617 कोटींची कमाई करून धमाका करणारा प्रभासचा ‘सालार’ आता या देशात होणार रिलीज


गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये प्रभासने ‘सालार’ नावाचा चित्रपट आणला होता. प्रशांत नील दिग्दर्शित या चित्रपटात पृथ्वीराज सुकुमारन, श्रिया रेड्डी आणि श्रुती हासन सारखे स्टार्स दिसले होते. या चित्रपटाला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आणि बॉक्स ऑफिसवर कमाईही चांगली झाली. रिपोर्टनुसार, या चित्रपटाचे बजेट जवळपास 270 कोटी रुपये होते आणि चित्रपटाने जगभरातून 617 कोटी रुपये कमावले होते. निर्मात्यांनी आता हा चित्रपट दुसऱ्या देशात प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला आहे.

हा चित्रपट आता जपानमध्ये प्रदर्शित होणार आहे. निर्मात्यांनी सोशल मीडियावर पोस्टर शेअर करून चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे. ‘सालार’ जपानी चित्रपटगृहात 5 जुलै रोजी प्रदर्शित होणार आहे. 2023 मध्ये या चित्रपटाची सगळीकडे जोरदार चर्चा रंगली होती. या चित्रपटाचा त्या वर्षातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीतही समावेश होता. आता या चित्रपटाचा धमाका जपानच्या चित्रपटगृहांमध्ये पाहायला मिळणार आहे.

‘सालार’ नंतर या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाची सर्वांनाच प्रतीक्षा आहे. मात्र, नुकताच एक रिपोर्ट समोर आला आहे, ज्यानुसार चाहत्यांना ‘सालार 2’ साठी खूप वाट पाहावी लागणार आहे. वास्तविक, हा चित्रपट 2025 मध्ये प्रदर्शित होणार असल्याचे आधीच सांगितले जात होते. मात्र आता प्रशांत नीलने त्याच्या अन्य प्रोजेक्टसाठी या चित्रपटाचे काम थांबवले असल्याचे बोलले जात आहे. तो ज्युनियर एनटीआरसोबत चित्रपट करणार असल्याचे बोलले जात आहे. त्यासाठी त्यांनी ‘सालार 2’चे काम सध्या थांबवले आहे. मात्र, एनटीआरसोबत तो कोणत्या प्रोजेक्टवर काम करत आहे याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही.

मात्र, सध्या प्रभास त्याच्या आगामी ‘कल्की 2898 एडी’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. त्याचा हा चित्रपट 27 जूनला प्रदर्शित होत आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत दीपिका पादुकोण, अमिताभ बच्चन, कमल हासन आणि दिशा पटानी सारखे स्टार्स दिसणार आहेत.