर तुम्हीही व्हाल भावूक


मलेशियामध्ये यांग जिंगशान आणि ली शुएइंग नावाच्या जोडप्याचा एका भीषण कार अपघातात मृत्यू झाला. ही घटना 24 मे रोजी पेराकच्या वायव्य भागात घडली. दोघेही गेल्या तीन वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होते आणि लवकरच लग्न करण्याचा विचार करत होते. असे सांगितले जात आहे की जिंगशान लीला प्रपोज करण्यासाठी तिच्या वाढदिवसाच्या दिवशी बँकॉकला जाण्याचा विचार करत होते, परंतु नशीबाने ते तसे करण्याआधीच त्यांची कार उलटली आणि ते दोघेही आता या जगात नाहीत.

साऊथ चायना मॉर्निंग पोस्टच्या वृत्तानुसार, या अपघातानंतर दोन्ही घरांच्या कुटुंबीयांनी मिळून एक अनोखा विधी करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी आपापल्या मुलांची शेवटची इच्छा पूर्ण करण्यासाठी ‘भूत विवाह’ आयोजित केला होता.

चीनमधली ही परंपरा आहे, ज्या अंतर्गत दोन अविवाहित मृत आत्मे विवाहाच्या पवित्र बंधनात बांधले जातात. असे मानले जाते की असे केल्याने मृत्यूनंतरही दोघेही पती-पत्नीच्या रूपात कायमचे एकरूप होतात आणि यामुळे त्यांच्या आत्म्याला शांती मिळते.

जिंगशान आणि ली यांच्या कुटुंबीयांनी गेल्या सोमवारी एका अंत्यसंस्कार हॉलमध्ये हा अनोखा सोहळा आयोजित केला होता, जिथे दोघांनी लग्न केले. घरच्यांनी त्यांच्यासाठी लग्नाचा फोटोही बनवला. जिंगशान यांच्या कुटुंबाने त्यांच्या शोकसंदेशात ली यांना त्यांची सून म्हणून स्वीकारले.

चिनी लोककथा तज्ञ हुआंग जिंगचुन यांनी सांगितले की, या प्रथेमुळे प्रियजन गमावलेल्या नातेवाईकांच्या भावनिक गरजा पूर्ण करण्यात मदत होते. चिनी संस्कृतीच्या प्रभावाखाली, भूतविवाहाची ही प्रथा उत्तर कोरिया आणि जपानसारख्या अनेक पूर्व आशियाई देशांमध्येही प्रचलित आहे.